Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : मुदतबाह्य व दूषित कॅडबरीचा साठा पकडला

Ahilyanagar : मुदतबाह्य व दूषित कॅडबरीचा साठा पकडला

अन्न प्रशासन विभागाची नगर शहरात कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar

शहरातील अशोका हॉटेल प्रिमायसेस, जीपीओ चौकाजवळील मे. धुपर अँड सन्स या आस्थापनावर अन्न प्रशासनाने मंगळवारी (30 सप्टेंबर) धाड टाकून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य व दूषित ‘कॅडबरी’चा साठा आढळून आला. तपासणीत भिंती व छताला आलेला ओलावा, पाणीगळती, बुरशी व अयोग्य साठवणुकीमुळे कॅडबरी ब्रँडचे विविध उत्पादने मानवी आरोग्यास घातक ठरू शकतात, असे स्पष्ट झाले.

- Advertisement -

दरम्यान, संबंधीत आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने दिले असून कॅडबरी उत्पादीत मोंडेलेज इंडिया फूड्स प्रा. लि. या कंपनीला नोटीस काढण्यात आली आहे. मंगळवारी अन्न प्रशासनाने तपासणी केली असता मोंडेलेज इंडिया फूड्स प्रा. लि. या कंपनीमार्फत उत्पादित कॅडबरी या ब्रँडचे अनेक प्रकार विक्रीसाठी ठेवलेले दिसून आले. मात्र गोदामाच्या भिंतींना आलेला ओलावा, छतामधून होणारी गळती व भिंतीलगत साठवलेले बॉक्स हे पूर्णतः भिजून खराब अवस्थेत असल्याचे आढळले. काही ठिकाणी बुरशी लागलेली होती.

YouTube video player

यावेळी मुदतबाह्य कॅडबरीचा मोठा साठा देखील सापडला. विशेष म्हणजे हा मुदतबाह्य साठा विक्रीयोग्य साठ्यालगत ठेवलेला होता. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर धोका असल्याचे निरीक्षण तपासणी पथकाने नोंदवले. अन्न सुरक्षा विभागाने या कारवाईदरम्यान कॅडबरी फाईव्ह स्टार या उत्पादनाचे नमुने घेतले असून 254 बॉक्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, डॉ. प्रदीप पवार, कि. ध. जगदाळे, उ. र. पाटील, सा. अ. मुल्ला तसेच नमुना सहाय्यक सा. सु. शेवंते यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बडे अधिक तपास करीत आहेत.

मोंडेलेज इंडिया फूड्स प्रा. लि. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये व्हेजिटेबल ऑइल/फॅट चा वापर होत असून, योग्य तापमानात साठवण न झाल्यास त्यात रासायनिक बदल होऊन आरोग्यास अपायकारक परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण अन्न प्रशासन विभागाने नोंदविले आहे. यासंदर्भात कंपनीला नोटीस काढण्यात आली असल्याचे बडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या