पंधरवड्याच्या आत भारतीय जनता पक्षाच्या दोघा माजी नगरसेवकांना तुरुंगात जावे लागले. हत्या, हत्येच्या कटात सहभाग अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे या दोघांच्या नावावर आहेत. उद्धव निमसे व जगदीश पाटील या दोघांचाही पूर्वेतिहास हा काही गुन्हेगारी स्वरुपाचा नाही. दोघांचीही आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. निमसे तर खानदानी श्रीमंत आहेत. गेली अनेक वर्षे दोघेही सक्रिय राजकारणात आहेत. निमसेंचा विषय हा दोन गटातील जुन्या संघर्षाचा, तर दोन गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षात पाटील यांचे नाव आले. या गुन्ह्यांंमुळे दोघांचेही राजकीय भविष्य जवळपास संपल्यात जमा आहे.
निमसे यांना तर विधानसभेची आस होती. दुर्दैवाने आता त्यांना ती सोडून द्यावी लागेल. दोन्ही घटना या नाशिक पूर्व विधानसभेच्या म्हणजेच पंचवटी विभागाच्या कार्यक्षेत्रात घडल्या आहेत. दोन्ही घटनांमागे राजकीय कथानके आहेत वा तशी असावी अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या भागात विरोधकांना जेरीस आणण्यासाठी जे जे शय आहे ते ते केले जात असल्याने अशा घटनांमागेही तेच राजकारण असल्याची चर्चा होत राहते. नाशिक पूर्व मतदारसंघ यावेळीही विशेष गाजला तो भारतीय जनता पक्षातीलच दोघांमधील लढाईमुळे. आमदार राहुल ढिकलेंना त्यांच्याच पक्षातील मातब्बर नेते गणेश गिते यांनी आव्हान दिले होते. उमेदवारीत ढिकलेंची बाजू वरचढ ठरल्याने गितेंना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दत्तक घेतले. ढिकलेंचा प्रभाव असल्याने त्यांची सरशी झाली.
गेल्या, म्हणजेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांना डावलून पक्षाने राहुल ढिकले या मनसेतील आयात उमेदवाराला निवडले होते तेव्हाही सानप यांनी राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही घडली. दोन्ही वेळेस राष्ट्रवादीला तोंडघशी पडावे लागले. पुढे सानप स्वगृही आले तसेच गितेही आले. दोन्ही घटनांमध्ये कमालीचे साम्य वाटत असले तरी सध्या जो काही राजकीय ङ्गगेमम करण्याचा प्रकार चालू झाला आहे, तसा पूर्वी झाला नाही. नाही म्हणायला बाळासाहेब सानप यांना पक्षात वा संघटनेत काहीच मिळणार नाही, याची नेमकी व्यवस्था संबंधितांनी केली. गिते व त्यांना समर्थन करणार्यांविरोधात मात्र त्यापेक्षाही जहरी कारवाया सुरू असल्याचे यानिमित्ताने सांगितले जाते.
या सगळ्या प्रकारामागे ढिकले असल्याची चर्चा होत असली तरी ढिकले एवढ्या खालच्या थराला जाणार नाहीत, असा लोकांना विश्वास आहे. ढिकलेंच्या वाढदिवसाला अलिकडे जी मंडळी गावभर फलक लावतात, त्यात गुंड-पुंड मंडळींचा वाढता सहभाग हा मात्र चिंताजनक वाटावा असाच. अर्थात, त्यात ढिकलेंनाही दोष देता येणार नाही. कारण खुनापासून ते गोळीबारापर्यंत भारतीय दंड विधानाची अनेक कलमे अंगाखांद्यावर ङ्गभूषविणारीफ अनेक मंडळी ही भारतीय जनता पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्यावर त्यांनी आपल्या ङ्गलाडयाफ आमदाराला शुभेच्छा दिल्या तर बिघडले कोठे? ज्या, सागर जाधव याच्यावर गोळीबार झाल्याप्रकरणात जगदीश पाटील यांना अटक झाली तो जाधव हा ढिकले समर्थक असल्याचे अशाच फलकांवरून दिसते.
याशिवाय पाटील यांनी निवडणुकीत गितेंचा प्रचार केला होता, हा आणखी एक योगायोग! या प्रकरणात आणखी एका बड्या नेत्याचाही ङ्गगेमम होणार असल्याची चर्चा आता सुरू आहे. अशा चर्चांना शेंडाबुडखा नसला तरी तशा त्या होणे हे अधिक वाईट. राकेश कोष्टी व व्यंकटेश मोरे हे दोघे अनुक्रमे भाजपच्या कामगार सेल व माथाडी सेलचे पदाधिकारी आहेत. दोघांवरही मुबलक गुन्हे आहेत. याशिवाय हेमंत शेट्टी, कमलेश बोडके या आणखी दोघा माजी नगरसेवकांसह रोहित कुंडलवाल या खासगी सावकार असलेल्या भाजपच्या पदाधिकार्यावरही गुन्हे आहेत. गजू घोडके मारहाण प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते अशा सुनील बागूल, मामा राजवाडे व भगवंत पाठक यांनाही मोठ्या सन्मानाने भाजपमध्ये पावन करून घेतले गेले. हाच अनुभव तत्पूर्वी सुधाकर बडगुजर यांच्यासंदर्भात आला.
तेव्हा तर आमदार सीमा हिरेंसह समस्त पदाधिकार्यांनी विरोध करूनही त्यांनाच गप्प केले गेले. रम्मी राजपूत, मुकेश शहाणे, अर्जुन पगारे, विक्रम नागरे अशी कितीतरी नावे घेता येतील, की ज्यांना त्यांचा गुन्हेगारीचा इतिहास असतानाही भाजपने आपल्या पंखाखाली घेतले. त्यामुळेच सध्या पंचवटीत गुन्हेगारीचा जो काही हैदोस सुरू आहे, त्यातील असंख्य लोकांना राजकीय आशीर्वाद असल्याची गुप्तचर खात्याची माहिती आहे. नाशिककरांच्या दुर्दैवाने गावावरून ओवाळून टाकण्याच्या लायकीची ही मंडळी जेव्हा चौकाचौकातील फलकांवर लोकप्रतिनिधींच्या खांद्याला खांदा लावून चमकताना दिसतात, तेव्हा लोकांसह कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्यांनीही त्यातील मथितार्थ समजून घ्यायचा असतो. अलिकडे सर्रास गोळीबार होतात, भररस्त्यात मुडदे पडतात, गुंडमंडळी राजरोस झुंडशाही करतात, अंमली पदार्थाची खुलेआम तस्करी चालते, कोणीही वाट्टेल तेव्हा कोणाचेही अपहरण करतो तरीही लोकप्रतिनिधी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून असतात. त्यांना यात काहीही वावगे वाटत नाही.
पोलिसांना जाब विचारावासा वाटत नाही. राजकीय विरोधकांना मात्र निवडून लक्ष्य केले जाते. ही सारी अराजकाची नांदी आहे. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या व जगातील सर्वाधिक मोठी अशी स्वयंसेवी संस्था म्हणून नावाजलेल्या नैतिक सामर्थ्याचा मेरुमणी समजल्या जाणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात हे सारे चालले आहे, हे अधिक काळजी वाढविणारे आहे. यावर काळ नाही, तर पक्षाच्या मुखंडांनाच उपाय शोधावा लागणार आहे.




