Friday, June 19, 2026
Home Blog Page 13476

अभ्यास दौर्‍याचा निधी संकटग्रस्त शेतकर्‍यांना; जि. प. महिला व बालकल्याण समितीचा निर्णय – सभापती खोसकर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत विदर्भातील जिल्हा परिषदांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची पद्धत जाणून घेण्यासाठी महिला व बालकल्याण समितेचा नियोजित अभ्यास दौरा रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.या अभ्यास दौर्‍यासाठी तरतूद करण्यात आलेल्या पाच लाखांचा निधी जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.यामुळे बळीराजा उध्वस्त झालेला आहे नुकसानग्रस्त शेतीमालाचे पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत,माजी पालकमंत्री गिरीश महाजन,आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे.शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दिलेल्या निवेदनात नाशिक जिल्ह्याचा आवर्जून उल्लेख केला होता.

नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या काळात जिल्ह्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची बाब यातून पुढे आली होती.त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे अभ्यास दौर्‍यावर निधी खर्च करणे संयुक्तिक नाही,असे सांगत सभापती खोसकर यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण समिती विदर्भामध्ये अमरावती,वर्धा,नागपूर,गोंदिया,भंडारा जिल्हा परिषदांना भेटी देण्याचे नियोजन होते. समितीच्या अभ्यास दौर्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये पाच लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.मात्र,हा दौरा रद्द करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या दौर्‍यातील निधी संकटग्रस्त शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्ग करून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना,आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची शिफारस समितीच्या सभासदांनी सभापतींकडे केली.त्यानुसार हा निर्णय घेतला असल्याची माहिती सभापती खोसकर यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत.अशा वेळी त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीने अभ्यास दौरा रद्द करत हा निधी शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच बैठक घेणार आहे.यामध्ये फरक केलेला पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला जाणार आहे. अर्पणा खोसकर; सभापती महिला व बालकल्याण,जि.प.

कादवा कारखान्याचा ४३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ;उसाला सर्वाधिक भाव देणार – शेटे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

 दिंडोरी । प्रतिनिधी

‘ जिल्ह्यात सर्व सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना कादवाची परिस्थितीही बंद होंण्यासारखची होती. परंतु कादवाचे विद्यमान संचालक मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काटकसर, नियोजन व पारदर्शी कारभार करत कारखाना सुस्थितीत सुरू ठेवला असून कादवा यावर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप करणार आहे. कोणतेही उपपदार्थ निर्मिती नसताना उसाला सर्वाधिक भाव दिला असून यावर्षीही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचा भाव (एफआरपी) कादवाची राहणार आहे’,असे आश्वासन कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याचे ४३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी श्रीराम शेटे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे माजी चेअरमन अ‍ॅड.बाजीराव कावळे होते.

पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी गेल्या बारा वर्षातील कादवाची वाटचाल विशद केली.‘ज्यावेळी सभासदांनी कारखान्याची सत्ता दिली त्यावेळी कादवा प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत होता.मोठी देणी बाकी होती कर्ज थकलेले होते. एकुण किमंत उणे झालेली होती.त्यामुळे कोणतीच बँक कर्ज देत नव्हती .त्यामुळे कारखाना सुरू होईल की नाही याबाबत शंका होती. मात्र अनेक सभासदांनी दोन-तीन कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे कारखाना सुरू झाला.संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करत योग्य नियोजन व काटकसर करत कादवा अडचणीतून बाहेर काढला असून त्यावेळचे नेटवर्थ उणे ४७७.२८ लाख होते. त्या परिस्थितीवर मात करत आजच्या परिस्थितीत नेटवर्थ अधिक १८६२.३१ लाख झाले असून, म्हणजेच त्यात २३३९.५९ लाखाने वाढ झाली आहे .त्यामुळे तोटाही भरून निघालेला आहे.

कादवाला लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. कारखान्याची यत्रणा ५० वर्ष जुनी व पूर्णपणे कालबाह्य झाल्याने विविध यंत्रणा बदलताना त्या १२५० क्षमतेच्या न टाकता दूरदृष्टीचा विचार करून अधिक क्षमतेच्या व अत्याधुनिक टाकल्या आहे. त्यामुळे गाळप कार्यक्षमता वाढली आहे. सर्वाधिक भाव व वेळेवर पैसे अदा होत असल्याने ऊस उत्पादकांची पसंती कादवाला आहे, मात्र कमी गाळप क्षमता असल्याने गाळप मर्यादा येत होत्या. त्यामुळेच नव्याने मिल बॉयलर,टर्बाईन,ग्रेडर आदी विविध मशिनरी बदललेल्या असल्याने गाळप क्षमता वाढणार आहे. यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने अधिक ऊस लागवड करणे शक्य असून जास्तीत जास्त ऊस लागवड करावी ,’असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.

यावेळी संपतराव शिवराम घडवजे, नरेश भास्करराव देशमुख, भिकनराव गोपाळराव देशमुख, कैलास भगवंत पाटील, विनायक मुरलीधर बर्डे यांंच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन झाले.जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील यांच्या हस्ते नवीन मिलचे पूजन करण्यात आले.मान्यवरांचे हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली.यावेळी माजी चेअरमन अ‍ॅड.बाजीराव कावळे, उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, साहेबराव पाटील,संचालक बाळासाहेब जाधव आदींची भाषणे झाली.

यावेळी मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील, सदाशिव शेळके, रा.कॉ. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, विलास कड, विश्वास राव देशमुख, संजय पडोळ, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, दिनकर जाधव, विश्वनाथ देशमुख, बापू पडोळ, सुभाष शिंदे, सुनील केदार, संदीप शार्दूल, शांताबाई पिंगळ, चंद्रकला घडवजे, कामगार संचालक सुनील कावळे, संपतराव पाटील, संपतराव कोंड, विलासराव वाळके, बबनराव देशमुख, अशोक वाघ, राजेंद्र ढगे, शांताराम बार्‍हाते, सुनील पाटील, कचरु पाटील, डॉ.योगेश गोसावी, शाम हिरे, सुनिल शेटे, तौसिफ मनियार आदीसह सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी केले.

गुरुकडून शिष्याला शाबासकीची थाप
कादवाचे माजी चेअरमन अ‍ॅड.बाजीराव कावळे हे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांचे राजकीय गुरू असून अनेक वर्षानंतर अ‍ॅड.बाजीराव कावळे हे कारखान्याचे गळीत हंगाम शुभारंभास आले होते. यावेळी बोलताना त्यांनी कारखान्याचे प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना आपण गेली चार पाच वर्षांपासून अहवाल बघत नाही. कारण आपल्या शिष्याने कारखाना अत्यंत सुस्थितीत सुरू ठेवला असून त्यांचेवर विश्वास आहे. कारखाना दिमाखात सुरू आहे याचा आनंद होत असल्याचे सांगत श्रीराम शेटे यांच्यासह संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले.

पहिल्याच दिवशी २९ रिक्षांवर कारवाई

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक ।प्रतिनिधी

शहरातील प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे आकारणी न करणार्‍या २०० रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून पहिल्याच दिवसापासून कारवाई करण्यात आली. आरटीओच्या एका पथकाद्वारे २०० रिक्षा तपासण्यात आल्या. त्यापैकी २९ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन आधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.

ठराविक रिक्षा चालकांकडून मनमानी व रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा यामाध्यमातून सुरू असलेली भाडे आकारणीची दखल पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओे) घेतली आहे. शहरात आता नव्याने मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा आग्रह पोलिस प्रशासनाकडून धरण्यात आला. पोलिसांपाठोपाठ आता प्रादेशिक परिवहन विभागही बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरला आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही दोन पथके शहरातील काही मार्गांवर कारवाईसाठी उतरविण्यात आली.

या पथकांनी दिवसभरात सुमारे २०० रिक्षांची तपासणी केली असून त्यामध्ये २९ रिक्षाचालक नियमबाह्य पध्दतीने प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये ठरलेल्या मार्गांवर मीटरप्रमाणे तसेच शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक होत नसल्याचे आढळून आले. अशा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी विनय आहिरे यांनी दिली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभागाने या संदर्भात रविवारी नाशिकरोड बसस्थानकाजवळ रिक्षाचालकांना मार्गदर्शन आंणि आवाहन केले.

मुळा व प्रवरा नदीपात्रातून वाळू तस्करी सुरू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महसूल अधिकारी, पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी पंटर सक्रीय

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यामध्ये मुळा व प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग कमी होताच बेकायदा वाळू उपशाला उधाण आले आहे. रात्री-अपरात्री मुळा आणि प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून वाळू तस्करांचा नदीपात्रावर राबता सुरू झाला आहे.

महसूल व पोलीस यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी वाळू तस्करांचे पंटर सक्रीय झाले असून त्यांचा जागता पहारा सुरू झाला आहे. ही बेकायदा वाळू तस्करी बंद करण्याची मागणी पर्यावरणी प्रेमींनी केली आहे. मुळा व प्रवरा या दोन्ही नद्यांचे संपन्न पात्र राहुरी तालुक्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन्हीही नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचा गोरखधंदा जोमात सुरू झाला असून वाळू उपसा करण्यासाठी आधुनिक वाहनांचा व यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

मागील दोन महिन्यांपासून मुळा व प्रवरा नदीपात्रातून मुळा व भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी वाहत होते. त्यामुळे वाळू तस्कर पाणी ओसरण्याची वाट पहात होते. मात्र, आता विसर्ग बंद झाल्याने गेल्या आठवड्यापासून नदीपात्रामध्ये वाळू तस्कर पुन्हा बेकायदा वाळू उपसा करीत आहेत.

राहुरी तालुक्यातील मुळा आणि प्रवरा नदीपात्रातील वाळूला पुणे, मुंबई, नाशिक येथून मोठी मागणी वाढली असून वाळूला सोन्याचे मोल आले आहे. त्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर वाळूचा पुरवठा करणार्‍या एजंटांची साखळी कार्यान्वित झाल्याचे बोलले जात आहे.

नव्या पाण्यामुळे नदीपात्रात वाहून आलेल्या वाळू साठ्यांवर डल्ला मारण्यासाठी वाळू तस्करांची यंत्रणा मुळा व प्रवरा नदीपात्रात कार्यान्वित झाली आहे. मुळा नदीपात्रातील बारागाव नांदूर, डिग्रस, देसवंडी, कोंढवड, आरडगाव, मानोरी, वळण आदी परिसरात अवैध वाळू उपशाला प्रारंभ झालेला आहे. तर प्रवरा पात्रातील करजगाव, लाख, जातप, सात्रळ, सोनगाव या परिसरातून वाळू तस्करांनी नदीपात्राचे लचके तोडण्यास सुरूवात केली आहे.

राहुरी महसूल विभागाकडून वाळू साठ्यांचे लिलाव अनेक दिवसांपासून रेंगाळलेले आहेत. अनेक ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध तर दुसरीकडे लिलाव झाल्यानंतर स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांच्या जाचामुळे लिलाव प्रक्रिया होत नाही. त्यामुळे लिलाव रखडल्याचा सर्वाधिक लाभ वाळू तस्करांना मिळत आहे. बर्‍याच वर्षानंतर दोन्ही नदीपात्रामध्ये मुबलक पाणी जमा झालेले आहे. त्यामुळे वाळूही वाहून आल्याने वाळू तस्करांना अच्छे दिन आले आहेत.

झेडपीत विखे सत्ता राखणार की महाआघाडी सत्तेत येणार ?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सदस्यतत्वाचा तांत्रिक गुंता, यंदा पदाधिकारी निवडीत कायद्याचा निघणार किस

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सत्तेचा विषय आता संपला असून आता नगरकरांसोबत राज्यातील नेत्यांच्या नजरा नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीकडे आहेत. 21 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषदेत नव्या अध्यक्षांसह अन्य पाच प्रमुख पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार असून या ठिकाणी देखील राज्यातील महाआघाडीचा फॉम्युला कायम राहणार की विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील या सत्ता राखण्यात यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, काहीही झाले तरी नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत कायद्याचा किस निघणार हे नक्की आहे.

राज्यात सत्ता समिकरणे बदलल्याने त्याचे पडसाद नगर जिल्हा परिषदेत उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत नव्याने महाविकास आघाडीची सत्ता येणार की विद्यमान अध्यक्षा विखे यांच्या रुपाने भाजपचा झेंडा रोवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेपूर्वी जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याबरोबर भाजपमधून देखील काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेच्या संख्याबळात बदल झाला आहे. तांत्रिकद़ृष्ट्या हे सदस्य आजही मुळ पक्षात असले तरी मनाने आणि त्यांचे नेत मात्र ते नव्या पक्षात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारली. 12 जागांपैकी सहा जागा मिळविल्या तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.

त्यात राज्यात देखील सत्ता समिकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकासआघाडी आता सत्तारुढ झाली आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीमुळे जिल्हा परिषदेत आता राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळून शकते. 2016 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी 19, भाजप 14, शिवसेना 7, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, महाआघाडी 2, भाकप 1, जनशक्ती 1, अपक्ष 1 असे संख्याबळ होते. राष्ट्रवादीचे 19, मूळ काँग्रेसचे 10 व शिवसेना 7 तसेच शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे 5 असे समिकरण जुळू शकते. काँग्रेसचे 23 सदस्य असले तरी विखे पाटील यांच्या गटाला मानणारे 13 सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी 37 सदस्यांचा बहुमताचा आकडा आवश्यक आहे.

राज्यात ज्या प्रमाणे महाविकासआघाडीचे घटक पक्ष एकत्र आलेले आहेत. तोच प्रयोग नगर जिल्ह्यात झाल्यास या ठिकाणी विखे यांना सत्तेपासून रोखणे शक्य आहे. मात्र, 2007 च्या निवडणुकीचा अनुभव पाहता जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी विखे गट कोणताही प्रयोग करून शकतात. या शिवाय झेडपीतील संभाव्य महाविकासआघाडीत आज सर्वात मोठा राष्ट्रवादी असून राष्ट्रवादीकडून घुले, जगताप आणि ढाकणे हे स्पर्धेत राहू शकतात. मात्र, विखे गटाच्या विरोधात कोण दंड थोपटील हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. यापूर्वीच्या 10 ते 15 वर्षांतील जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा विचार केल्यास शिवसेनेचे सदस्य नेहमीच विखे गटासोबत राहिलेले आहेत. यामुळे यंदा देखील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये नगर जिल्हा परिषदेतील राजकारणात कायद्याचा किस निघालेला असून यंदा देखील त्याला अपवाद ठरणार नसल्याचे दिसत आहे.

विखेंकडून ‘श्रध्दा आणि सुबरी’चा सल्ला

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत शालिनीताई विखे यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी ‘श्रध्दा आणि सुबरी’चा मंत्र सांगितला होता. यामुळे अध्यक्षपदावरून शालिनीताई विखे पाटील या अत्यंत सावध असून राज्यातील सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी विखे गट टाळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

थोरात-पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्ह्यात राजकारणात शांत आणि संयमी म्हणून ओळख असणार्‍या आ. बाळासाहेब थोरात आणि ज्यांचा जिल्ह्यात नव्याने राजकीय उदय झाला असे नवनिर्वाचित आ. रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेप्रमाणे नगर जिल्हा परिषदेत लक्ष घालणार का याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष राहणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रतोद भाजपमध्ये
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे प्रतोद कैलास वाकचौरे आणि काँग्रेसच्या प्रतोद आशाताई दिघे या विखे गटासोबत असून मनाने दोघेही भाजपमध्ये आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे दोघे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दिसत असल्याने पदाधिकारी निवडीपूर्वी त्यांचे प्रतोद पद राहणार की त्यावर गंडांतर येणार याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष आहे. यासाठी आतापासून कायद्याच्या बाबींचा आधार घेण्यात येत आहे.

