नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सरकारची बाजू मांडत विरोधकांचे सर्व आरोप आणि टीका खोडून काढल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे नाही, तर पाकिस्तानच्या विनंतीमुळे युद्धविराम मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. आमचे उद्दिष्ट युद्ध करणे नव्हते तर दहशतवाद्यांच्या संरचना नष्ट करणे होते.” असे त्यांनी स्पष्ट केले. भारताने राबललेल्या या ऑपरेशनमध्ये भारताचे किती नुकसान झाले? पाकिस्तानवर कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली? असे सगळे काही सरकारने सांगितले.
मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “भारतीय सैन्याने केलेली ही कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणाचा हेतू ठेवून केलेली होती. या कारवाईमध्ये कोणालाही भडकवण्याचा हेतू नव्हता. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ला केला. पाकिस्तानचे हे हल्ले 7 मे ते 10 मे 2025 पर्यंत रात्री 1.30 वाजेपर्यंत चालू होते. या काळात पाकिस्तानने भारतावर मिसाइल्स, ड्रोन, रॉकेट्स, लाँग रेन्ज शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानच्या निशाण्यावर भारतीय वायुसेनेचे तळ, हवाई तळ, मिलिटरी टेंट होते.” अशी माहिती त्यांनी दिली. “भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिम, काऊंटर ड्रोन सिस्टिम, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारताने अयशस्वी करून टाकले. पाकिस्तान त्यांनी ठरवलेल्या कोणत्याही टार्गेवर हल्ला करू शकला नाही. पाकिस्तानच्या या हल्ल्यांत भारताच्या कोणत्याही मौल्यवान आणि महत्त्वाच्या मालमत्तेचे नुकसान झालेले नाही,” अशी मोठी माहितीही त्यांनी दिली. ‘पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला रोखण्यात आले,’ असेही ते पुढे म्हणाले आहेत.
राजनाथ सिंहांचे विरोधकांना प्रत्युत्तर
राजनाथ सिंह पुढे म्हणतात, विरोधी पक्ष विचारत आहेत की, पाकिस्तानी सैन्याने आपली किती विमाने पाडली? हा प्रश्न जनतेच्या भावनांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाही. त्यांनी आम्हाला कधीही हे विचारले नाही की, आपल्या सैन्याने शत्रूची किती विमाने पाडली? जर त्यांना प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का? हे विचारावे. याचे तर उत्तर हो, असे आहे. जेव्हा ध्येय मोठी असतात, तेव्हा लहान मुद्द्यांकडे लक्ष वळवू नये. जर विरोधी पक्षाचे मित्र ऑपरेशन सिंदूरवर योग्य प्रश्न विचारू शकत नसतील, तर त्याला मी काही करू शकत नाही.
१९६२ मध्ये चीनशी झालेल्या युद्धाचा दुःखद परिणाम झाला, तेव्हा आम्ही विचारले होते की, आपली जमीन दुसऱ्या देशाने कशी ताब्यात घेतली. लष्कराचे जवान कसे मारले गेले. आम्ही युद्धसामग्री आणि बंदुकांची चिंता नव्हती, तर देशाच्या कल्याणाची काळजी होती. १९७१ मध्ये जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवला, तेव्हा आम्ही राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे कौतुक केले. अटलबिहारी वाजपेयी संसदेत उभे राहून त्यावेळच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. तेव्हाही आम्ही सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले नाही. अधिक व्यावहारिक भाषेत सांगायचे तर, परीक्षेचा निकाल महत्त्वाचा असतो. परीक्षेदरम्यान पेन्सिल तुटली, पेन संपला, हे महत्वाचे नसते. आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान निश्चित केलेले लक्ष्य पूर्णपणे साध्य केले आहे, असेही राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले.
ऑपरेशन सिंदूर का बरं राबवलं?
ऑपरेशन सिंदूर राबवण्याचे कारणच हे होते की पाकिस्तानने ज्यांना पोसले आहे त्या दहशतवाद्यांना उत्तर देणे आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करणे. तसेच पहलगाम मध्ये निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली त्याचे हे उत्तर होते. दहशतवादी पाठवून प्रॉक्सी वॉर करणाऱ्या पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनचा उद्देश युद्ध करणे हा नव्हता. १० मे च्या सकाळी भारतीय वायुसेने पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने हार मानली आणि ते गुडघ्यावर आले. त्यांनी आपल्या डीजीएमओंशी संपर्क केला आणि हे सगळे हल्ले थांबवा अशी विनंती केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





