Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याविरोधकांकडून बावनकुळे लक्ष्य; पत्रकार इमान विकणार नाहीत : वडेट्टीवार

विरोधकांकडून बावनकुळे लक्ष्य; पत्रकार इमान विकणार नाहीत : वडेट्टीवार

मुंबई | प्रतिनिधी

पत्रकारांनी २०२४ पर्यंत भाजपविरोधात बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. विरोधी पक्ष काँग्रेसने या विधानावरून बावनकुळे यांना चांगलेच लक्ष्य केले. पत्रकारांना ढाब्यावर बोलावून संविधान आणि लोकशाहीला धाब्यावर बसवून अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे आणि चालवण्याचे पाप भाजपला झाकता येणार नाही.

- Advertisement -

पत्रकारांचा अवमान करणाऱ्या चंद्रशेखर बावनखुळे आणि भाजपने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असे नाही, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल, रविवारी अहमदनगरमधील पक्षाच्या बैठकीत बोलताना, तुम्ही ज्या बूथवर काम करता त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपल्या बूथवर जे चार-पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा.

चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचे. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचे . आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे,असा सल्ला दिला. या सल्ल्यावरून काँग्रेसने आज बावनकुळे यांचा समाचार घेतला.

पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे आणि चालवण्याचे पाप झाकता येणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये बोलताना केली. पत्रकारांचा अवमान करणाऱ्या बावनकुळे यांनी राज्यातील पत्रकारांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. जे भाजपच्या पोटात आहे तेच बावनकुळेंच्या ओठावर आले आहे.

अनैतिक मार्गाचा वापर करून सत्तेत यायचे आणि सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार करून पैसा कमावयाचा. त्याच पैशाचा वापर करून अनैतिक मार्गाने पुन्हा सत्तेत यायचे हेच भाजपचे एक कलमी धोरण आहे. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही भाजपने अशाच प्रकारे सत्ता मिळवली, अशी टीका पटोले यांनी केली.

महाराष्ट्राला पत्रकारितेचा मोठा समृद्ध वारसा आहे. लोकमान्य टिळकांसारख्या संपादकांनी इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा परखड सवाल आपल्या अग्रलेखातून जुलमी इंग्रज सरकारला करून जाब विचारला होता. आता चंद्रशेखर बावनकुळेंचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारण्याआधी बावनकुळेंनी पत्रकारांची माफी मागाव, असे नाना पटोले म्हणाले.

तर तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजता का? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असे नाही, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सकरून लगावला आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवूनही भाजप विरुद्ध आवाज दबत नाही. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो.

पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की. पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

चुकीचा अर्थ काढू नये; फडणवीस

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची पाठराखण केली आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये. बावनकुळे हे व्यंगात्मक बोलले आहेत. त्यामुळे त्यावरून वाद निर्माण करणे अतिशय चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या