Friday, May 3, 2024
Homeजळगावहुश्श...ऑक्सिजनची समस्या सुटणार...!

हुश्श…ऑक्सिजनची समस्या सुटणार…!

किशोर पाटील – Jalgaon – जळगाव :

राज्यात सद्यस्थितीत अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विशाखापट्टणममधून ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून ऑक्सिनचा पुरवठा महाराष्ट्रात करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात फारसा ऑक्सिजनचा तुटवडा नाही. मात्र भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून, ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी डिपीडीसी आणि राज्य शासनाकडून निधीला मंजुरी मिळाली आहे.

- Advertisement -

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

काही अंशी तुटवडा असल्याची समस्या दूर झाली असली तरी ती कायमस्वरुपी नाही. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करणे अपेक्षित आहे.

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाने दिलेल्या निधीतून जळगाव जिल्ह्यात 10 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहेत.

यातील येत्या दोन दिवसात भुसावळ येथे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. इतरही प्रकल्पाबाबतचे प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आले असून येत्या दोन दिवसात मंजुरी मिळणार आहे.

त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनदृष्टया जिल्हा स्वयंपूर्ण होणार असल्याची माहिती आज गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

आठ ते दहा कोटींमधून प्रकल्प साकारणार

जळगाव शहरातील मोहाडी येथील महिला रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील भडगाव, चाळीसगाव, भुसावळ, तसेच चोपडा, रावेर, जामनेर, पारोळा, मुक्ताईर्र्नगर व अमळनेर अशा 10 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यानुसार या प्रकल्पासाठीचे शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या संपूर्ण प्रकल्पांसाठी एकूण आठ ते दहा कोटींचा खर्च लागणार आहे. यात जिल्हा नियोजन मंडळाचे पाच कोटी तर शासनाकडून मिळालेल्या 5 कोटी निधीचा समावेश आहे. यानुसार यातील पहिला प्रकल्प हा जिल्ह्यातील भुसावळ येथे साकारला जात असून त्याच्या कामाला एक ते दोन दिवसात सुरुवात होणार आहे.

एका प्रकल्पावर भरणार दररोज 1200 सिलेंडर

जिल्हयाला सद्यस्थितीत 40 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यानुसार सद्यस्थितीत 40 मेट्रीक टन एवढा ऑक्सिनजचा पुरवठा हा केला जात आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनचा आवश्यकता नसली, तरी भविष्यात ऑक्सिजनची समस्या, किंवा तुटवडा भासू नये म्हणून जिल्हयातच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारले जात आहेत. एका प्रकल्पाच्या निर्मितीला साधारण दोन ते अडीच महिन्यांचा काळ लागतो. भुसावळ येथे येत्या दोन दिवसात प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. इतरही प्रकल्पाचे प्रस्ताव पाठविले असून त्यालाही दोन दिवसात मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. मंजुरीनंतर एक एक करत तेही प्रकल्प साकारले जाणार आहेत. ऑक्सिजन निर्मितीच्या एका प्रकल्पावर साधारणपणे एका दिवसाला 1200 ते 1400 सिलेंडर भरले जातील एवढी क्षमता असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याठिकाणी जरी प्रकल्प असले तरी इतर ठिकाणी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा हा शासनाकडून होत राहिल असेही ते म्हणाले.

अंत्यत काटेकोरपणे व बचतीने ऑक्सिजनचा वापर करावा, अशा सुचना जिल्हयातील सर्व रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. राज्यभरात ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या यंत्रणेवर ताण निर्माण झाल्याने सद्यस्थिती ऑक्सिजन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कधी टँकरला पोहचण्यास उशीर होतो. लिक्विड ऑक्सिजनला अडचणी येतात. त्यामुळे आपण जरी पूर्ण नियोजन करत असलो तरी रुग्णालय स्तरावर जर ऑक्सिजनची बचत केली तरी आपल्याला फार अडचणी येणार नाही. मात्र तरीही रुग्णालयांनी बचत करणे आवश्यक आहे.

…तर रेमडेसीवीर, व्हेंटीलेटरची गरज नाही

गेल्या 15 दिवसांपासून नव्याने आढळून येणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. असे असेल तरी नागरिकांनी बेसावध राहू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे पालन करावे. कोरोनासंबंधित कुठलेही लक्षणे असतील तर नागरिकांनी तत्काळ चाचणी करावी. जेणेकरुन आपण गोळ्या औषधींवरच बरे होवू शकतो. रेमडेसीवीर किंवा व्हेंटीलेटरची गरज भासत नाही. या पध्दतीने नागरिकांनी सहकार्य केले तर आपण अजून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी करु शकतो, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या