नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या कडक पावलामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानी सैन्यांकडून मध्यरात्री विनाकारण गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलेय.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरवारी आणि शुक्रवारी रात्री, काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तान लष्कराकडून भारताच्या विविध चौक्यांवर विनाकारण गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानला ही भीती सतावत आहे की, भारतीय सेना सीमारेषा पार करून पाकिस्तानात घुसू नये. सीमेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांकडून २५ आणि २६ च्या रात्री मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आल्याचे भारतीय सैन्याने सांगितले.
याआधी पाकिस्तानी सैन्याने गुरूवार-शुक्रवार रात्री नियंत्रण रेषा (एलओसी) वर अनेक चौक्यांवरून मोठ्या प्रमाणात गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोट्या शस्त्रांच्या साहाय्याने काही ठिकाणांवरून पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने याला प्रभावीपणे उत्तर दिले.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वरिष्ठ लष्करी कमांडर्ससोबत श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा