Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : मरण स्वस्त झाले आहे….

पडसाद : मरण स्वस्त झाले आहे….

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक

जगणे दिवसेंदिवस महाग बनत चालले असताना मरण मात्र दिवसागणिक स्वस्त होत चालल्याचा विदारक अनुभव हल्ली वारंवार येतो. मुंबईतील जनजीवन आधीच बेभरवशाचे, त्यातच लोकलच्या गर्दीमुळे जीव गमावणार्‍यांची रोजची संख्याही दोन अंकी. परंतु दोन लोकल जात असताना रेल्वेच्या दारात उभे असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने ते पडले आणि पाच ते सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू होतो, हा भारतात मरण कशानेही होऊ शकते याचा दु:खद अनुभव. असाच अतिशय हृदयद्रावक अनुभव जिल्ह्यातील कळवण या तालुक्याच्या गावातील लोकांनी घेतला.

- Advertisement -

कळवणमधील हमरस्त्यावर मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका निरपराध वृद्धाचा दारूण अंत झाला तर आणखी एक जखमी झाला. रस्त्याने जात असताना अचानक दोन गायी एखाद्या शत्रूप्रमाणे हल्ला करतात, कोणालाही न जुमानता दिसेल त्याला शिंगावर घेतात, लाथांनी तुडवतात. हे ऐकले तरी अंगावर भीतीने सरसरून काटा येतो. या घटनेचा व्हिडिओ बघितला तर हृदयाचा ठोकाही चुकेल. घटना अत्यंत दुर्दैवी. त्याबद्दल कितीही दु:ख व्यक्त केले तरी कमीच. ज्यांचा या आकस्मिक घटनेत बळी गेला ते भालचंद्र मालपुरे हे 80 वर्षीय वृद्ध गायींच्या हल्ल्यात सापडले अन् बघता बघता जीवानिशी गेले. त्यांना वाचवायला गेलेल्यावर ही माणुसकीही अंगलट आली.

YouTube video player

साक्षात गोमातांनी हे कृत्य केल्याने बोल कुणाला लावायचा असा प्रश्नही अनेकांना तेव्हा पडला. कथित गोरक्षकांची यावर नेमकी काय भूमिका आहे ते अद्याप कळले नाही. मात्र, गावोगावी अशा मोकाट जनावरांच्या रस्तोरस्ती ज्या छळछावण्या सुरू आहेत, त्यावर ठिकाठिकाणचे प्रशासन काही लक्ष घालणार आहेत की नाही, असा सवाल विचारावासा वाटतो. एकट्या कळवणमध्ये या मोकाट गायींच्या दहशतीचा एक-दोन दिवसाच्या अंतराने दोन-चार लोकांना तरी ‘प्रसाद’ मिळतोच. गोमातेचा प्रसाद समजून लोक गप्प बसतात. डॉक्टरांकडे जाऊन जखमांवर मलमपट्टी करून नशिबाला दोष देत बसतात. या गोमातांना हाकलले तरी काही गोरक्षकांना राग येतो. साहजिकच आजकाल जनावरांचा हा छळही लोक गपगुमान सहन करताना दिसतात.

सटाणा शहरातही किमान तीन-चारशे मोकाट जनावरे असाच हैदोस घालताना दिसतात. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री तर गायींना गवताची पेंढी खाऊ घालण्याची एक संस्कृतीच बहरली आहे. नाही दिली तर गवत विकणार्‍यांच्या संतापाचे धनी व्हावे लागते. गावोगावी ही जनावरे अस्वच्छता करून ठेवतात ती तर आणखी वेगळीच समस्या. नाशिक शहर व उपनगरांतही या जनावरांचा उच्छाद काही नवा नाही. हल्ली माणसांप्रमाणे ही मुकी बिचारी जनावरेही कधी हिंसक झाली ते कळले नाही. परंतु चालता चालता ते कधी येऊन शिंगावर घेऊन भिरकावून देतील किंवा ढुशी मारून पाडतील याचा नेम राहिलेला नाही. कळवणच्या दुर्दैवी घटनेनंतर तरी अशा प्रकरणातील बेजुबान ग्रस्तांनी तक्रारी करायला हव्यात. कारण ही जनावरे मोकाट असली तरी ती बेवारस नसतात. त्यांना मालक असतात. दिवसभर गावभर फिरून मिळेल ते चरून ही जनावरे सायंकाळी बरोबर मालकाच्या ठिय्यावर येतात, असा अनुभव आहे.

