पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यासह पाचेगावात रविवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. खरीप पेरणीसाठी शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसावर कपाशी लागवडीला वेग आला आहे. पाचेगाव, पुनतगाव परिसरात जवळपास चार इंच पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमापकावर झाली. पाचेगाव परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने जनता हैराण झाली होती. या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी दुपारपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. जवळपास दीड ते दोन तास दमदार पाऊस झाला. नंतर रात्री संततधार पाऊस झाला.
नुकत्याच लागवड झालेल्या पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. पहिलाच पाऊस असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परिसरात वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला होता. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे हाल झाले. पावसाने कुठलीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. हा पाऊस मशागतीला पूरक झाल्याने कपाशी लागवड करण्यासाठी शेतकर्यांची सकाळीच लगबग सुरु झाली होती. आणखी एक चांगला पाऊस झाला की खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, पेरणीला वेग येणार आहे.
रविवारी पाऊस झाल्याने शेतकर्यांनी गावातील कृषी सेवा केंद्रावर कपाशी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली. लवकरात लवकर कपाशी लागवड झाली पाहीजे म्हणून मजूर वर्गाकडे देखील गर्दी झाली. पाचेगाव परिसरात यंदा प्रथमच कपाशी लागवड जास्त प्रमाणात दिसून येत. गावातील 70टक्के क्षेत्र कपाशीने व्यापले आहे. त्या पाठोपाठ सोयाबीन क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी 4300 ते 4500 पर्यंत सोयाबीनला दर मिळाला होता. पण मागील वर्षात सोयाबीन दर जैसे थे असल्याने शेतकर्यांचा कपाशी लागवडीकडे कल दिसून येत आहे.