नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै.’देशदूत’ – सल्लागार संपादक
उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी एक उक्ती किंवा म्हण शालेय जीवनात प्रत्येकाने ऐकली असेल. तेव्हा अनेकांना त्याचा नेमका अर्थ लागलाही नसेल कदाचित. परंतु एखाद्या प्रवासाला जाताना नदी दिसली व ती खळखळ वाहत असली तर त्या म्हणीचा याच्याशीच काहीतरी संबंध असावा, असे वाटायचे. पुढे ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे ऐकायला यायला लागले. कृष्णा नदी संथ वाहते कारण तिचा तळ खोल आहे. पाणी जेव्हा उथळ असते तेव्हा ते खळखळ वाहत जाते, उथळपणामुळे आवाजही येत असतो. संथ वाहणारी नदी ही धीरगंभीर भासते. दोन्ही नद्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यात उथळपणा व गांभीर्य सामावले आहे. ही रुपकता मनुष्य स्वभावात दिसली की त्याला मग ती विशेषणे लावली जातात.
हे सारे नदीपुराण आठवण्याचे कारण म्हणजे, बहुचर्चित मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते अखेर बदलण्यात आले ही बातमी! गेले काही महिने किंबहुना मंत्री झाल्यापासूनच माणिकराव आपल्या बेधडक बोलण्यामुळे सतत चर्चेत राहिले. पुढे पुढे या चर्चेचा बेलभंडारा उधळला. चर्चा होतेय म्हटल्यावर माणिकरावांचा स्वभावही उफाळून आला. त्यांच्या दुर्दैवाने नेमके याच वेळेस त्यांना सदनिका प्रकरणात शिक्षा झाली. तेव्हा झालेल्या टीकेच्या भडीमाराने तसेही ते माध्यमांवर भडकलेले होतेच. साहजिकच कुठेही गेले अन् माध्यमांचे प्रतिनिधी दिसले की यांचे डोके ठणकायचे. त्यातून अनेकदा काहीतरी बोलले जायचे. बिनधास्त स्वभावामुळे असेल, पण जाहीरपणे बोलायच्या नसतात अशा गोष्टी त्यांच्याकडून बोलल्या गेल्या. नंतर तर टाइमपास म्हणून भर सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग पक्षासह सरकारही हादरले. त्यांच्यावरील कारवाईच्या अफवांना ऊत आला.
आपल्याला टार्गेट केले जात असल्याच्या रागातून पुन्हा नवी काही विधाने त्यांच्याकडून साहजिकच केली गेली. त्याचा परिणाम असा झाली की, तोपर्यंत फक्त अजितदादाच नाराज झाले होते, आता तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच संतापले. त्यांनी भर मंत्रिमंडळात कोकाटेंसह बोलबच्चनगिरी करणार्या सर्वच मंत्र्यांना तंबी दिली. अर्थात, या फक्त तंबीमुळे सर्वांनाच अभय मिळाल्याची भावना झाली. कोकाटेंनीही वाचलो म्हणून हुश्श केले. परंतु जनभावना जोखण्यात माहिर असलेल्या अजितदादांना हे प्रकरण पुढे त्रासदायक ठरू शकेल, असे वाटू लागले. त्यांनी किमान खाते तरी बदलूया असा विचार केला आणि माणिकरावांचे कृषी खाते बदलून ते दत्ता भरणे यांच्याकडे सोपवले. भरणेंकडे असलेले क्रीडा व युवक कल्याण हे तुलनेने दुय्यम खाते कोकाटेंकडे सोपवून द्यायचा तो इशारा दिला गेला, असे समजले जात आहे. घोडा का अडला? भाकरी का करपली? या प्रश्नांची उत्तरे माहीत असल्याने अजितदादांनी ठरवलेला बदल करून यापुढे हा विषय करपून त्याची झळ आपल्याला बसणार नाही याची नेमकेपणाने काळजी घेतलेली दिसते.
गंमत बघा, माणिकराव कोकाटेंवर कोणत्याही भ्रष्टाचार वा गैरप्रकाराबद्दल कारवाई झालेली नाही. केवळ उथळ बोलण्यामुळे खाते बदलावे लागण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. वास्तविक मंत्रिमंडळात माणिकरावांपेक्षाही गंभीर व्यवहाराने चर्चेत असलेलेही मंत्री आहेत, पण कारवाई झाली ती माणिकरावांवरच! तोंडात साखर अन् डोयावर बर्फ असेल तर आयुष्यातील अनेक आव्हानांना तोंड देता येऊ शकते, असे काही व्यक्तिमत्त्व विकासवाले सांगत असतात. ते अर्धसत्य असले तरी हा गुण माणिकरावांमध्ये अल्पांशाने जरी असता तरी खरोखरच या सुविचाराचा योग्य अर्थ त्यांना गवसला असता. स्पष्टवक्ता, निर्भिड वगैरे विशेषणे लावल्याने माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एकप्रकारचा दिमाख येतो, असा समज काही जणांचा होत असावा. कारण अनेकदा पदावर आलेली माणसे विनाकारण फटकेबाजी करताना दिसतात. माणिकरावांचा स्पष्टवक्तेपणा सर्वदूर परिचित असला तरी त्याने फटकळपणाची सीमा कधी ओलांडली हे त्यांना कळलेच नाही.
साधे आमदार होते तेव्हा त्यांचा हा स्वभाव कौतुकाचा विषय कदाचित असेलही. पण मंत्री झाल्यावर म्हणजेच बढती मिळाल्यावर यायला हवा तो समंजस व परिपक्वपणा आलाच नाही. तसा तो यावा यासाठी काहीच प्रयत्नही झाले नाहीत. आपण करतो ती पूर्वदिशा अन् तेच खरे हा अहं होताच. त्याला आसपासच्या खुशमस्कर्यांनी हवाही दिलेली असू शकते. परिणामी मंत्रिपदाची हवा शिरल्याचा लोकांचा समज झाला. खरे तर त्यांनी आपल्या खात्यात काही चांगले बदल केले, काही निर्णयही घेतले. भ्रष्टाचाराचा साधा ओरखडाही या मधल्या काळात त्यांच्यावर उमटला नाही. मंत्री झाल्यावर हे असे आरोप होतच असतात, तरीही माणिकराव त्यामानाने स्वच्छ राहिले. परंतु स्वभावविशेषामुळे त्यांना ना माध्यमांशी ना आम जनतेशी जमवून घेता आले.
आपले चांगले कामही या वादांमुळे सांगता येऊ नये यासारखे दुर्दैव नाही. खरे तर ते मंत्री झाले तेव्हा नाशिकमध्ये त्यांच्या सर्वपक्षीय मित्रमंडळींनी त्यांचा भव्यदिव्य सत्कार केला तेव्हा माणिकराव यांच्या लोकप्रियतेचे अभूतपूर्व दर्शन झाले होते. ते चित्र आणि नंतरचे त्यांचे वाक्ताडन पाहिल्यावर नेमके कोणते चित्र खरे असा प्रश्न अनेकांना पडला. मनमौजीपणा एका ठराविक वयात आणि विवक्षित ठिकाणीच चालू शकतो. सदैव सगळीकडे स्पष्टवक्तेपणा चालत नाही. आता आपले नेमके काय चुकले याचा गांभीर्याने त्यांनी विचार केला तरी त्यांनाच उथळ पाण्याला खळखळाट फार होता, याची प्रचिती आली असेल.




