Friday, May 3, 2024
Homeनगरपाचेगाव येथे ऊस तोडणी कामगारांच्या दोन कोप्या जळाल्या

पाचेगाव येथे ऊस तोडणी कामगारांच्या दोन कोप्या जळाल्या

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडणी चालू आहे. गावात जवळपास बारा ऊस टोळ्या तर बावीस जुगाड आहे. शासनाच्या गट नंबर 89/1 येथे ऊस तोडणी कामगारांच्या दोन टोळ्या वास्तव्यास असून दुपारी कामगार ऊस तोडणीसाठी गेले असताना अचानक एका कोपीने पेट घेतला व दोन कोप्या जळाल्या. यात दोन ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाले.

- Advertisement -

प्रेमचंद विक्रम चव्हाण उबरखेड ता. कन्नड जि. औरंगाबाद येथील या मुकादमाच्या माध्यमातून बारा ऊस तोडणी कामगार आहेत. हे सर्व बारा ऊस तोडणी कामगार सरकारी जागेत राहतात.सकाळी सर्व काम आटोपून गावालगत असणार्‍या अनिल रामदास भिसे यांच्या ऊस क्षेत्रामध्ये ऊस तोडणी सुरू आहे.त्यामुळे कोप्यावर कोणीही नसताना दुपारी बारा ते एकच्या दरम्यान एक कोपी ने पेट घेतला. त्याच्या शेजारील कोपीने देखील पेट घेतला. कोप्याने पेट घेतला असताना त्यावेळेस ऊस तोडणी कामगारांचा ट्रॅक्टर चालक सोमनाथ चव्हाण ऊस खाली करून नुकताच आला असता त्याने हे पाहताच पेटलेल्या कोप्यांवर त्वरीत पाणी टाकून विझविण्यासाठी प्रयत्न केला. त्यात तो भाजून जखमी झाला पण कोप्यांची आग विझविण्यात अन्य कोप्यांपर्यंत आग पोहचू न देण्यात तो यशस्वी ठरला.

या आगीत दोन कामगारांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात भाऊसाहेब जाधव व कपिल मोरे या दोन कामगारांच्या कोप्या जळून संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या. त्यात धान्याच्या पाच गोण्या, कपडे, दोन्ही मिळून दहा ते बारा रुपयांची रोकड खाक झाली. एक बजाज कंपनीची (एमएच 42-7584) मोटारसायकल अर्धवट अवस्थेत जळाली. गॅस टाकीसह सर्व काही जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

गावातील अशोकचे संचालक यांनी घटनास्थळी पाहणी करून जेवढी मदत मिळवून देता येईल तेवढा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. घटनास्थळी अशोक कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब गुरसळ, दत्तात्रय देवकाते हे देखील मदतीसाठी हजर होते. तलाठी राहुल साठे यांनी फोनद्वारे संपर्क करून घटनेची माहिती घेतली व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

अशोक कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या कोप्याने अचानक पेट घेतला. त्यात त्यांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे आपण त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत करणार आहे. त्यातून ते जीवनोपयोगी वस्तू, काही धान्य, कपडे विकत घेऊ शकतात. कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यातून त्यांना थोडाफार हातभार मिळेल. तसेच गावातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी देखील त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा.

– नारायण चौधरी, मुख्य शेतकी अधिकारी, अशोक कारखाना

- Advertisment -

ताज्या बातम्या