नवी दिल्ली | New Delhi
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,दिवंगत अभिनेता धर्मेंद्र,गायिका अलका याग्निक यांच्यासह भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा समावेश आहे.
भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते.त्यांनी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांची महाराष्ट्रातील राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. यानंतर आता त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Padma Awards 2026 List : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील रघुवीर खेडकरांसह ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान
तसेच दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल गायिका अलका याग्निक यांना तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. पद्मश्री हा भारतामधील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
दरम्यान,आज (रविवारी) दुपारीच केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यात महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, अर्मिडा फर्नांडिस, श्रीरंग लाड, भिकल्या धिंडा, आयुर्वेद तज्ञ डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले यांना जाहीर झाला होता. त्यानंतर आता पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.




