Thursday, June 18, 2026
Home Blog

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपत्रिकेत बंद, निकालाकडे लक्ष

0

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Vidhan Parishad Election) आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदानास (Voting) प्रारंभ झाला होता. जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. या सर्व मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांचा थंड प्रतिसाद बघायला मिळाला. मात्र, दुपारनंतर मतदार केंद्रांवर जाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के इतके मतदान झाले.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : सकाळपासून मतदानाला सुरुवात; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात, महायुतीतर्फे दराडे रिंगणात

नाशिक विधानपरिषदेच्या एकूण ६१९ मतदारांपैकी (Voter) ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर जाऊन मतदान केले. यात ३१९ महिला नगरसेविका आणि २९९ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. तर मालेगाव महापालिकेतील (Malegaon Mahapalika) एका नगरसेवकाने (Corporator) मतदानाचा हक्क न बजावल्याने एकूण ६१८ मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले असून, एका मतदान केंद्रावर ९८.८१ टक्के मतदान झाले आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीने (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार उभा न केल्यामुळे ही लढत प्रामुख्याने महायुती (Mahayuti) अंतर्गत आणि बंडखोरांभोवती फिरत राहिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) हे होते. पंरतु, भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी गिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मतदानाच्या आठ दिवस आधी आपला प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे (Prasad Hire) यांनी दराडे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

हे देखील वाचा : Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; येवल्यात १२ पर्यंत एकाने बजावला हक्क

दरम्यान, गिते आणि हिरे यांनी कायदेशीर मुदतीनंतर थांबण्याचा निर्णय घेतल्याने मतपत्रिकेवर दोघांचीही नावे कायम होती. यामुळे पसंतीक्रमाची मते फुटण्याची धास्ती महायुतीला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता सोमवार (दि.२२) रोजी लागणार्‍या निकालावेळीच कोणाची किती मते फुटली हे स्पष्ट होईल. दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळाले. राजकीय वैर विसरून मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला.तर संख्याबळ अनुकूल असूनही संभाव्य दगाफटका आणि अंतर्गत नाराजी टाळण्यासाठी महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित स्थळी (सहलीवर) रवाना करण्याची खबरदारी घेतली होती.

कुठे किती मतदार होते?

नाशिक महापालिका १२२, भगूर नगरपरिषद २३, देवळाली छावणी परिषद १, दिंडोरी नगरपंचायत १९, पेठ नगरपंचायत १८. इगतपुरी नगरपरिषद २४, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद २३, निफाड नगरपंचायत १९, पिंपळगाव बसवंत नगरपरिषद २९, ओझर नगरपरिषद २८, सिन्नर नगरपरिषद ३४, येवला नगरपरिषद ३०, नांदगाव नगरपरिषद २३, मनमाड नगरपरिषद ३५, मालेगाव महापालिका ८४, चांदवड नगरपरिषद २३, देवळा नगरपंचायत १८, कळवण नगरपंचायत १९, सुरगाणा नगरपंचायत १९, सटाणा नगरपरिषद २८

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? खासदारकी राहणार की जाणार?

0
कारवाई

मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा गट स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व नऊ खासदारांना व्हिप बजावला गेला होता. मात्र बंडखोर सहा खासदारांनी व्हीप धुडकावून लावत बैठकीला गैरहजर राहिले. खासदारांनी बैठकीला पाठ फिरवल्यानंतर आता त्यांच्यावर ठाकरे गटाने कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. व्हीप आणि कारवाई हे अनपेक्षित वळण लागल्यामुळे फुटलेल्या खासदारांचे विलिनीकरण पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जात असून, आता ठाकरे गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या अनुपस्थित ६ खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. या संपूर्ण कायदेशीर आणि संविधानात्मक पेचावर विधिमंडळाचे माजी सचिव आणि कायदेतज्ज्ञ अनंत कळसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार व्हिपचं पालन न केल्याने ठाकरे गट त्या खासदारांना नोटीस बजावू शकतो. त्यानंतर खासदारांची उत्तरे समाधानकारक आहेत की नाही हे ठरवून त्यांना अपात्र ठरवण्याची याचिका लोकसभा अध्यक्षांकडे देऊ शकतात. यावर अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला घेतील.

Shivsena Operation Tiger: शिवसेना ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटला; बंडखोर ६ खासदारांनी पक्षाचा व्हीप धुडकावला, बैठकीला ३ खासदार उपस्थित

पक्षांमधील फुट त्यांना स्पष्ट करता आली पाहिजे
“या प्रक्रियेत खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे अपेक्षित नाही ते संविधानात्मक दृष्ट्या ग्राह्य धरले जाणार नाही. खासदारांसोबत त्यांचा पक्ष देखील गेला पाहिजे. पक्षांमधील फूट त्यांना स्पष्ट करता आली पाहिजे. त्यानंतर दोन तृतीयांश संख्या आवश्यक असते जर ती संख्या पूर्ण होत असेल तर या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष मान्यता देतील,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटलेले आणि व्हिप बजावूनही बैठकीला अनुपस्थित राहिलेले संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय हरिभाऊ जाधव, नागेश पाटील-आष्टीकर, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटाने आजच (18 जून) नोटीस पाठवली आहे. शिवाय त्यांना उत्तरे देण्यासाठी काही तासांचाच अवधी दिला आहे. त्यांनी वेळेत उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

Shivsena UBT Crisis : संजय जाधव फुटीर खासदारांचे ‘बॉस’; परभणीत दाखल झाल्यावर मिळणार तातडीने Y प्लस सुरक्षा

0

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) ९ पैकी ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी मंजुरी देखील दिली आहे. त्यामुळे ठाकरे पक्षात उभी फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज (गुरुवारी) दिल्लीत संसदीय दलाची बैठक (Parliamentary Party Meeting) बोलावली होती. या बैठकीसाठी पक्षाकडून खासदारांना व्हीप देखील जारी करण्यात आला होता. मात्र, या संसदीय दलाच्या बैठकीला सहा फुटीर खासदारांनी दांडी मारली आहे. त्यानंतर ठाकरे गटाने या सहाही खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान या फुटीर खासदारांचे नेतृत्व परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी विधान परिषदेचे मतदान संपल्यानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) सहा फुटलेल्या खासदारांचा गट स्थापन करण्यात येऊन त्याचा गटनेता म्हणून संजय (बंडू) जाधव यांचे नाव घोषित केले जाऊ शकते.

जाधव यांना वाय प्लस सुरक्षा मिळणार

सुरक्षेच्या कारणास्तव गृह विभागाकडून संजय जाधव यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता परभणीमध्ये दाखल झाल्यानंतर लगेचच जाधव यांच्या घरी आणि कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली जाणार आहे. परभणीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या या बंडखोरीवर संताप व्यक्त करत त्यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत. त्यामुळे ही वाढ केली जाणार आहे.

संजय जाधव यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

संजय जाधव यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून केली.त्यानंतर त्यांनी परभणी महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि परभणी नगरपालिकेत नगरसेवकपद भूषवले. पुढे संजय जाधव यांच्यावर परभणी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देखील देण्यात आली.जिल्हाप्रमुख पदावर असताना संजय जाधव यांनी २००४ आणि २००९ मध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातून सलग दोनदा विजय मिळवला.२०१४ लोकसभेच्या निवडणुकीत संजय जाधव प्रथम लोकसभेवर खासदार म्हणून गेले.पुढे २०१९ आणि २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेवर विजय मिळवत खासदारकीची हॅट्रिक पूर्ण केली.

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; येवल्यात १२ पर्यंत एकाने बजावला हक्क

0

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Vidhan Parishad Election) आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदान (Voting) प्रक्रिया सुरू झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत ९.८५ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार (Candidate) रिंगणात आहेत. जिल्ह्यातील एकूण नऊ मतदान केंद्रांवर आज सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६१९ मतदारांपैकी ६१ उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर यांनी आज सकाळी नाशिक तहसील कार्यालय, चांदवड तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांना (Voting Centre) भेट देत पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : सकाळपासून मतदानाला सुरुवात; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात, महायुतीतर्फे दराडे रिंगणात

दोन वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकीत दुपारी २ वाजेपर्यंत ६१९ पैकी १२५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर शिवसेना उबाठाचे नगरसेवक दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाले होते.

येवल्यात १२ वाजेपर्यंत फक्त एक मतदान

नाशिक विधान परिषद निवडणुकीत येवला येथील मतदान केंद्रावर १२ वाजेपर्यंत फक्त १ मतदान झाले आहे. येवल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी पहिल्या टप्प्यातच आपला मतदानाचा हक्क बजावला.

भगूरचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दीड वाजता दाखल

नाशिक विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील कार्यालयात दुपारी दीड वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बसमधून हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

Shivsena Operation Tiger: शिवसेना ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटला; बंडखोर ६ खासदारांनी पक्षाचा व्हीप धुडकावला, बैठकीला ३ खासदार उपस्थित

0
शिवसेना

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून व्हीप जारी करून दिल्लीत बैठक बोलवण्यात आली होती. पण या बैठकीला त्या सहा फुटीर खासदारांनी दांडी मारली. २०२२ च्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा खासदारांच्या फुटीमुळे मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर यशस्वी?
शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे ६ खासदार फोडण्यात आले आहे. उध्दव ठाकरे गटाकडून आज संसदीय दलाच्या बैठकीसाठी व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीला ठाकरे गटाचे केवळ ४ खासदार उपस्थित होते. या ६ खासदारांनी वेगळा गटही स्थापन केला आहे आणि तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती मिळत आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे बोलले जात असून आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असे शिंदेंच्या शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचे कळतेय.

Sanjay Raut: बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, बाळसाहेबांच्या विचारांची आठवण; पक्ष फोडणाऱ्यांना संजय राऊतांचा इशारा

ठाकरे गटाने बोलवलेल्या बैठकीला हेच खासदार उपस्थित
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर दिल्लीमध्ये बोलावलेल्या तातडीच्या संसदीय बैठकीला लोकसभेच्या ९ खासदारांपैकी केवळ ३ खासदार उपस्थित राहिले, तर ६ खासदार गैरहजर राहिले. लोकसभेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हेच केवळ बैठकीत दाखल झाले होते.

हे खासदार अनुपस्थित
ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे ६ खासदार बैठकीला पोहोचले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. हे ६ खासदारांनी व्हिप धुडकावल्याचे बोलले जात आहे.

खासदारांना नोटीस पाठवली जाणार
शिवसेना ठाकरे गटाकडून बोलवण्यात आलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाकडून तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोटीसवर प्रत्येक खासदारांकडून उत्तर मागितले जाणार आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ दिला जाईल. दिलेल्या वेळेत उत्तर आले नाही, तर मग पुढे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे असणार आहेत. सोबतच नव्या गटाला मान्यता देण्याचे अधिकार देखील लोकसभा अध्यक्ष यांच्याकडेच राहतील. शिवसेना दोन्ही गटांची पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारात जाईल.

दिल्लीतील या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हिप जारी करून उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. व्हिपचा निरोप ईमेल, व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे प्रत्येकापर्यंत पोहोचवला गेला होता. व्हिप जारी करूनही गैरहजर राहिल्यामुळे या खासदारांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई होऊ शकते. तसेच शेड्युल १० (१० वे वेळापत्रक – पक्षांतर बंदी कायदा) नुसार त्यांची खासदारकी रद्द करण्याची कायदेशीर मागणी केली जाऊ शकते.

व्हीपवर सर्वोच्च न्यायालय काय म्हणत?
व्हीप हा विश्वासदर्शक किंवा अविश्वास ठरावासाठीच बजावता येतो.
व्हीप हा आमदार,खासदाराच्या सभागृहातील वर्तनाशी निगडीत.
1992 च्या किहोतो-झचिल्लु खटल्यानुसार पक्षांतर्गत बैठकीसाठी व्हीप लागू होत नाही.
खासदाराने पक्षत्याग केल्यास तो अपात्र ठरतो.
खासदार व्हीपविरोधात मतदान केल्यास अपात्र ठरतो.
व्हीप बजावूनही खासदार मतदानावेळी तटस्थ राहिल्यास अपात्र ठरतो.
खासदाराने पक्षाची बैठक टाळल्यास हकालपट्टीसारखी कारवाई शक्य,पण अपात्र ठरवता येत नाही.

Sanjay Raut: बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, बाळसाहेबांच्या विचारांची आठवण; पक्ष फोडणाऱ्यांना संजय राऊतांचा इशारा

0
संजय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना ठाकरे गटाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या ९ पैकी ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी ४ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे दोन खासदारांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांना पाठवायच्या पत्रावर सह्याच केल्या नसल्याचा दावाही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी फूट पडली आहे की नाही? आणि पडली असल्यास किती खासदार फुटले? याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना मोठा इशारा दिला आहे.

तातडीने कारवाई सुरु होणार
संजय राऊत व अरविंद सावंत यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीआधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊतांनी बंडखोरांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला. “आम्ही सगळ्यांना व्हीप दिला आहे. आम्ही वाट पाहणार आणि त्यानंतर तातडीने कारवाई सुरू होणार”, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे आता या खासदारांवर नेमकी काय कारवाई होणार? आणि कारवाई झाली तर ती खासदारांना लागू असेल का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

व्हीप काढला जातो तेव्हा गांभीर्य समजले पाहिजे
यावेळी संजय राऊत म्हणाले की, अरविंद सावंत यांनी यांची आजची खासदारांची बैठक व्हीप काढून बोलवली आहे. जेव्हा व्हीप काढला जातो, तेव्हा त्या बैठकीचे गांभीर्य समजले पाहिजे. हा पक्षाचा आदेश असतो आणि तो पाळावा लागतो. महत्त्वाच्या विषयांवर खासदारांशी चर्चा करणे आम्हाला आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारची बैठक बोलवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. हा जो व्हीप आहे, तो प्रत्येकापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या घरी, मेलवर, व्हॉट्सअपवर गेलेला आहे. त्या अनेकांना प्रत्यक्ष फोनवरून सुद्धा आम्ही हा निरोप दिला आहे. आता कालपासून तुम्ही वाहिन्यांवर जे वातावरण दाखवत आहात, ते पाहिल्यावर मला तर असे वाटायला लागले आहे की, आमचे १५ खासदार पुन्हा येतील. पण आता ११ वाजता बैठक आहे. इथून आम्ही संसदेच्या कार्यालयातील बैठकीला जाऊ आणि बैठकीतील कामकाज पूर्ण करू, अशी माहिती दिली.

US-Iran Peace Deal: मोठी बातमी! अखेर अमेरिका-इराण युद्ध थांबल; ट्रम्पयांच्याकडून ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

आता तोडून दाखवा, तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, संसदेतील आमच्या पक्षाच्या कार्यालयात ११ वाजता बैठक होणार आहे. तुम्ही ज्यांची नावं घेताय, त्यांना वाटतं एकदा त्यांनी तोडून दाखवलं आता सांगतो तोडून दाखवा,तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. लोकशाहीचा खेळ लावलाय का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आलीय का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देताय, आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ, देशाची प्रतिष्ठा, नियम, संविधानासोबत तुम्ही खेळ करताय, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचे नाही
उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवारांचा फोन झाला, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल. बाळासाहेबांची शिकवण तुडवा असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा शेवट केला.

वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा, हा बाळसाहेबांचा विचार आहे त्याची आठवण करुन देतो, असे अरविंद सावंत म्हणाले.

Shivsena UBT Crisis : ठाकरे गटात फुट अटळ! संसदीय पक्षाच्या बैठकीला ‘त्या’ खासदारांची दांडी

0

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) ९ पैकी ६ लोकसभेच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी मंजुरी दिल्याचे बोलले जाते. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती कुठेही समोर आलेली नाही. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज (गुरुवारी) दिल्लीत संसदीय दलाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी पक्षाकडून खासदारांना व्हीप देखील जारी करण्यात आला होता. मात्र, या संसदीय दलाच्या बैठकीला सहा फुटीर खासदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे ठाकरे गटात फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा : Rajabhau Waje : “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम, पक्ष आणि नेतृत्वांशी फारकत…”; ठाकरे सेनेचे खासदार वाजेंची प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी बंडखोरीचे पाऊल उचलल्याच्या चर्चांनंतर ‘डॅमेज कंट्रोल’साठी ठाकरे गटाकडून पक्षातील फूट रोखण्यासाठी आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्या करिता पक्ष नेतृत्वाने तातडीने ‘व्हिप’ (पक्षादेश) जारी केला होता. मुख्य प्रतोद अनिल देसाई (Anil Desai) यांनी आपल्या सर्व खासदारांना व्हीप बजावून तातडीची बैठक बोलावली आहे. परंतु, या बैठकीला फक्त चार खासदार उपस्थित असून, यात राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि लोकसभेचे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांविरोधात काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : “आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता…”; संजय राऊत फुटीर खासदारांवर संतापले

बैठकीत कोणती चर्चा झाली?

खासदारांनी बोलावलेल्या बैठकीत गैरहजर राहणार्‍या खासदारांबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. तसेच व्हीप बजावून देखील अनुपस्थित राहणार्‍या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून आणखी पुढे काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा : Rajabhau Waje : “…अन् खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी”; संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

बैठकीला गैरहजर असणारे खासदार

संजय जाधव (परभणी) संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम) नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) ओमराजे निंबाळकर (धाराशिव) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)

US-Iran Peace Deal: मोठी बातमी! अखेर अमेरिका-इराण युद्ध थांबल; ट्रम्पयांच्याकडून ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

0
अमेरिका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
फेब्रुवारी महिन्यापासून सुरु असलेलं अमेरिका-इराण यांच्यातील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी युद्ध संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर औपचारिकपणे स्वाक्षरी केली आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी ६ वाजता करारावर सह्या केल्या.

अमेरिकी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्समधील एका राजवाड्यात मॅक्रॉन यांच्यासोबतच्या भोजनादरम्यान अमेरिका-इराण कराराच्या छापील प्रतीवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रती इराण आणि मध्यस्थ देशांना पाठवण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे मुख्य वाटाघाटीकार मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या करारानुसार इराणमधील युद्ध समाप्त होईल आणि लेबनॉनमधील संघर्षही संपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी समाप्त करण्याची चर्चा करण्यात आली आहे. इराणच्या अण्वस्त्रांवर ६० दिवस चर्चा होणार आहे.

जगावरील मोठे आर्थिक संकट टळले
फ्रान्समध्ये पार पडलेल्या ‘जी-७’ (G7) परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची माहिती दिली. ते म्हणाले, “या अंतरिम करारामुळे जगावरील मोठे आर्थिक संकट टळले आहे. गेल्या तीन दिवसांत ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील सागरी वाहतूक कमालीची वाढली असून, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.”

संपादकीय : १८ जून २०२६ – तहानलेले जलस्रोत अन् नियोजनाची कसरत

तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा भीषण बॉम्बहल्ला करु
यावेळी इराणला इशारा देताना ट्रम्प त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत म्हणाले, “इराणी लोक हुशार आहेत, त्यांनी या कराराचा आदर करावा अशी माझी इच्छा आहे. पण जर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा भीषण बॉम्बहल्ला करू.”

दोन्ही देशांचे वाटाघाटी करणारे नेते जिनिव्हा येथे एकत्र येणार आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडमधील बैठकीचा उद्देश करारावर स्वाक्षरी करणे नाही. ही बैठक प्रत्यक्षात होणार की नाही यावर पुढील काही तासांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई म्हणाले की, इराणला वाहतूक किंवा विम्यावर कोणत्याही निर्बंधांशिवाय तेल विकण्याची परवानगी दिली पाहिजे. त्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा पूर्ण हक्क असला पाहिजे.

करारात नेमकं काय आहे?
या करारानुसार, अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आपली नौदल नाकेबंदी आणि संबंधित निर्बंध उठवण्यास सुरुवात करेल, तर इराण सुरुवातीच्या 60 दिवसांच्या कालावधीसाठी या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची सुरक्षित आणि मुक्त ये-जा सुलभ करेल. या दस्तऐवजात टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवणे, इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे, इराणच्या तेलाच्या निर्यातीसाठी ‘ट्रेझरी वेव्हर्स’ (आर्थिक निर्बंधांतून विशेष सवलती) देणे आणि इराणसाठी किमान 300 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा पुनर्बांधणी व आर्थिक विकास कार्यक्रम राबवणे या योजनांची रूपरेषाही मांडण्यात आली आहे. इराणने या सामंजस्य करारात पुष्टी केली आहे की ते अणुशस्त्रांची निर्मिती किंवा संपादन करणार नाहीत. तसेच, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली इराणकडील समृद्ध युरेनियमच्या साठ्याच्या भविष्याबाबत चर्चा करण्याच्या तरतुदींचाही या करारात समावेश आहे.

स्वाक्षरीनंतर दोन्ही देशांना अंतिम वाटाघाटींसाठी ६० दिवसांचा वेळ मिळणार आहे. या काळात इराणचा अणू कार्यक्रम, शिल्लक असलेले आर्थिक निर्बंध आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम करार केला जाईल. ‘जी-७’ देशांच्या प्रमुखांनीही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहने जागतिक व्यापारासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Nashik Vidhan Parishad Election : सकाळपासून मतदानाला सुरुवात; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात, महायुतीतर्फे दराडे रिंगणात

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Nashik Vidhan Parishad Election) आज (दि. १८) सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील (District) विविध मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळणार आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व ९ मतदान केंद्रांवर बॅलेट पेपर व मतदान साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात पोहोचवण्यात आले होते.

या निवडणुकीत महाविकास आघाडीने (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार उभा न केल्यामुळे ही लढत प्रामुख्याने महायुती (Mahayuti) अंतर्गत आणि बंडखोरांभोवती फिरत राहिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) यांच्याबरोबरच मतपत्रिकेवर गोकुळ गिते (भाजप बंडखोर /अपक्ष) आणि प्रसाद हिरे (भाजप बंडखोर) यांचीही नावे राहणार आहेत.

भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे (Prasad Hire) यांनी माघार घेतली आहे, तसेच अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनीही वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आपला प्रचार थांबवून महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, कायदेशीर मुदतीनंतर या घडामोडी घडल्यामुळे होणाऱ्या मतदानाच्या मतपत्रिकेवर गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांची नावे कायम असणार आहेत. यामुळे पसंतीक्रमाची मते फुटण्याची धास्ती महायुतीला सतावत आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळाले. राजकीय वैर विसरून मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट) सुमारे ४५० हून अधिक मतदारांचे स्पष्ट संख्याबळ आहे. संख्याबळ अनुकूल असले तरी ऐनवेळी होणारा संभाव्य दगाफटका आणि अंतर्गत नाराजी टाळण्यासाठी महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित स्थळी (सहलीवर) रवाना करण्याची खबरदारी घेतली आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला नसला, तरी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडखोरांच्या नावांचा मतपत्रिकेवरील प्रभाव लक्षात घेता ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. महायुतीमधील नाराज मतदारांच्या मतांचा कौल आपल्या बाजूने कसा वळवता येईल, यासाठी मविआच्या नेत्यांनी पडद्यामागे रणनीती आखल्याचे बोलले जाते. महायुती आपले संख्याबळ टिकवून नरेंद्र दराडेंना विजयी करणार की मतपत्रिकेवरील बंडखोरांची नावे आणि गुप्त मतदानाची पद्धत नवा ट्रिस्ट आणणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दरम्यान मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वाँच राहणार असून या केंद्रांचे वेब कास्टिंग देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे राजकीय घडामोडी घडत असतांना दुसरीकडे प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात अली आहे. जिल्ह्यात दोन महानगरपालिका, एक कॅन्टॉन्मेंट बोर्ड, ११ नगरपरीषद, ६ नगरपंचायतीचे सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. जिल्ह्यात ९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

