Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : नेत्यांच्या गोकुळात आनंदी आनंद

पडसाद : नेत्यांच्या गोकुळात आनंदी आनंद

नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

- Advertisement -

महापालिका निवडणुकीत राज्यभर सध्या सर्वच पक्षांमध्ये जो काही सार्वत्रिक राडा चालू आहे, तो पाहता भारतात राजकारणातील कार्यकर्त्यांना कधीच मरण नाही, याची प्रचिती येते. पालिकेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांना समाजसेवेची जी उबळ आलेली दिसतेय, ती नंतरही टिकेल का? एकेका जागेसाठी असंख्य इच्छुक असताना ज्याला उमेदवारी मिळाली त्याविरोधात बाकीचे सर्व आकांत करीत आहेत. हे दु:ख उमेदवारी नाकारल्याचे आहे, हे उघड आहे. या हजारो इच्छुकांपैकी एकानेही उमेदवारी मिळाली नाही तरी मी माझे समाजाप्रती असलेले इतिकर्तव्य पार पाडीनच, असा शब्द ना पक्षाला ना मतदारांना दिला. दोन दिवस हा सारा आकांत चालेल. माघारीची किंमत वसूल झाली तर काहींचा उत्साह आपसूक मावळेल.

YouTube video player

काहींना आपल्यावरील अन्यायाचा बदला घ्यावा वाटत असेल तर ते दुप्पट उत्साहाने पाडापाडीचे उद्योग सुरू करतील. हे असे एकीकडे चालू असतानाच राजकीय पक्षातील नेत्यांनी आपापला कुलोद्धार कसा केला, याच्याही खमंग चर्चा चालू असतील. घराणेशाहीविरोधात सातत्याने कंठशोष करणार्‍या भारतीय जनता पक्षाने तर यंदा आपले सगळेच तत्त्व, मूल्ये खुंटीला टांगून ठेवलेले दिसते. आमदार-खासदारांच्या मुला-मुलींना उमेदवारी द्यायची नाही, असा अत्यंत चांगला, उत्तम असा निर्णय एकीकडे पक्षाने घेतला आणि राजधानी मुंबईतच त्याला स्वहस्ते हरताळ फासला. नाशिकमध्ये पक्षाचा हा निर्णय देवयानी फरांदे व सीमाताई हिरे या दोन आमदारांनी कटाक्षाने पाळून आपापल्या वारसांच्या राजकीय कारकीर्दीचा अपमृत्यू केला. पण एकेका प्रभागावर वरवर नजर टाकली तरी जवळपास सगळीकडेच नेत्यांचे गोकुळ नांदताना दिसते आहे. दोन महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या घरात तीन तर चार दिवसांपूर्वीच आलेल्या दिनकर पाटील यांना दोन उमेदवार दिले गेले आहेत. हे असे का याचे उत्तर कोणी देणार नाहीत. पण निवडून येण्याची क्षमता हेच उत्तर मिळेल.

फक्त निवडून येण्याचेच निकष असतील तर मग प्रकाश लोंढे, पवन पवार आदींनी काय घोडे मारले? त्यांनाही वॉशिंगमधून काढून स्वच्छ करता आले असते ना. नाही तरी मुकेश शहाणेंपासून ते पार निमसेंपर्यंत उमेदवारी दिलीच ना. शहाणे यांचा पक्षातच गेम झाल्याने अर्ज फेटाळला गेला असला तरी कदाचित नियतीलाच ते मान्य नसावे. बडगुजर यांच्यावर पक्षाची एवढी मेहेरबानी का, असा प्रश्न विचारायचीही काही सोय राहिलेली नाही. कारण पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांची कन्या नूपुर, विजय सानेंचे चिरंजीव अजिंक्य, माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र, सुनील बागुल यांचे पुत्र मनीष, माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या नयना, माजी महापौर अशोक दिवेंचे चिरंजीव प्रशांत, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या, माजी महापौर विनायक पांडे यांची सून अदिती, माजी महापौर यतीन वाघ यांच्या सौभाग्यवती हितेश, आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश, आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आडके, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या सौभाग्यवती योगिता, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली, माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांची पत्नी कल्पना व भाऊ कैलास यांना उमेदवारी बहाल झाली आहे.

याव्यतिरिक्तही काही नातेवाईक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपमधील नातेवाईकांचे हे असे गोकुळ मस्तपैकी नांदताना दिसत असताना ते मात्र काँग्रेसच्या घराणेशाहीविरोधात ठणाणा करतात. एवढेच नव्हे तर ज्या गिरीश महाजनांना या उमेदवारी वाटपात व्हिलन ठरविले जात आहे, त्यांचे स्वीय सचिव स्वप्निल नन्नावरे यांच्या पत्नी रूपाली यांचेही या गोकुळात भले झाले आहे. अर्थात गोकुळात रंग भरण्याचा उद्योग केवळ भाजपने केलाय असे नाही तर त्यांचे सत्तेतील भागीदार शिवसेना व राष्ट्रवादी तसेच उबाठा, काँग्रेस व गेलाबाजार आरपीआयनेही आपापल्या नेत्यांचे गोकुळ आनंदाने आपले मानले आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांच्या चिरंजीवांनी अखेरच्या क्षणी शिवसेनेत उडी मारली अन् उमेदवारीही मिळविते झाले. माजी स्थायी समिती सभापती उत्तमराव कांबळे यांचे चिरंजीव जॉय कांबळे, माजी महापौर अशोक दिवेंचे दुसरे सुपुत्र राहुल यांचीही चांदी झाली आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेनाही यात मागे राहिलेली नाही. माजी आमदार-महापौर वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश तसेच त्यांच्या विहीण माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे चिरंजीव योगेश आदींनाही उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू यांनी भाजपमध्ये जाऊन उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊनही नकारघंटा मिळाल्यानंतर माजी आमदार नितीन भोसले यांच्या भावजयी रश्मी भोसले यांना शिंदेंच्या शिवसेनेने प्रवाहात आणले. एकूणच कार्यकर्त्यांची निवडणूक अशा सोज्वळ शब्दात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची भलामण केली जात असली तरी प्रत्यक्षात कार्यकर्तेही निवडक असतात हेच खरे. सामान्यांच्या नशिबी फक्त बोंबा मारणे आणि नंतर रडारड एवढेच असते. लोकशाही झिंदाबाद.

ताज्या बातम्या

“दैवतं पळवण्याचा निर्लज्जपणा, गुजरातमध्ये सगळे बकासूर…”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून संजय...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीबाबत केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड...