मुंबई । प्रतिनिधी Mumbai
मालेगावसह राज्यातील सर्वच अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. सणांच्या दिवशी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या माध्यमातून काही ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारले जातात. अशा ठिकाणी वाळू-मातीचा वापर करून रक्तवाहन थांबवण्याची काळजी घेतली जाते, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अनधिकृत कत्तलखान्यांच्या संदर्भात आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना सामंत म्हणाले, मालेगावमधील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागात कत्तलखान्यांची स्थिती चिंताजनक आहे. अनधिकृतपणे चालणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई करणे अपेक्षित असून, काही ठिकाणी कारवाई झाली आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाला आणखी कडक सूचना दिल्या जातील आणि जेथे अवैध कत्तलखाने सुरू आहेत, तिथे तातडीने कारवाई करण्यात येईल.
मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी सोडल्याचा पुरावा सादर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याबद्दल चौकशी करून कारवाई केली जाईल. मोसम नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने १० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातील ५ कोटी २६ लाख रुपये मालेगाव महानगरपालिकेला देण्यात आली असल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली.




