दिल्ली । Delhi
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर अचानक गोळीबार केला. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध ठिकाणी नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या घटनेने देशाचे मन हेलावून टाकले असून, सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे माजी पॅरा कमांडो होते, असे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेषतः, या कारवाईत हाशिम मूसा नावाच्या पाकिस्तानच्या नागरिकाचा प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
हाशिम मूसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा (SSG) माजी पॅरा कमांडो आहे. सैन्यातील कारकीर्दीनंतर त्याने लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केली. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, मूसा याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते आणि त्याला भारतात हल्ला घडवून आणण्याचे आदेश देण्यात आले होते.
मूसा फक्त हल्लेखोर नव्हता, तर हल्ल्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्री आणि प्रशिक्षण पुरवणाऱ्या टीमचा देखील भाग होता. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांवर, पर्यटकांवर तसेच सुरक्षादलांवर लक्ष केंद्रित करून हल्ला करण्याचे नियोजन केले होते.
या घटनेमुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय तपास संस्थांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. तसेच, पाकिस्तानकडून प्रायोजित दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी देशभरातून होत आहे.
सध्या पहलगाम परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून, उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी कमालीची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.