नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर काल (दि. २२ एप्रिल) रोजी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना (Tourist) त्यांचे नाव आणि धर्म विचारत अंदाधुंद गोळीबार केला.
पहलगाममधील (Pahalgam) या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात एक फोटो देशभर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नौदल अधिकारी असणारे लेफ्टनंट विनय नरवाल (Vinay Narwal) मृतावस्थेत पडलेले आणि त्यांची नवविवाहित पत्नी हिमांशी नरवाल त्यांच्या शेजारी अस्वस्थअवस्थेत बसलेली दिसत आहे.
हरियाणातील (Haryana) कर्नाल येथील लेफ्टनंट विनय नरवाल (२६) हे काल (दि.२२) रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. अवघ्या सात दिवसांपूर्वीच हिमांशी नरवालशी त्यांचे लग्न झाले होते. दोन दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशी हनिमूनसाठी जम्मू-काश्मीरला पोहोचले होते. मंगळवारी ते बैसरन व्हॅलीमध्ये फिरत असताना दहशतवाद्यांनी विनयवर गोळीबार केला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, त्यानंतर आज विनय नरवाल यांचे पार्थिव दिल्लीत (Delhi) आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. आपल्या पतीचा मृतदेह समोर येताच पत्नी हिमांशीने एकच टाहो फोडला होता. यावेळी तिने लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन ‘जय हिंद’ विनय असे म्हणत साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.