माजी नगराध्यक्षास मागितली 10 कोटींची खंडणी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

दोन खंडणीबहाद्दर तरूण गजाआड

वैजापूर- वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांना भ्रमणध्वनीव्दारे जिवे मारण्याची धमकी देऊन तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या दोन बहाद्दरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. खंडणी मागणारे शहरातील मोबाईल शॉपीचालकासह अन्य एक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून या दोघांनीही पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अजय मोहनसिंग राजपूत (26) रा. परदेशीगल्ली व राजू उर्फ जयराम बागुल ( 35) रा. रोटेगाव अशी या खंडणी बहाद्दरांची नावे आहेत.

शहरातील माजी नगराध्यक्ष तथा मर्चंटस बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांना 26 नोव्हेंबर रोजी एका भ्रमणध्वनीव्दारे दहा कोटी रुपयांची मागणी केली गेली. खंडणी न दिल्यास तुमच्यासह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे संचेती कुटुंबातील सदस्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले. 27 नोव्हेंबर रोजी या घटनेची अख्खा शहरासह तालुक्यात चर्चा सुरू झाली. मात्र पोलिसांनी या घटनेबाबत कमालीची गोपनीयता बाळगली खरी. परंतु औरंगाबाद येथील वेगवेगळ्या शाखेच्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांची शहरातील गर्दी व धावपळ पाहता ही घटना जास्त काळ लपून राहिली नाही.

शहरातील पोलिसांची वर्दळ पाहता या घटनेची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. 28 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी याप्रकरणी शहरातील परदेशी गल्लीतील रहिवासी अजय मोहनसिंग राजपूत (26) व शहरानजीकच्या रोटेगाव येथील राजू बागुल या दोघांसह अन्य एक अशा एकूण तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना तब्बल तीन दिवस ताब्यात ठेऊन कसून चौकशी केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. 1 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आपणच दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी संचेती परिवारास जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली अजय राजपूत याने पोलिसांना दिली.

याप्रकरणी अजय राजपूत व राजू बागुल या दोघांविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस म्हणजेच 4 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या कटाचा सूत्रधार अजय राजपूत हाच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

क्राईम मालिका बघून कृत्य
मुख्य सूत्रधार अजय राजपूत याने यु ट्यूबवर क्राईम मालिका पाहिल्या. त्यानुसार त्याने या गुन्ह्याची आखणी केली. त्यासाठी आवाज बदलण्याचा अ‍ॅप डाऊनलोड केला. त्यावरून दाऊदच्या आवाजात हिंदीत संवाद करून या खंडणीची मागणी केली. विशेष म्हणजे या अजयचे पुढच्या आठवड्यात विवाह होणार होता.

परिचर आणि सफाई कामगारांमुळे 13 गावे ‘व्हेंटीलेटर’वर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता कोमात; अधिकार्‍यांनी घेतली झाडाझडती

उंबरे (वार्ताहर)- आरोग्य केंद्रात येणार्‍या रूग्णांना अत्यंत चांगली वैद्यकीय सेवा दिली जाते. मात्र, परिचरांकडून रूग्णांची हेळसांड करून आरोग्य केंद्रातील स्वच्छता कोमात गेल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी तातडीने दखल घेत राहुरी तालुक्यातील उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन ‘वशिल्याचे तट्टू’ असलेल्या परिचरांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांच्या निष्क्रियतेचा ठपका आरोग्याधिकार्‍यांवर ठेऊन त्यांचीही जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. या चौकडीमुळे तेरा गावांतील तब्बल 70 हजार लाभार्थी ग्रामस्थांना ‘व्हेंटीलेटर’ची वेळ आली आहे.