अशी आहे मतदारसंख्या

नाशिक महापालिका १२२, भगूर नगरपरिषद २३, देवळाली छावणी परिषद १, दिंडोरी नगरपंचायत १९, पेठ नगरपंचायत १८. इगतपुरी नगरपरिषद २४, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद २३, निफाड नगरपंचायत १९, पिंपळगाव बसवंत नगरपरिषद २९, ओझर नगरपरिषद २८, सिन्नर नगरपरिषद ३४, येवला नगरपरिषद ३०, नांदगाव नगरपरिषद २३, मनमाड नगरपरिषद ३५, मालेगाव महापालिका ८४, चांदवड नगरपरिषद २३, देवळा नगरपंचायत १८, कळवण नगरपंचायत १९, सुरगाणा नगरपंचायत १९, सटाणा नगरपरिषद २८

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. ६१९ मतदारांसाठी ९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. मतदान हे बॅलेट पेपरवर होणार असून मतदारांना पसंतीक्रमाने मतदान करावे लागेल. मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे.

आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

या ठिकाणी पार पडणार मतदान

मतदान केंद्राची इमारत – मतदार क्षेत्र

नाशिक तहसील कार्यालय – नाशिक, भगूर, दे.छावणी परिषद
दिंडोरी तहसील कार्यालय – दिंडोरी, पेठ
इगतपुरी तहसील कार्यालय – इगतपुरी, त्र्यंबकेश्वर
निफाड तहसील कार्यालय- निफाड, पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर नगरपरिषद
येवला तहसील कार्यालय – येवला, नांदगाव मनमाड नगरपरिषद
मालेगाव तहसील कार्यालय – मालेगाव महापालिका
चांदवड तहसील कार्यालय – चांदवड नगरपरिषद
कळवण तहसील कार्यालय – कळवण, सुरगाणा नगरपंचायत
बागलाण तहसिल कार्यालय – सटाणा नगरपरिषद

संपादकीय : १८ जून २०२६ – तहानलेले जलस्रोत अन् नियोजनाची कसरत

0

मृग नक्षत्राचा पूर्वार्ध सरून जून अर्धा संपला, तरी वरुणराजाने महाराष्ट्राकडे फिरवलेली पाठ आणि ‘एल निनो’च्या सक्रियतेने निर्माण केलेले संकट यामुळे संपूर्ण राज्य भीषण आणि चिंताजनक उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आणि विशेषतः नाशिक जिल्हा प्रशासनाने कृषी व औद्योगिक क्षेत्राची सिंचन आवर्तने तत्काळ प्रभावाने बंद करून उपलब्ध जलसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचा घेतलेला निर्णय काळाची गरज असल्याचे म्हणावे लागेल. निसर्गाच्या लहरीपणापुढे मानवी तंत्रज्ञान हतबल ठरत असताना, आता उपलब्ध थेंब-थेंब पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करणे हीच आपली एकमेव ढाल बनली आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख २६ धरणांमध्ये आजमितीस अवघा २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या गंगापूर धरण समूहाने २६ टक्क्यांंची तळमर्यादा गाठली आहे. परिणामी, प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना, औद्योगिक क्षेत्राच्या वाढीव पाण्याच्या मागण्यांना कार दिला आहे. हा निर्णय केवळ उद्योगांना फटका देणारा नाही, तर आर्थिक उत्पादकतेवर परिणाम करणारा आहे; परंतु कोरड्या पडत चाललेल्या विहिरी आणि टँकरवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागाची तहान भागवणे हे कोणत्याही लोककल्याणकारी राज्याचे पहिले कर्तव्य ठरते. ११ तालुयांतील ६५५ गावे आणि वाड्या तीव्र टंचाईच्या झळा सोसत असून, तब्बल १८० टँकर्सच्या माध्यमातून तीन लाख ११ हजार नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला कसरत करावी लागत आहे.