नाशिकच्या काही उपनगरांत तर काही पुढार्‍यांच्या मालकीचीच ही जनावरे असल्याचे मध्यंतरी कळले होते. वास्तविक एवढीच भूतदया असेल तर या मंडळींनी या जनावरांच्या पालनपोषण व संगोपनाची जबाबदारीही घ्यायला हवी. पण हे कर्तव्य झुगारून हे लोक सकाळीच या गोवंशांना मोकाट सोडून देतात. त्यांनाही पोटपाणी असल्याने मिळेल त्यावर गुजराण करत सायंकाळी पुन्हा मालकाकडे परततात. काही मिळाले नाही, अथवा कुत्र्यांनी भुंकून सळो की पळो करून सोडले तर ही जनावरेही हिंसक बनतात. त्यातून हे असले गंभीर प्रकार घडतात, असे काही अभ्यासक सांगतात. यावर एकच उपाय आहे, एकतर स्थानिक लोकप्रशासनाने अशा मोकाट जनावरांना पकडून गोशाळा चालवणार्‍यांकडे द्यावे. पूर्वी यासाठी अधिकृत कोंडवाडे असत. आजही काही पालिकांमध्ये तशी व्यवस्था आहे. मात्र, या जनावरांच्या पालनपोषणाचा खर्च कसा व किती करायचा याबाबत काहीही निर्देश नसल्याने हे विकतचे दुखणे नको, असा विचार कर्मचारी करतात. अनेकदा अशी जनावरे पकडल्यावर त्यांच्या मालकांचा शोध घेऊन दंडही केला जातो. पण रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीनुसार हा विषय आता कोणीच मनावर घेत नाही. पांजरापोळ चालवणार्‍यांनी या जनावरांना दत्तक घेण्याचाही मध्यंतरी प्रयत्न केला. पण अशावेळी त्यांच्या मालकांना मात्र प्रेमाचा पान्हा फुटतो. ते तयार होत नाही. कारण या जनावरांवर काहीही खर्च न करता त्यांच्यापासून दूध, शेण, गोमूत्र याद्वारे जी कमाई चालू असते ती त्यांना सोडायची नसते.

कळवणच्या घटनेने मात्र हद्द झाली असा विचार करून प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. खरे तर कळवणमध्ये ज्या कोणाच्या मालकीची ही खुनशी जनावरे होती त्यांना सर्वप्रथम ताब्यात घ्यायला हवे. कोणा एकावर कारवाई केली तर गावोगावच्या अशा गो-दांडग्यांना योग्य तो संदेश जाऊ शकेल. तसे झाले तर भालचंद्र मालपुरेंसारखे अनेक निष्पाप जीव वाचू शकतील. यानिमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या मरण स्वस्त होत आहे, या पुस्तकाची आवर्जून आठवण होते. गोरगरीब व कंगालांच्या दैनंदिन जीवन संघर्षातल्या हिंसेचा व हिंस्त्र स्वार्थाचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला. अर्थात तो मानवी हिंसेशी संबंधित होता. अशा हिंसा तर आज जणू जगण्याचाच भाग झाल्या आहेत. परंतु त्याही कमी झाल्या म्हणून की काय आता मुकी बिचारी कोणीही हाका या सहानुभूतीची हकदार असलेली जनावरेही हिंसेवर उतरू लागली असेल तर रस्त्याने चालणार्‍यांनी खरोखरच कोणाच्या हवाल्यावर जगावे?

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...