उंबरे आरोग्य केंद्रात तीन परिचर व एक सफाई कामगार असे चौघेजण सेवेत आहेत. मात्र, चार कामगार असूनही उंबरे आरोग्य केंद्रात कायमच स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असतो. कामावर असूनही कामचुकारपणा करणार्‍यांना संबंधित अधिकार्‍यांनी काम सांगितले, किंवा नोटीस काढली तर त्यांनाच धमकी दिली जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे अनेकदा आरोग्य केंद्राची सेवा कोलमडून जात आहे. पर्यायाने त्याचा परिणाम रूग्णसेवेवर होत असल्याची चर्चा आहे. परिचरांचा राग वैद्यकीय अधिकार्‍यांवर काढला जात असून त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनीही या चौघांपुढे हात टेकले असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे या परिचर आणि सफाई कर्मचार्‍यांची अन्यत्र बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, वांबोरी, कुक्कडवेढे, धामोरी खुर्द, धामोरी बु., खडांबे खुर्द, खडांबे बु., कात्रड, गुंजाळे, बाभुळगाव, मोकळ ओहळ, चेडगाव, यासह 13 गावांतील रूग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राला ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील व जिल्हा परिषद सदस्या शशिकलाताई पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव मदत केलेली आहे. सध्या तब्बल 70 हजार रूग्णांना या केंद्राचा फायदा होतो. केंद्रात दररोज 90 रूग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे तालुक्याबाहेरूनही रूग्ण येथील आरोग्य केंद्रात येतात. हे उपकेंद्र प्रसुती व शस्त्रक्रियेसाठी नावाजलेले असल्याने जिल्ह्यातील रूग्ण येथे येतात.

या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी विजेची स्वतंत्र व्यवस्था नाही. इनव्हर्टर नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांना प्रसुतीच्या शस्त्रक्रिया चक्क मोबाईलच्या टॉर्चवर करण्याची वेळ येत आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांना रात्रीच्या वेळी मेणबत्त्या लावून औषधोपचार करण्याची वेळ येत असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी येथे तातडीने विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भिंगारला नियमित पाणी उपलब्ध करून देणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

खासदार डॉ. सुजय विखे पाटील : भिंगारच्या समस्या जाणून घेतल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार गावचा पाणीपुरवठा नियमित व मुबलक कसा होईल, यासाठी प्रयत्न करत येथील जनतेला न्याय देऊ असे आश्वासन भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. भिंगार बँकेच्या कार्यालयात खा. विखे यांची भिंगारच्या समस्यांबाबत बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भिंगार बँकेचे चेअरमन गोपाळराव झोडगे यांनी तर भिंगार भाजपतर्फे महेश नामदे यांनी डॉ. विखे यांचा सन्मान केला. यावेळी झोडगे यांनी पाणी पुरवठा सुरळीतपणे व्हावा, चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ करणे, कापूरवाडी तलावातील गाळ काढणे, याविषयीच्या व्यथा मांडल्या.

कॅन्टोन्मेंटचे संबंधित अधिकारी कर्मचारी पाणीप्रश्न खरी माहिती सांगत नाहीत आणि लपवाछपवी करतात. त्यांच्याकडे कोणत्याही समस्या विषयी चौकशी केली असता माहिती मिळत नाही. कर्मचारी उद्धटपणे वागतात असे सांगून बँकेचे संचालक नाथा राऊत यांनी त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. कर्मचार्‍यांच्या बदल्या कराव्यात असे त्यांनी विखे यांना सांगितले. भाजप शाखेच्यावतीने याआधी पाणी प्रश्न सोडविण्या विषयी प्रयत्न केलेले आहेत. राज्य मंत्रालयात कॅबिनेटची बैठक घेऊन पाणीप्रश्नी काय निर्णय झाला याची माहिती महेश नामदे यांनी दिली.

