Monday, June 22, 2026
Home Blog Page 13484

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; चौघांनी पूर्ण केली ऑस्ट्रेलियातील खडतर ‘आयर्न मॅन’ स्पर्धा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी 

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणजे ‘आयर्न मॅन’ स्पर्धा. नाशिकच्या चौघांनी काल (दि.०१) ऑस्ट्रेलियाच्या बसेल्टन येथे पार पडलेल्या स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी केली. अतिशय आव्हानात्मक वातावरणात १८ ते ९९ वयोगटासाठी ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते.

नाशिक सायकलीस्टचे सदस्य किशोर घुमरे, प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले असे चौघा खेळाडूंचे नावे आहेत. किशोर घुमरे यांनी 15 तास 11 मिनिट आणि 22 सेकंदात, प्रशांत डबरी यांनी 16 तास 20 मिनिट 33 सेकंदात, महेंद्र छोरीया यांनी 16 तास 20 मिनिट आणि 41 सेकंदात, तर डॉ. अरुण गचाले यांनी 16 तास 56 मिनिट आणि 9 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.

या स्पर्धेदरम्यान थंड पाण्यात जलतरण, प्रतिरोध करणाऱ्या वाऱ्याचा सामना सायकलिंग आणि रनिंग करावी लागते. डॉ. गचाले यांनी शेवटच्या क्षणी अतिशय वेगाने धावून ही स्पर्धा चार मिनिट आधी पूर्ण करत बाजी मारली.

किशोर घुमरे ,प्रशांत डबरी व  महेंद्र छोरीया यांनी मागील वर्षी कोल्हापूर येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी पूर्ण केली होती. तसेच डॉक्टर अरुण गचाले यांनी गोवा येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात पूर्ण केली होती. याआधी नाशिकचे माजी पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनीही या स्पर्धेत आपले नाव कोरले होते.

या स्पर्धेत विजयश्री प्राप्त करणाऱ्या तिघांना  डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब सेंटरचे डॉ. मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन लाभले. तर घुमरे हे नाशिक सायकलीस्टच्या ताफ्यात पंढरपूर वारीपासून दाखल झाले असून तेव्हापासून ते नियमित सराव करतात.

घुमरे नाशिकचे सर्वात तरुण असून अवघ्या ३४ व्या वर्षीच त्यांनी हा किताब आपल्या नावे केल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब सेंटर मध्ये सहा आयर्न मॅन निर्माण झाले असून अजून येणाऱ्या काळात चौघेजण या खडतर स्पर्धेची तयारी करत असल्याची माहिती डॉ. मुस्तफा यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.  या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस तर लागतोच शिवाय खडतर क्रीडाप्रकारामुळे शरीराच्या तंदुरुस्तीला अधिक महत्व दिले जाते.

स्पर्धेसाठी लागलेला वेळ

किशोर घुमरे : १५ : ११ : २२

प्रशांत डाबरी : १६ : २० : ३३
महेंद्र छोरीया : १६ : २० : ४१
डॉ. अरुण गचाले : १६ : २९ : ४२

नाशिकच्या वातावरणामुळे प्रभाव

नाशिकचे वातावरण खूप छान अल्हाददायक असल्यामुळे स्विमिंग, सायकलिंग ,रनिंग याचा सराव चांगल्या प्रकारे झाला. नाशिक मध्ये रनिंग ,सायकलींचे ग्रुप असल्यामुळे ग्रुप सोबत चांगल्याप्रकारे सराव नियमित होत होता. तसेच आपल्या आजूबाजूला धरणे असल्यामुळे ओपन वॉटर स्विमिंगचा सराव चांगला झाला असल्याची प्रतिक्रिया या खेळाडूंनी दिली.

असे असते स्पर्धेचे स्वरूप

या स्पर्धेत 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग,  42 किलोमीटर रनिंग असे असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 तासांचा अवधी  तास दिले जातात.

केंद्राचे ४० हजार कोटी वाचविण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी

अवघ्या ८० तासांचे मुख्यमंत्री म्हणून विरोधकांसाठी टीकेचे आयते कोलीत मिळालेल्या फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.  कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे.

‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भारप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे म्हणाले की, महाराष्ट्राला केंद्राने 40 हजार कोटी रुपये दिले होते. हे पैसे वाचवण्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे नाट्य करण्यात आले होते.  नाव न घेता त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.

आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. यानंतर त्याने राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेले असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, आपल्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले असा प्रश्न नेहमीच विचारण्यात येतो आहे. त्यामुळे हेगडे यांच्या दाव्याने भाजपवरील रोष अधिकच वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

नियमित बातम्या थेट आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी आमचे ‘टेलिग्राम चॅनल’ (Telegram) जॉईन करा 

पारावरच्या गप्पा : समाजाची मानसिकता बदलावी लागेल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

(गावातली सगळी पोर गप्प बसलेली)

रंग्या : अरे तुम्हाला कळलं का? त्या हैदराबादच्या घटनेबद्दल?
दाम्या : हो, कळलं यार ..खूप संताप होतोय? अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचला पाहिजे.
तान्या : पण आपण काय करणार अशावेळी?
दाम्या : आपण ना? आपण फक्त मेणबत्या जाळायच्या ..बस्स ..दुसऱ्या दिवशी रोजच रुटीन सुरु?
हे कधी थांबायचं ?

रंग्या : अगदी खरंय आपण फक्त सोशल मीडियावर बोलतो, निषेध करतो. श्रद्धांजलीपुरता …
दाम्या : किती दिवस सोशल मीडियावरून संताप करणार, रस्ते भरून मोर्चे काढून निषेध करणार?
पाटलाच्या तुक्या : काय रे पोराओ काय झालंय? खूपच रंगात दिसताय तुम्ही ?
दाम्या : तात्या , तुम्ही कालची बातमी वाचलीच असलं. अहो किती दुर्दैवी घटना घडली त्या मुलीसोबत..

पाटलाच्या तुक्या : व्हय म्या वाचली तर .. काळजात चर्रर्र झालं र .. आपल्या समाजातही इतकी घाण मानसिकतेची लोक राहतात?
दाम्या : तात्या, माणसांत माणुसकी राहिली नाही ओ जो पर्यंत कठोर शासन होत नाही तो पर्यंत हे, असं होतं राहणार..उगाच बेटी बचाव आपण नारा देत आलोय…
रंग्या : खरं हाय, अशांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी कायदाही कठोर व्हायला हवा, यापुढे कोणताही माणूस असे कृत्य करणार नाही.

तान्या : खरंच काय त्या मुलीचा दोष होता, अशा अनेक निर्भया आज बळी पडत आहेत. पण निषेध नुसता सोशल मीडियापुता मर्यादित न राहता त्याच न्यायाच्या रूपांतर झालं पाहिजे.
भग्या : खरंय नुसत्या मेणबत्या जाळून आणि मोर्चे काढून काय होणार, लोकांना नुसतं वाईट वाटून काय होणार , यात बदल व्हायला, हवा आपण नुसते म्हणतो भारत युवकांचा देश आहे, मग नुसतं सोशल मीडियावर निषेध करण्यापुरता युवक नकोय, न्यायासाठी लढणारा युवक हवा आहे.

रंग्या : व्हय, प्रत्येक मुलगी हि आपली जबाबदारी आहे असं युवकांनी वागायला हवं..
पाटलाच्या तुक्या : तरुणांची जबाबदारी आहेच पण मुलींनीही आपल्या स्वसंरक्षणासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यायला हवे. यासाठी भाऊ, वडील, नवरा यांनी पुढाकार घेत तिला स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे.
दाम्या : अगदी खरंय, महिला शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. तसेच महत्वाचे म्हणजे समाजात सुद्धा बदल आवश्यक आहे.

