नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
नारी वंदन विधेयकावरून (Nari Vandan Bill) सध्या देशभर घमासान सुरु आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने तर हा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा आणि आंदोलनाचा केल्याने सध्या सगळीकडे इंडिया आघाडीचा उद्धार सुरू आहे. दुसरीकडे, भाजपने कशी सर्वांचीच दिशाभूल केली हे विरोधक पटवून देत आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत हे सुरू राहील. नंतर आपसूक त्याला ब्रेक लागेल. महिला भगिनींचे आपणच कसे तारणहार हे बिंबवण्याचा हा प्रयत्न असला तरी तो कसा केविलवाणा आहे, हे नित्य घडणाऱ्या घटनांमधून सगळेच जण अनुभवत आहेत.

नाशिकमध्ये (Nashik) महिला शोषणाच्या प्रकरणांची सध्या लाट आली आहे. पण त्यापैकी केवळ टीसीएस प्रकरणातच भाजपच्या मंडळींनी रस घेतला. उर्वरित असंख्य महिलांच्या शोषणाच्या घटनांमधील पीडितांशी त्यांना काही एक घेणे दिसले नाही. महिलांविषयीचे हे असे बेगडी प्रेम सर्वांनाच कळते. ही अशी निवडक, सोयीस्कर माया भोळ्याभाबड्या जनतेला समजतेच असे नाही. विरोधकांच्या मते २०२३ लाच जर महिलांना संसद व विधिमंडळात आरक्षण द्यायचा निर्णय झालाय, तसा कायदाही झाला आहे, तर मग या विधेयकाची गरज काय तसेच तो कायदा गेली अडीच वर्षे एकाही निवडणुकीत भाजपने लागू का केला नाही, या प्रश्नांना अर्थातच ते उत्तर देणार नाहीत.
लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin) करामतीमुळे भगिनींच्या मतांचे हे ब्रह्मास्त्र आपल्यामागे ठाम असल्याची धारणा असल्याने भाजपने आता त्यांच्याशी संबंधित हा नारी वंदनचा मुद्दा पेटविण्याचे ठरविलेले दिसते. हे राजकारण असल्याने त्यांनी ते तसे करायचे ठरविले असेल तर त्यांना दोष देता येणार नाही. परंतु ते करतानाच दैनंदिन जीवनातही याच नारीला वंदन करण्याबाबत मात्र जी निवडक भूमिका स्वीकारली जाते त्याचे काय, हे जनतेने त्यांना विचारायला हवे. काही उदाहरणे नाशिकची असली तरी ती पुरेशी ठरावी. आणखीही बरेच पुरावे देता येतील. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के आरक्षण दिल्याचा गवगवा केला जातो. परंतु त्याच संस्थेत निवडून आलेल्या महिला नगरसेवकांना घरातच ठेवून त्यांचे पतीदेव म्हणजेच झेरॉक्स नगरसेवक जेव्हा सगळीकडे मिरवित राहतात, त्याचे काय? नाशिकमध्ये मध्यंतरी अशी बरीच प्रकरणे घडली. त्याविषयी भाजपने अद्याप तरी अवाक्षर काढलेले नाही. संबंधित झेरॉक्सवाल्यांना काही सूचना वा निर्देश दिल्याचे अजून तरी कानावर नाही.
असाच एक प्रकार गेल्या आठवड्यात मालेगावी घडला. मालेगाव महापालिकेत शिक्षण व आरोग्य या विषयावर राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. शासकीय बैठक असल्याने लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी असे सगळेच उपस्थित होते. सगळं काही व्यवस्थित होते, एकच कमी दिसली. ती म्हणजे महिला लोकप्रतिनिधींच्या ऐवजी वा त्यांच्यासोबत त्यांचे पती, मुले आदींची तेथील उपस्थिती. खरे तर ही अधिकृत शासकीय बैठक असल्याने त्यात असा कुटुंबकबिला उपस्थित राहणे योग्य तर नाहीच; पण नियमाने बघितले तर बेकायदेशीरही होता, दस्तुरखुद्द दादा भुसे यांच्या कुटुंबियांपैकी कोणी कधी असा हस्तक्षेप केलेला यापूर्वी दिसलेला नाही, त्याचमुळे त्यांनी, हे चालणार नाही असे तेथेच जर ठणकावून सांगितले असते तर ते खऱ्या अर्थाने नारी वंदन झाले असे म्हणता आले असते.
आमदार मौलाना मुफ्ती (MLA Maulana Mufti) यांनाही यात काही वावगं वाटू नये, हे समजता येईल. कारण त्यांच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण हा विषयच गैरलागू आहे. सध्या भाजपच्या हाताला हात लावून मम म्हणण्यापलीकडे शिवसेनेलाही फारसं काही काम राहिलेले दिसत नाही. नारी वंदन विधेयक पडल्यानंतर भाजपपेक्षाही व्याघ्र गतीने शिवसेनेच्या वाघिणींनी काँग्रेसच्या निषेधाचे आंदोलन करीत बाजी मारली. पण, त्यांनाही मालेगावात आपलेच भाईबंद आपल्या भगिनींच्या हक्कावर गदा आणून त्यांच्याजागी स्वतःची टिमकी वाजवितात याचे काहीही वैषम्य वाटले नाही. गेला बाजार नाशिकच्या झेरॉक्स नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांत जे उद्योग केले त्याबद्दल तरी त्यांनी आवाज उठवावा ना. पण त्याबाबतही किमान निषेधाचे दोन शब्दसुद्धा नाही. नारी वंदनाचे केवळ भोंगे वाजवायचे, प्रत्यक्षात महिला चार भिंतीतच कशा राहतील याचीच काळजी घ्यायची, हे असेच चालले आहे. बरे यात केवळ भाजप वा शिवसेना आहे असेही नाही.
सगळ्याच पक्षांना नव्हे तर अगदी स्री दाक्षिण्याचा आव आणणाऱ्यांनाही भगिनींचा असा सार्वजनिक वावर, मिळणारा मानमरातव खटकत असतो. प्रसंगोपात मनातील या विषयीच्या भल्याबुऱ्या भावनांचे प्रदर्शन होत असतेच. म्हणूनच किमान लोकप्रतिनिधी वा सार्वजनिक वर्तुळात वावरणाऱ्या मान्यवरांनी तरी उक्ती-कृतीत फरक ठेवता कामा नये. नारी वंदना ही केवळ बोलबच्चनगिरीसाठी नसावी. भगिनीभाव हा मनाच्या तळकोपऱ्यातून यायला हवा. जे अंतःकरणपूर्वक असते ते आपसूक चेहऱ्यावर झळकते. त्यातील प्रामाणिक भाव सहजच दिसून येतो. त्यासाठी विनाकारण उठाठेव करावी लागत नाही. नारी, ही सदैव पूजनीय असावी, केवळ निवडणुका आल्यावरच नसावी.