चटईक्षेत्र निर्देशांकात अंकात वाढ करावी,अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. लोक गाव सोडून चालले आहेत, असे यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. विखेंनी पाणीप्रश्नाची सर्व माहिती जाणून घेतली. लष्कराच्या एमईएसचे इंजिनीयर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ यांची संयुक्त बैठक घेऊन गावाला करारानुसार नियमित पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर एमआयडीसीकडून थेट कॅन्टोन्मेंटला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, आश्वासन दिले. कापूरवाडी तलावातील गाळप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून कळवू असे ते म्हणाले. तर चटईप्रश्नी नेमक्या अडचणी काय आहेत याबाबत संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करुन तो सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे ते म्हणाले.

कॅन्टोन्मेंट विषयी जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे हॉस्पिटल, शाळा, कार्यालय व गावातील विकास कामांवर कॅन्टोन्मेंटनी मागील पाच वर्षात किती खर्च केला, याचा अहवाल सादर करण्याचे खा. विखे यांनी दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक बाळासाहेब पतके, भाजपाचे रविंद्र बाकलीवाल, शामराव बोळे, अनंत रासने, निलेश साठे, अनिरुद्ध देशमुख, स्वप्नील देवतरसे, अ‍ॅड. अक्षय भांड, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे आदींसह भाजप कार्यकर्ते व भिंगार बँक संचालक उपस्थित होते.

झेडपीची 40 जणांची टीम उद्या ओडीसा दौर्‍यावर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आंतरराष्ट्रीय स्पोर्ट अ‍ॅकडमी, जिल्हाधिकारी कार्यालयासह पूरनियंत्रण यंत्रणेची करणार पाहणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी यांच्यासह सदस्य, अधिकारी आणि कर्मचाारी अशा 40 जणांची टीम मंगळवारपासून तीन दिवसीय ओडीसा राज्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या ठिकाणी नगरचे सुपूत्र असणारे अजय कुलांगे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असून त्यांनी साकारलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पोर्ट अ‍ॅकडमी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह त्या ठिकाणी राबविण्यात येणारी पूरनियंत्रण यंत्रणेची पाहणी करून अभ्यास करणार आहेत.

या अभ्यास दौर्‍यात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्य, जलव्यवस्थापन समितीचे सदस्य, अर्थ समितीचे सदस्य आणि बांधकाम अशा चार समितीचे सदस्यांचा सामवेश असून यात 31 जिल्हा परिषद सदस्य यांचा समावेश राहणार आहे. या अभ्यास दौर्‍यासाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या 3 ते 7 डिसेंबर असा चार दिवसांचा हा दौरा राहणार आहे. विमानाने हा दौरा होणार आहे. दि. 3 डिसेंबर पुणे विमानतळावरून ओडीसाच्या राजधानी भुवनेश्वर येथे जाणार आहे. या दौर्‍यात आंतरराष्ट्रीय दर्जाची र्स्पोट अ‍ॅकडमी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह कोर्णाक सुर्यमंदिर, चंद्रभागा समुद्र किनार, जन्नानाथाचे मंदिर, बुद्धाच्या शांती स्तुप पाहणी, कालिजाई बेटाला भेट, कालिजाई मंदिराला भेट, भेरामपूर, भुवनेश्वर येथून कोर्णाक व पुरी येथे जाणार आहे. कालाभूमी या संग्रहालयास भेट देणारे आहे. कंदगिरी व उदयगिरी या जैन गुफा पाहणार आहे. भुवनेश्वर येथील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम. दि. 7 डिसेंबरला लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिराला भेट देण्यात येणार आहे. असे दौर्‍याचे नियोजन करण्यात आले आहे.