पाटलाच्या तुक्या : हो समाजात बदल घडण आवश्यक आहे. कारण अत्याचार करणाऱ्यांना समाजाचा, सुरक्षा यंत्रणांचा धाक राहिला नसल्यानं अशा गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललंय.. मुली-स्त्रियांना सर्व दृष्टीने सक्षम होण्याची गरज आहे… निर्भयपणे वावरता यावं यासाठी वातावरण तयार करावं लागेल, आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल…याकामी अर्थातच पुरुषांना पुढाकार घ्यावा लागेल…

मनपा पूर्व विभागीय कार्यालय द्वारकाला कधी?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जुने नाशिक । प्रतिनिधी

मेनरोड येथे ब्रिटीशकाळात तयार झालेल्या इमारतीत नाशिक महापालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय आहे. दिवसेंदिवस त्याची बिकट अवस्था होत असून मागील बाजूने इमारत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मेनरोड येथील पुर्व विभागीय कार्यालय त्वरीत द्वारका भागातील मनपाच्या जागेत हलविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शहरातील नवीन नाशिक, पंचवटीसह इतर विभागातील विभागीय कार्यालय नवीन झालेले आहेत. मात्र पूर्व विभागाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांसह येथील अधिकारी व सेवकांंना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंग्रजांच्या काळातील या इमारतीत सर्वात पहिले नाशिक नगरपालिकेचे कामकाज चालायचे. यानंतर नाशिक नपाचे रुपांतर महापालिकेच झाले. त्यावेळी देखील काम येथूनच चालविण्यात आले. सध्या पूर्व विभागाचे कार्यालय या ठिकाणी आहे. पूर्व विभागात अनेक दिग्गज नगरसेवक असूनसुध्दा या इमारतीतकडे कोणी पाहीजे तसे लक्ष दिले नसल्याची तक्रार नागरिक करतात. इमारत जीर्ण झाली असून अत्यंत धोकादायक स्थितीत आली आहे.

त्याचप्रमाणे लोकांना किरकोळ कामासाठीही मोठी कसरत करुन या ठिकाणी यावे लागले. पार्कींगचा गंभीर प्रश्न कायम आहे. म्हणून मनपाची सुमारे साडेचार एकर जागा द्वारका भागात आहे. या ठिकाणी मनपाचे विभागीय कार्यालय हलविण्यात यावे. विशेष म्हणजे द्वारका भागात मनपाचे मालकीचा भुखंड आहे. काही जागेत अतिक्रमण झालेले असले तरी इतर मोठी जागा मनपाच्याच ताब्यात आहे. म्हणून प्रशासनाने दखल घेतली तर पूर्व विभागाला देखील नवीन इमारत मिळणार आहे.

पुरातत्व विभाग लक्ष देणार ?
मेनरोडवर महापालिकेची पुरातन दगडी इमारत आहे. पुरातन वास्तुचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या इमारतीकडे पाहिले जाते. परंतु, या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्षांपासून डागडुजीच होऊ शकली नाही. यामुळे पावसाळ्यात इमारतीचा मागील काही भाग ढासळला होता. आता मनपा व स्मार्ट सिटी कंपनी तसेच पुरातत्त्व विभाग हे संयुक्तरित्या या इमारतीची देखभाल व दुरूस्ती करणार असल्याची चर्चा आहे.

तीन वर्षांत ७२ वन्यजीवांचा मृत्यू; नाशिक पश्चिम वनविभागात सर्वाधिक मृत्यू विहिरीत पडून

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रशांत निकाळे

नाशिक जिल्हा वन्यजीवांसाठी असुरक्षित ठिकाण बनले आहे. मनुष्य व प्राण्यांच्या एकमेकांसामोरे येण्याच्या घटना वाढत आहेत. दुसरीकडे मनुष्य रहिवासी भाग हा जंगलांकडे अधिकच सरकू लागल्याने वान्यजीवांना वन्यक्षेत्राचा अभाव होत आहे. गेल्या तीन वर्षांत एकट्या नाशिक जिल्ह्यातील पश्चिम वनविभागात ७२ वन्यजीवांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. वन्यजीवांच्या मृत्यूची नोंद विविध कारणांमुळे झाली आहे. यात विहिरीत पडून, रस्ते अपघात आणि रेल्वे अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांची संख्या अधिक आहे. सध्या रस्ते अपघात हे वन्यजीवांसाठी सर्वात जीवघेणे कारण ठरत आहे.

वनविभागाची आकडेवारी दर्शवते की, ज्या गोष्टी माणसासाठी विकास ठरत आहेत त्याच उलट वन्यजीवांच्या जिवावर बेतत आहेत. रस्ते अपघाताने गेल्या तीन वर्षांत २० वन्यजीवांचा प्राण घेतला. यात बिबट्या, हायना, वुल्फ आणि कासव यांसारख्या लुप्तप्राय प्रजातींचा समावेश आहे. महामार्ग या वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. वेगवान वाहने स्वत:ला प्राण्यांच्या मृत्यूचे कारण म्हणून सिद्ध करीत आहेत. असे दिसून आले आहे की, आतापर्यंत एकाही वाहनचालकाने वन्यजीव उडवल्यानंतर वनविभागाला त्या प्राण्याच्या मदतीसाठी कळवले नाही अथवा स्वतः थांबून त्या प्राण्याला मदत केली नाही.

वनविभागातील अधिकार्‍यांनी सांगितले की, जनजागृती कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात. वनविभाग प्राण्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मुळात लोकांनी वन्यजीवांचे अस्तित्व स्वीकारले पाहिजे. आपण हे मान्य केले पाहिजे की आपण त्यांच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे. वन्यजीवांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. लोकांनी त्यांचे सहअस्तित्व स्वीकारले पाहिजे. वनविभागाने नुकताच एक नवीन उपक्रम सुरू केला असून वन्यजीव बचावासाठी रॅपिड रेस्क्यू टीमची स्थापना केली आहे. त्यासाठी नुकतीच दोन दिवसांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली आणि सुमारे 40 वन सेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

पूर्वकडे माहितीचा अभाव
नाशिकच्या पूर्व वनविभागाकडे वन्यजीवांच्या मृत्यूविषयी माहिती उपलब्ध नाही. ‘देशदूत’ने सुमारे एक महिना माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र पूर्व विभागाने माहिती पुरवली नाही. विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले की, ही माहिती हाताळणारी संबंधित व्यक्ती रजेवर आहे. त्यानंतर असे म्हटले गेले की, जिथे फाईल्स ठेवलेल्या आहेत त्या लॉकरच्या चाव्या उपलब्ध नाहीत. त्यानंतरही विचारणा केलेली माहिती प्रदान करण्यात पूर्व विभाग असक्षम राहिला.

महामार्गांवर फलकांची आवश्यकता
रस्ते अपघात हा वन्यजीवांसाठी सर्वात मोठा धोका आहे. जिल्ह्यात दरवर्षी या घटनांमध्ये वाढ होत आहे. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे कार्य केले पाहिजे आणि वन्यजीव प्रवण क्षेत्र चिन्हांकित केले पाहिजे. त्यांनी महामार्ग व जिल्हा रस्त्यांवरही फलक लावले आहेत, परंतु लोकांचे लक्ष वेधण्यासाठी फलकांचा आकार वाढवलाा पाहिजे.
– अभिजित महाले, वन्यजीवप्रेमी, नाशिक

विद्यापीठांच्या शुल्कावर यूजीसीचे नियंत्रण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | भारत पगारे 

खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कावर आता विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) नियंत्रण राहणार असून शुल्क आकारणीबाबत यूजीसीने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन केल्यास दहा लाख रुपयांचा दंड करण्यासोबतच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यूजीसीने जाहीर केले आहे. यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांच्या निर्देशाने याबाबतची जाहीर सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीवर सूचना करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नियमावली लागू झाल्यास वाढत्या शुल्कापासून विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे. शुल्क नियंत्रणासाठी यूजीसीकडून समित्यांची नेमणूक करण्यात येईल. या समित्या देशातील विविध भागांमध्ये काम करतील. शैक्षणिक संस्थांनी ठरवलेले शुल्क वाजवी आहे का अवाजवी, याची तपासणी समाजातील अनुसूचित जाती-जमाती, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास, अल्पसंख्याक आणि ग्रामीण लोकसंख्या या निकषांवर समितीकडून केली जाईल. शुल्क निश्चिती करताना संस्था नफेखोरी करत आहेत का, हेही समितीकडून तपासण्यात येईल.

शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संबंधित संस्थांना अभ्यासक्रमनिहाय शुल्क मान्यता घ्यावी लागेल. दरम्यान, शुल्क नियंत्रणाच्या समितीत माजी कुलगुरू, शिक्षणतज्ञ किंवा प्राध्यापक, कॉस्ट अकाऊंटंट क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती, सहसचिव दर्जाचा यूजीसी अधिकारी अशा सदस्यांचा समावेश असलेली समिती नेमली जाणार आहे. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. याव्यतिरिक्त दाद मागण्यासाठी स्वतंत्र समितीही असेल, असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही पद्धतीने कॅपिटेशन फी घेता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.

वाढत्या शुल्कामुळे उच्चशिक्षण सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जात असून आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अशक्यप्राय होत आहे. त्यातच देशात खासगी विद्यापीठांची संख्या वाढत आहे. या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या शुल्कावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे या विद्यापीठांनी सर्रास शुल्कवाढ केली आहे. या शुल्काला चाप लावण्याची मागणी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडून सातत्याने होत आहे. काही दिवसांपूर्वीच यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्याबाबात पावले उचलण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. या नियमावलीवर शैक्षणिक क्षेत्रातील भागधारकांकडून पंधरा दिवसांत हरकती, सूचना नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

विद्यापीठांना वाहतूक, वसतिगृह, पुस्तके अशा सुविधांची विद्यार्थ्यांना सक्ती करता येणार नाही. या सुविधांचा लाभ घेणार्‍यांकडून केवळ त्यासाठीचे शुल्क घेता येईल. किमान सहा महिने आधी शुल्काची मान्यता शुल्क नियंत्रण समितीकडून घ्यावी लागेल. शुल्कातून अतिरिक्त उत्पन्न झाल्यास त्याचा वापर विकासकामांसाठीच करावा लागेल. अन्य कोणत्याही कामासाठी त्या रकमेचा वापर करता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठांना कॅपिटेशन फी घेता येणार नाही. शुल्कासाठीचे खाते शेड्यूल्ड बँकेत काढावे लागणार असून बँक खात्याचा वापर कर्ज किंवा इतर कारणासाठी करता येणार नाही. विद्यापीठाला विकास खाते आणि देखभाल खाते ठेवावे लागणार आहे. विकास शुल्कासाठी घेतलेले शुल्क विकास खात्यात जमा करावे लागणार आहे.

शेअर-ए-रिक्षाला अव्वाच्या सव्वा भाडे ; शहर बसला अच्छे दिन?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील २७ रिक्षा थांब्यांवरून ५४ मार्गांसाठी शेअर-ए-रिक्षा प्रवासी वाहतूक (दि. १) सुरू करण्यात आली आहे. मात्र तत्कालिन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले भाडेदर कुणालाही परवडणारे नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. सध्या रिक्षाचालक नाशिकरोड ते सीबीएस या मार्गावर प्रतिप्रवासी ३० रूपये प्रवासी भाडे आकारत असतांना शेअर रिक्षाचे हेच प्रतिप्रवासी भाडे ५८ रूपये आहे. त्यामुळे गरीबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत हे ‘अवास्तव’ भाडे देण्यास तयार होणार नसल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले आहे.

या विचित्र धोरणामुळे शेअर रिक्षांचे प्रवासी शहर बससेवेला प्राधान्य देऊ शकतात. त्यामुळे शहर बसला अच्छे दिन येण्याची शक्यता वाढली आहे. शहरात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात राज्य-परराज्यातून लाखो भाविक येतात. त्यांची प्रवासादरम्यान रिक्षाचालकांकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी आरटीओकडून शेअर- ए- रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी २७ थांब्यावरून ५४ मार्गांसाठी शेअर- ए- रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीओच्या नियमानुसार मुंबई, ठाणे आणि पुणे शहराच्या तुलनेत शेअर-ए-रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी नाशिक शहरासाठी सर्वाधिक भाडेदर देण्यात आला आहे.