येवला, नांदगाव, इगतपुरी आणि सिन्नर या तालुयांची परिस्थिती तर दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. या संपूर्ण संकटाच्या मुळाशी असलेले ‘एल निनो’चे जागतिक सावट आता अधिक गडद झाले आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात झालेल्या अनैसर्गिक वाढीमुळे मान्सूनचा वेग अचानक मंदावला आणि तो महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवरच खोळंबला. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात ४४ मिलीमीटर पाऊस झाला होता, तर यंदा अवघ्या ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारीच कोरड्या दुष्काळाची भीषण चाहूल देण्यास पुरेशी आहे. अशा स्थितीत केवळ पाणी राखीव ठेवणे पुरेसे नाही, तर त्याची चोरी आणि बेकायदेशीर उपसा रोखणे हे प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी पोलीस, महसूल आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत धरणांवर, कालव्यांवर आणि नदीपात्रात गस्त घालण्याचे जे आदेश दिले आहेत, त्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अनधिकृत मोटारी, बेकायदेशीर पाईपलाईन्स आणि पाण्याचा गैरवापर करणार्‍यांवर थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय हा साठा ऑगस्टअखेरपर्यंत टिकवणे अशयप्राय होईल. दुसरीकडे, बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये म्हणून कृषी विभागाने दिलेला सबुरीचा सल्ला महत्त्वाचा आहे. केवळ तुरळक सरीवर विसंबून शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये; कारण जमिनीत पुरेसा ओलावा आणि खोलीपर्यंत ओल गेल्याशिवाय केलेली पेरणी शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेत ढकलू शकते. अशा वेळी हवामान खात्याच्या अचूक अंदाजांवर आधारित नियोजन आणि ठिबक किंवा तुषार सिंचन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे अनिवार्य आहे.

केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहून चालणार नाही, तर बदलत्या हवामानानुसार पिकांच्या रचनेत बदल करणे आणि कमी पाण्यात येणार्‍या पिकांकडे वळणे हेच दीर्घकालीन उपाय ठरू शकतात. हा केवळ सरकारी पातळीवरील नियोजनाचा विषय नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याचा हा काळ आहे. शहरी भागातील पाण्याचा अपव्यय, गाड्या धुणे, बांधकामांसाठी पाण्याचा बेसुमार वापर यावर आता सामाजिक स्तरावरूनच निर्बंध येणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रानेही पुनर्प्रक्रिया आणि पुनर्निर्मिती या तत्त्वाचा अंगीकार करून दुय्यम पाण्याचा वापर वाढवायला हवा.

जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी म्हटल्याप्रमाणे, निसर्गाच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकार, शेतकरी, उद्योग आणि सामान्य जनता यांनी एकत्र येऊन जलसंधारणाची व्यापक मोहीम राबवली पाहिजे. पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन, छतावरील पाण्याचे संकलन आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा राबवणे ही काळाची गरज आहे. संकट मोठे आहे यात शंका नाही; परंतु संयम, शिस्तबद्ध प्रशासन आणि सजग लोकसहभाग यांच्या त्रिवेणी संगमातूनच आपण या कोरड्या दिवसांवर मात करून ‘एल निनो’चे हे सावट यशस्वीपणे परतवून लावू शकू, हाच विश्वास या घडीला बाळगावा लागेल.