या दौर्‍यात अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, सभापती अजय फटांगरे, सभापती अनुराधा नागवडे सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, सुप्रिया पाटील, महेश सुर्यवंशी, हर्षदा काकडे, आशा दिघे, तेजश्री लंघे, सुनिल गडाख, प्रभावती ढाकणे, पुष्पा रोहम, सोनाली रोहमारे, रोहिणी निघुते, उज्ज्वला ठुबे, राहुल शिंदे, मोहन पालवे, काशिनाथ दाते, कोमल वाखारे, शरद नवले, राजेश परजणे, रामहरी कातोरे, शशिकला पाटील, सुधाकर दंडवते, शरद झोडगे, ताराबाई पंधरकर, कविता लहारे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळूंके, परिक्षित यादव, किशोर गीते, तर कर्मचारी सुहास गोबरे, राजू जरे, किशोर शिंदे, दिनेश बर्डे, सविता अडसुरे, दत्तात्रय काळे, जालिंदर वाकचौरे यांचा यात समावेश राहणार आहे.

शिक्षण-आरोग्यवाले तामिळानाडूच्या दौर्‍यावर
लवकरच शिक्षण समिती आणि आरोग्य समितीचे सदस्य तामिळनाडू दौर्‍यावर जाणार आहेत. त्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. यापूर्वी या दोन्ही समितीच्या सदस्यांनी कुलूमनाली, दिल्ली, तिरूपती आणि म्हैसूर या ठिकाणी दौर्‍याचे नियोजन केले होते. मात्र, एकमत होत नसल्याने अखेर तामिळनाडून राज्याचा दौरा निश्चित केला असल्याची माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली.

नेवासाफाटा येथे तीन तास वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

ऊस वाहतूक व लग्न मुहुर्ताच्या दिवसामुळे वाहनांची प्रचंड गर्दी

नेवासाफाटा (वार्ताहर)- नगर औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे आज सायंकाळी दरम्यान तब्बल साडेतीन तास वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. नगर रोड, औरंगाबाद रोड, शेवगाव रोड व नेवासा रोडवर दुतर्फा सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना रात्री 8 वाजता वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

लग्नमुहूर्ताचा दिवस, रविवार सुट्टीचा दिवस व ऊस वाहतूक करणारी बेशिस्त वाहने यामुळे दुपारी तीन वाजेपासूनच वाहतुकीच्या कोंडीला सुरुवात झाली. सुमारे साडेतीन तास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच दुपारी ऊसवाहतूक करणारे एक वाहन राजमुद्रा चौकात बंद पडले होते. त्या ठिकाणी जशी जागा मिळेल तशी वेडी वाकडी वाहने घालण्यास लोकांनी सुरुवात केली. सध्या नेवासा फाटा येथे एकच वाहतूक नियंत्रक पोलीस कार्यरत आहे.

आणखी वाहतूक नियंत्रक पोलीसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. दुपारी साडेतीन तास झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णवाहिका व नववधू – वर वाहतुकीच्या कोंडीत अडकले. सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शेवाळे, वाहतूक नियंत्रण कक्षाचे नाना तुपे, विठ्ठल गायकवाड, देसाई आदींनी स्थानिक युवकांच्या मदतीने महत्प्रयासानंतर रात्री आठ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवले. राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सरपंच सतीश निपुंगे यांच्या समवेत चंद्रशेखर ठुबे, महेश निपुंगे, शंकर दाणे, सचिन पठाडे, सौरभ माळी, मनोज जावळे, हेमंत गायकवाड, विजय गाडे, दिगंबर उभेदळ, शंकर कुर्‍हे, महेश निमसे, पप्पू कुटे, अंकुश पोटे, राहुल कत्तेवर, गणेश पडोळे आदि युवकांनी ही वाहतूक कोंडी हटविण्यासाठी सहकार्य केले. वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगाव काढावा अशी मागणी प्रगतशील शेतकरी व मुळा कारखान्याचे संचालक पांडुरंग निपूंगे यांनी केली आहे.