कायदा जनतेसाठी आहे की कुणासाठी हे समजत नाहीये. अचानक रिक्षा थांबे घोषित केले. मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त व परिवहन अधिकारी यांच्या कौतुकासाठी शब्द नाहीत. हा क्रांतिकारी निर्णय आहे. आम्ही वर्षानुवर्षे थांबे मिळविण्यासाठी खेट्या मारतोय, यांनी एका दिवसात थांबे मंजूर केले. इतके भाडे असल्यावर जनता या रिक्षांत बसेल का? हा मोठा प्रश्न आहे.
भगवंत पाठक, श्रमिक सेना, जिल्हाकार्याध्यक्ष

भाडे प्रति प्रवासीच
आरटीओ, वाहतूक पोलिसांनी हे भाडे दर निश्चित केले आहेत. परंतु शेअर-ए-रिक्षाचे हे दर प्रतिव्यक्ती असे ठरविण्यात आले आहे. जेथे रिक्षा प्रवासाला २० रूपये लागतात, तेथे शेअर रिक्षाच्या प्रवाशाला ४० रूपये म्हणजे दुप्पट भाडे मोजावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात ‘नाशिककर’ या सेवेकडे कसे पाहतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्याचा शेअर ए रिक्षांचा दर हा कुंभमेळ्यामध्ये समितीने ठरवलेला आहे. हे दर प्रती व्यक्तीसाठीचेच आहेत. निश्चित केलेल्या मार्गांवर प्रवाशांनी मागणी केल्यानंतर रिक्षांना मिटर प्रमाणे जाणे बंधनकारक आहे. यामुळे शेअर किंवा मिटर ज्या पद्धतीने परवडेल त्या पद्धतीने नागरीक प्रवास करू शकतात. हा पब्लिक चॉईस आहे. अधिक रिक्षा मिटर प्रमाणे चालाव्यात हा आमचा आग्रह आहे.
भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

शेअर रिक्षात तीन प्रवासी बसले असतील तर, त्या तिघांनी त्या मार्गावरील भाडे विभागून द्यावयाचे आहे. दोन प्रवासी असतील, तरी त्यांनी ते विभागूनच द्यायचे आहे. आरटीओने अभ्यास करून हे भाडेदर ठरविले आहेत.
पौर्णिमा चौघुले पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक, नाशिक.

उडीद १२०, मूगडाळ ११० रुपये किलो डाळी कडाडल्या; दर आणखी वाढण्याची चिन्हे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून उडीद १२० तर मूगडाळ ११० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मागील आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळी आयात केल्या तरच दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या डाळींचे भाव कडाडले आहेत.

महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांतूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र यंदा परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. हातातोंडाशी आलेले कडधान्याचे पीक आडवे झाले. डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी वाढली असून पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, उडीद आदींच्या किमतींनी प्रतिकिलो शंभरी पार केली आहे.

होलसेल किराणा दुकानात साधारण: ९० ते १२० रुपये किलो दराने डाळींची विक्री होत आहे. अनेक दुकानदारांची भिस्त ही डाळींच्या जुन्या स्टॉकवरच आहे. एकाएकी दर वाढल्याने ग्राहकांना जादा पैसे मोजून डाळी खरेदी करावी लागत आहे. त्यावर पर्याय म्हणून काही ग्राहक नेहमीच्या तुलनेत कमी डाळ खरेदी करत आहेत. पुढील काळात डाळींच्या किमतीत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब होण्याची चिन्हे आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

डाळींचे भाव रुपये
तूरडाळ- ८५ -१००
मूगडाळ- ८५ – ११०
हिरवे मूग- ८५-९०
हरभरा- ६५-७०
उडीद- ११०-१२०

केंद्र सरकार आयात करणार
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कडधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे चालू हंगामात डाळींचे नवीन पीक बाजारपेठेत येऊ शकले नाही. केंद्र सरकार इतर देशातून डाळी आयात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयात केल्यावरच डाळींचे चढे दर कमी होतील.

