Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशOperation Sindoor : ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं? पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी...

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं? पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी काय सांगितलं?

दिल्ली । Delhi

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करून त्यांना धक्का दिला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफसारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील शांततामय पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तान-प्रेरित दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले होते. याची जबाबदारी “द रेसिस्टन्स फ्रंट” (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली होती. TRF ही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित संघटना आहे.

YouTube video player

या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी सुरू होती. अखेर बुधवारी भारत सरकारने “ऑपरेशन सिंदूर” राबवून पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. या मोहिमेची माहिती देण्यासाठी एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, हवाई दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी संयुक्तरित्या माहिती दिली. विशेष म्हणजे या कारवाईत दोन महिला अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, “या कारवाईचे उद्दिष्ट केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे होते. आम्ही विशेष काळजी घेतली की कोणत्याही निष्पाप नागरिकाला इजा पोहोचू नये. हा अत्यंत अचूक आणि नियोजित हल्ला होता.” या ठिकाणांवर टार्गेटेड हल्ले करण्यात आले असून, सर्व अड्डे उद्ध्वस्त झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. या कारवाईदरम्यान कोणत्याही लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला नाही आणि नागरिकांचेही नुकसान टाळण्यात आले आहे. ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकतेने करण्यात आली. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांची ओळख पटवली होती. त्यानंतर हल्ल्याची वेळ, मार्ग आणि लक्ष्य यांचे बारकाईने नियोजन करण्यात आले. विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, “आम्ही फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतली.”

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, पहलगाम हल्ला हा भारताच्या प्रगतीच्या विरोधात पाकिस्तानने उभं केलेलं षड्यंत्र होतं. “जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन आणि अर्थव्यवस्था वाढते आहे. हेच पाकिस्तानला खटकते आणि म्हणून त्यांनी हा हल्ला घडवून आणला,” असं ते म्हणाले. पाकिस्तानने हल्ल्यानंतरही कोणतीही दहशतवाद्यांविरोधात कारवाई न करता उलट भारतावर आरोप केले. त्यामुळे भारताला स्वतःची सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई करावी लागली, असंही त्यांनी नमूद केलं.

या कारवाईनंतर पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. विक्रम मिस्री यांनी सांगितले की, “पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगात ओळखले जाते. हे थांबवण्यासाठी भारताला पावले उचलावी लागली.” या कारवाईमुळे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, दहशतवादाविरोधात तो कोणतीही तडजोड करणार नाही. भारत शांततेच्या मार्गावर आहे, पण जर कोणी त्याच्या सुरक्षेला आव्हान दिलं, तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल.

 

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ जानेवारी २०२६ – जगाच्या ठेकेदाराची दादागिरी

0
अमेरिका स्वतःला जगाचा एकमेव तारणहार-पालनहार समजते आणि या गृहीतकाला सगळ्या जगाने मान तुकवून मान्यता द्यावी असा अट्टहास नेहमी सुरु असतो. त्यासाठीच मनमानी करून वाट्टेल...