मुंबई / प्रतिनिधी Mumbai
महापालिका निवडणुकीत बोटावर मार्करने लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकीसाठी कोरस कंपनीने मार्कर पुरवले आहेत. त्यामुळे या कंपनीची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिली. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत असे प्रकार होऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जी मैसूर इंक कंपनीची शाई वापरते ती शाई वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराला मतदानाच्या पूर्वी बोटावर मार्करने शाई लावली जात आहे. मात्र, ही शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात समाज माध्यमात व्हिडिओही व्हायरल झाले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने लावलेली शाई सहज पुसली जात असल्याचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे.
सन २०११ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर वापरले जात आहेत. शाई लावल्यानंतर ती सुकायला १० ते १२ सेकंद लागतात. या कालावधीत मतदार मतदान कक्षातच असतो. एकदा शाई सुकली की ती काढता येत नाही. ज्या प्रकारची शाई मार्करमध्ये आहे तीच शाई भारत निवडणूक आयोग वापरतो. जर शाई पुसून दुबार मतदान झाले, तर संबंधित मतदारावर कारवाई केली जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. शाई सुकण्याआधी ती पुसली गेली तर ती मतदाराची चूक आहे. अशा मतदारांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे ते म्हणाले.
शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वापरण्यात येणारा मार्कर पेन निकृष्ट दर्जाचा असून शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि युवासेनेचे नेते साईनाथ दुर्गे यांनीही हाच आरोप केला आहे. शाई पुसण्यासाठी सॅनिटायझरचीही गरज नाही. शाई तशीच पुसली जाते, असे परब म्हणाले. तर मी आज सकाळी मतदान केले आणि घरी गेल्यावर डेटॉलने हात धुतला. तेव्हा शाई पूर्णपणे निघून गेली. हा गंभीर मुद्दा असून बनावट मतदानाची शक्यता निर्माण होते, असे दुर्गे यांनी सांगितले.




