पुणे | Pune
काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ठिकाणी असलेल्या निरपराध पर्यटकांना घेरून, त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पेक्षा जास्त लोक ठार झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा निष्पाप बळी गेला. बालपणापासूनच्या या मैत्रीचा शेवट मात्र, दुर्दैवी झाला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी गणबोटेंच्या पत्नीने थरारक प्रसंग सांगितला आहे.
आपल्या पतीची आपल्याच डोळ्यांसमोर हत्या झाली हे सांगताना त्यांच्या तोडातून शब्दच निघत नव्हते. तिथे नेमके काय घडले हे त्यांच्या तोंडून ऐकताना सगळ्यांच्यांच अंगावर काटा आला. दहशतवाद्यांच्या क्रूरपणामुळे गणबोटे यांच्या घरातील आधार हरवला, सर्वांच्या हुंदक्यांनी तो परिसर अक्षरश: सुन्न झाला होता.
शरद पवार यांनी गणबोटे कुटुंबियाची भेट घेऊन त्यांच सांत्वन केले. सर्व घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव सांगितला. आम्ही पहलागामला फिरायला गेलो होतो, तेवढ्यात तिथे हे बंदुकधारी दहशतवादी आले. माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. आम्हाला अजान म्हणा असे सांगण्यात आले होते. ते ऐकून तिथे असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हणायला सुरूवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या सगळ्या पुरूषांना मारू टाकले. आमच्या देखतंच त्यांना गोळ्या घातल्या.
पुढे त्या म्हणाल्या, ते कुराणवरून काहीतरी तिथे झाले होते. हल्लेखोरांनी आम्हाला अजान वाचायला सांगितले. आम्ही सगळ्या महिलांनी तिथे मोठमोठ्यांनी अजान म्हटले. मारणारे चार जण होते. तिथे एक जण मुस्लीम घोडेवाला होता, त्याने त्या हल्लेखोरांना विचारले. या निष्पाप लोकांना का मारत आहात. त्यांनी काय चुक केली आहे. त्यानंतर त्याच्यावरती कपडे काढून गोळ्या झाडल्या. तो मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, पण त्यालाही मारले.
आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली, सैन्य दलाची देखील मदत झाली. पण ती उशिरा झाली. तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या, तुम्ही अजान वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हटले. पण, त्यांनी आमच्या माणसांना मारले. तिथे गेटवर एक मुस्लिम होता. तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता. त्यांनी काय चुक केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथे घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आमच्या घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते. ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर आम्हाला घ्यायला आले. त्यांचा मित्र बाजूला होता. त्याला बोलावून घेतले आणि म्हणाला ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, असेही त्यांनी पुढे सांगितले.
महाराष्ट्रातील मृतांची नावे
या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल