नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. देशदूत- सल्लागार संपादक
शब्दा नाहीं धीर |
ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥
-संत तुकाराम
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या अस्थिर बुद्धी अन् अधीर वर्तनाने सध्या कमालीचे अडचणीत आले आहेत. पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी एकदा नव्हे दोनदा समज दिल्यानंतरही कोकाटेंचे वाक्तांडन थांबत नसल्याने हा प्रसिद्धीचा स्टंंट तर नाही ना, अशी शंका आता येऊ लागली आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटेंच्या वर्तनाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर यासंदर्भातील कारवाई पक्षाचे नेते करतील, अशी पुढची भाषा केली. त्यानंतरही कोकाटे केवळ आपल्या वर्तनावर ठाम राहिले असे नाही तर नव्याने वादळ उठविणारे भाष्यही करून बसले.
याचा अर्थ मला व माझ्या मंत्रिपदाला कोणीही हात लावू शकत नाही, असा गर्भितार्थ तर त्यातून त्यांना सुचवायचा नाही ना? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचे सभागृहातील वर्तन योग्य नव्हते असे भाष्य केल्यानंतर, ‘टीव्हीवरील दृश्य पाहून ते असे म्हटले असतील. माझ्याशी बोलल्यावर त्यांचे मत बदलेल’, अशी मल्लिनाथी कोकाटेंनी केल्याने मुख्यमंत्र्यांना डोयावर हात मारून घेण्याची वेळ आली असेल. एका पत्रकार परिषदेत त्यांनी, रमी खेळलो तर काय गुन्हा केला, मी काही कोणाचा विनयभंग तर केला नाही ना अशी आव्हानाची भाषाही केली. एवढेच नव्हे तर शेतकरी भिकारी या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत खरे तर शेतकरी नव्हे हे सरकारच भिकारी आहे, असा शाब्दिक बॉम्बगोळाही टाकला. हे ऐकल्यानंतर दस्तुरखुद्द अजित पवार तर अज्ञातस्थळीच निघून गेले. सारा गाव कोकलत असतानाही कोकाटेंना मात्र आपले काहीच चुकले नाही, असे वाटत आहे. आपल्याविरुद्धच्या बदनामीचा हा कट असल्याचा जावईशोधही त्यांनी लावला. कोकाटे यांची बदनामी कोण, कशासाठी करेल, हा प्रश्न आहेच. सध्या सिन्नरमध्ये त्यांचे एकमुखी नेतृत्व आहे.
खासदार राजाभाऊ वाजेंनीही स्वभावधर्मानुसार आपली वेगळी वाट धरली आहे. ते कोकाटेंच्या कोणत्याच वक्तव्यावर व्यक्तही होत नाही आणि टीकाही करीत नाहीत. आपण बरे, आपला पक्ष बरा ही त्यांची भूमिका. पण कोकाटेंचे तसे नाही. एकतर मंत्री झाल्यामुळे त्यांना झालेला आनंद अद्याप सरलेला नाही. अशातच जे खाते मिळाले त्यात तसा काही राम नाही हे लक्षात आल्यावर ही ओसाड गावची पाटीलकी आपल्याच वाट्याला यावी ना, असा ‘राग’ त्यांनी आळवला. या ‘रागदारी’तूनही ते अद्याप बाहेर पडलेले नाहीत. मंत्रिपद मिळाले खरे, पण ते मिरवताच येत नाही, ही त्यांची खरी व्यथा! साहजिकच, साध्या घटनेतूनही त्यांच्या स्वभावातील शीघ्रकोपीपणा उफाळून येतो. भले ते त्यासाठी परखड, निर्भीड, स्पष्टवक्ता अशी गुणविशेषणे स्वत:लाच लावत असले तरी त्यामागील उथळ, स्वैर आणि फटकळपणा लपून राहत नाही. गावगाड्याच्या राजकारणापासून खरेतर त्यांनी सुरुवात केली.
पंचायत, जिल्हा परिषद, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिल्हा बँक आणि अखेरीस विधानसभा अशी चढत्या भाजणीची त्यांची राजकीय कारकीर्द आहे. माणसं हेरणं, त्यांना जोखणं आणि त्यांच्याकडून कामे करवून घेणे ही या काळातील त्यांची खासियत होती. तोंडात येईल ते बोलून मोकळे व्हायचा त्यांचा स्वभाव पूर्वीपासून होता हे खरे असले तरी शारीरिक व राजकीय वाढत्या वयात अधिक समजंसपणा येणे अपेक्षित होते. विशेषत: मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तर हुशारीबरोबरच समजूतदारपणा यायला हवा होता. प्रत्यक्षात झाले उलटेच. विरोधी पक्षात असताना असायला हवा तशा आक्रमकपणाला सत्तारूढ बाकावर बसवल्यानंतर नियंत्रित करता आले पाहिजे होते. मंत्री म्हणून त्यांचा ना सभागृहात काही प्रकाश पडला ना बाहेर! उलट बाहेर तर त्यांनी आपल्या वाचाळ बडबडीने अक्षरश: वात आणला.
विशेष म्हणजे माध्यमांपासून ते त्यांच्या पक्षातीलही लोक त्यांना हे वागणे बरे नव्हे असे सांगत असताना माणिकरावांना त्यात काही चुकले आहे हेच पटत नसल्याने दगडावर डोके आपटूनही फायदा नाही, असे त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांना वाटत असेल तर त्यांनाही दोष कसा देता येईल? मंत्री झालो म्हणजे दुनिया मुठ्ठी में आली असा समज त्यांचा एकतर झालेला दिसतो किंवा कोणीतरी करून दिलेला दिसतो. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनाही अशाच काही वक्तव्यांचा त्रास झालेला असल्याने पुढच्यास ठेच मागचा शहाणा होणे गृहीत धरले होते. कोकाटेंच्या बाबतीत मात्र पुढच्यास ठेच तर मागचा थेट जायबंदी असा अनुभव येत आहे.
विरोधकांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोर लावला असल्याने येत्या दोन-चार दिवसांत काहीतरी निर्णय कदाचित होईलही. आता राजीनाम्याऐवजी खातेबदलाचा प्रस्ताव पुढे आला आहे. धनंजय मुंडेंपाठोपाठ कोकाटेंवरही कारवाई झाली तर अजित पवारांना पक्ष सांभाळणे अवघड जाऊ शकते. कारण सहकारी आमदारांमध्ये अविश्वास बळावू शकतो. हे लक्षात आल्यानंतरच कोकाटेंची भाषाही बदललेली दिसते. अर्थात, सततच्या वादग्रस्त वर्तनाला पाठीशी घातल्याने पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेवर होणार्या परिणामांचाही विचार अजित पवारांना आज ना उद्या करावाच लागेल. तोपर्यंत कोकाटेंना जाग येऊन ते भानावर आले तर उत्तमच!




