दिल्ली । Delhi
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ठोस पाऊल उचलले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत ९ ठिकाणी एअर स्ट्राइक केल्या. या हल्ल्यात अंदाजे ९० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. या संयुक्त कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने जागतिक स्तरावर दहशतवादाला कठोर उत्तर दिलं आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत या ऑपरेशनची अधिकृत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी प्रमुख भूमिका बजावली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन संदर्भातील तपशील माध्यमांसमोर मांडले.
कोण आहेत सोफिया कुरेशी?
कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्करातील एक अनुभवी आणि कर्तबगार अधिकारी आहेत. त्या गुजरातमधील वडोदराच्या रहिवासी असून १९८१ साली त्यांचा जन्म झाला. बायोकेमिस्ट्री विषयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. लष्करात सेवा करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या सोफिया यांचे आजोबा आणि वडील दोघेही सैन्यात होते.
कुरेशी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. वयाच्या ३५व्या वर्षीच त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. मार्च २०१६ मध्ये त्या लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असताना त्यांनी बहुराष्ट्रीय सैन्य सरावात भारताच्या तुकडीचं नेतृत्व केलं. अशा प्रकारचा सराव भारतात प्रथमच झाला होता आणि त्यात १८ देश सहभागी झाले होते. या ऐतिहासिक मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या होत्या.
कोण आहेत व्योमिका सिंग?
विंग कमांडर व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलातील एक कुशल आणि अनुभवी हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांना २५०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी हिमालयातील पर्वतरांगा, वाळवंटी प्रदेश, घनदाट जंगले आणि समुद्रकिनाऱ्यांवरही उड्डाण केलं आहे. व्योमिका या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कुशल असून, संकटाच्या काळातही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.