मागील काही दिवसांत डाळींच्या दरात प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत डाळींचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. – कैलास मालपुरे, किराणा दुकानदार

मिनी मंत्रालयातही महाविकास आघाडी पॅटर्न?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | विजय गिते

राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे.हीच परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेतही राहणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.तसे पाहता पूर्वापार चालत आलेली शिवसेना-भाजपा युतीला नाशिक जिल्हा परिषदेत बहुमत होते. मात्र,मागील वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत कात्रजचा घाट दाखविला होता.मात्र,सभापती निवडीच्यावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत त्याचे उट्टे काढले होते.या दोघांनाही फुटीर काँग्रेसच्या सदस्यांची साथ मिळाल्याने चारही सभापतीपदावर या तीन पक्षांना वर्चस्व स्थापन करता आले होते.आता राज्यात नवीन राजकिय समीकरण उदयास आल्याने शिवसेनेचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होऊ शकतो.मात्र,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच बहुमताचा आकडा पार होणार असल्याने काँग्रेसला सत्तेत वाटा मिळणार की नाही? याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे.

राज्याच्या राजकारणात नवी अघाडी उदयास आली असली तरी नाशिक जिल्हा परिषदेत मात्र यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०१७ मध्येच अशा आघाडीतून जिल्हा परिषदेत अध्यक्ष शिवसेनेचा तर उपाध्यक्ष काँग्रेसचा अपक्षांच्या पाठींब्यावर झालेला आहे.राज्यामध्ये युती असताना त्यावेळी जिल्हा परिषदेतही शिवसेनेचा अध्यक्ष तर काँग्रेसचे उपाध्यक्ष पद असे राजकीय गणित जुळवण्यात आले होते.मात्र,याचे उट्टे सत्तेपासून कोसो दूर राहिलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र काढली अन चारही सभापती पदे मिळवली होती.त्यावेळी त्यांना फुटीर काँग्रेसच्या सदस्यांचीही साथ मिळाल्यानेच हे शक्य झाले होते.

आता लवकरच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.जानेवारीमध्ये होणार्‍या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणुकीसाठी आता नव्याने जुळून येणारे समीकरण लक्षात घेतले तर जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे निश्चित झाले आहे.या महाविकास आघाडीतून अध्यक्षपदही अर्थातच शिवसेनेकडे(सर्वाधिक सदस्य संख्या असल्याने) जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्याखालोखाल सदस्य संख्या असून त्यांना उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचा मिळूनच बहुमताचा आकडा पार होत असल्याने त्यांना काँग्रेसचीही गरज राहणार नाही.मात्र,राज्यात नव्याने उदयास आलेल्या महाआघाडीचा येथेही प्रयोग झाल्यास त्यांना काँग्रेसलाही नाही म्हटले तरी एखादे पद देणे क्रमप्राप्त होणार आहे.

राज्यात झालेली अघाडी म्हणजे तीन चाकाची गाडी अशी टिप्पणी विरोधकांकडून व्यक्त होत आहे.मात्र,अशा परस्परविरोधी विचारांची आघाडी यशस्वी होऊ शकते आणि कार्यकाळ देखील पूर्ण करू शकते,हे नाशिक जिल्हा परिषदेने दाखवून दिले आहे.त्यामुळे आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा फडकवतील,अशी परिस्थिती आहे.

जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांची संख्या ७३असून शिवसेनेकडे २५,भाजप १५,राष्ट्रवादी काँग्रेस१९,काँग्रेस ८ आणि अपक्ष तीन असे बलाबल आहे. मात्र,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चार जिल्हा परिषद सदस्यांनी निवडणूक लढविल्याने चार जागा रिक्त झाल्या आहेत.त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेनेकडे २४,भाजपाकडे १५,राष्ट्रवादी काँग्रेस १६,काँग्रेस ८ तर अपक्ष ३ असे बलाबल आहे.त्यामुळे ७३ वरून ही सदस्यसंख्या ६९ वर आली आहे.यामुळे रिक्त झालेल्या चार जागांपैकी तीन जागांवर पोटनिवडणूक होत आहे.अध्यक्ष,उपाध्यक्षपदाची निवडणूक अद्याप शासनाने जाहीर केलेली नाही.त्यामुळे पोट निवडणुकीतुन विजयी होणारे तीनही सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

राज्यातील महाअघाडीचे समीकरण जिल्ह्यातही जुळून आले तर सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेनेकडे २४ सदस्य संख्या असल्याने त्यांचा अध्यक्ष पदावर दावा राहणार आहे.असे झाल्यास राष्ट्रवादीकडे सोळा सदस्य असल्याने उपाध्यक्षपद जाऊ शकते.मात्र,असे समीकरण नव्याने जुळवून घेताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडे अध्यक्षपदाचा आग्रह धरल्यास त्यात नवल वाटायला नको.कारण आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही शिलेदारांची भूमिका अध्यक्षपद मिळविण्यासाठी सुरू झाल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या पारंपारीक युतीतील शिवसेनेचा सहकारी असलेल्या भाजपकडे सध्या पंधरा सदस्य संख्या असून त्यांच्याकडून बहुमतासाठी ३७ हा जादुई आकडा जुळविणे अशक्य होणार आहे.फोडाफोडीच्या राजकारणात भाजपच्या हाती काही लागणार का?हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे आहेत इच्छुक
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीला तशी सुरुवातही झाली असून अनेक जण अध्यक्षपद,उपाध्यक्ष पदासह सभापतीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी शिवसेनेकडून विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे,बाळासाहेब क्षीरसागर ,दिपक शिरसाट,सुरेखा दराडे,सुनीता पवार,निलेश केदार राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय बनकर ,मंदाकिनी बनकर,महेंद्रकुमार काले,किरण थोरे भाजपाच्या मनिषा पवार अशी नावे चर्चेतून पुढे केली जात आहेत.

अभ्यास दौर्‍याचा निधी संकटग्रस्त शेतकर्‍यांना; जि. प. महिला व बालकल्याण समितीचा निर्णय – सभापती खोसकर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत विदर्भातील जिल्हा परिषदांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची पद्धत जाणून घेण्यासाठी महिला व बालकल्याण समितेचा नियोजित अभ्यास दौरा रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.या अभ्यास दौर्‍यासाठी तरतूद करण्यात आलेल्या पाच लाखांचा निधी जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.यामुळे बळीराजा उध्वस्त झालेला आहे नुकसानग्रस्त शेतीमालाचे पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत,माजी पालकमंत्री गिरीश महाजन,आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे.शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दिलेल्या निवेदनात नाशिक जिल्ह्याचा आवर्जून उल्लेख केला होता.

नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या काळात जिल्ह्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची बाब यातून पुढे आली होती.त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे अभ्यास दौर्‍यावर निधी खर्च करणे संयुक्तिक नाही,असे सांगत सभापती खोसकर यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण समिती विदर्भामध्ये अमरावती,वर्धा,नागपूर,गोंदिया,भंडारा जिल्हा परिषदांना भेटी देण्याचे नियोजन होते. समितीच्या अभ्यास दौर्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये पाच लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.मात्र,हा दौरा रद्द करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या दौर्‍यातील निधी संकटग्रस्त शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्ग करून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना,आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची शिफारस समितीच्या सभासदांनी सभापतींकडे केली.त्यानुसार हा निर्णय घेतला असल्याची माहिती सभापती खोसकर यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत.अशा वेळी त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीने अभ्यास दौरा रद्द करत हा निधी शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच बैठक घेणार आहे.यामध्ये फरक केलेला पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला जाणार आहे. अर्पणा खोसकर; सभापती महिला व बालकल्याण,जि.प.