Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपैठण येथे पैठणी क्लस्टर निर्माण करणार - मुख्यमंत्री शिंदे

पैठण येथे पैठणी क्लस्टर निर्माण करणार – मुख्यमंत्री शिंदे

पैठण |प्रतिनिधी|Paithan

पैठण येथील जगप्रसिद्ध पैठणी अधिक गुणत्तापुर्ण होण्यासाठी विणकाम करणार्‍यांसाठी क्लस्टर निर्माण करण्यात येईल. वारकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी तातडीची बैठक घेऊन संतपीठाच्या विकासासाठी वीस कोटी रुपयांच्या निधीला लवकरच मंजूर देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

- Advertisement -

सोमवारी (दि.12) पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी शिवसेनेत प्रवेश केला तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पैठण शहरांमध्ये सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय लवकरच निर्माण करण्यात येईल. याबाबत तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. विरोधकाचा समाचार घेताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दिवसभर तीन टाइम टीका करणार्‍यांनी टीका करण्याचा मुद्दा नसल्याने लोकप्रिय मंत्री संदिपान भूमरे यांनी पैसे खर्च करून सभेसाठी माणस आणल्याचे आरोप केले जात आहे. हा विराट जनसमुदाय विकत घेता येत नाही असे ते म्हणाले. पैठण तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवण्यासाठी राज्य शासन भुमरे यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहे असे शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

याप्रसंगी तालुक्याचे आमदार तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे यांनी पैठण तालुक्याच्या वतीने भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त करून विविध समस्या मांडल्या. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधान परिषद अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, बंदरे व खान मंत्री दादा भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई, अन्न मंत्री संजय राठोड, आमदार शहाजी पाटील, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, प्रशांत बंब, प्रमोद बोरणारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, मार्केट कमिटीचे सभापती राजू भुमरे, सरपंच शिवराज भुमरे, नाथ संस्थान मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, शहर प्रमुख तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, भाजपच्या प्रदेश महिला प्रमुख रेखा कुलकर्णी, सुनील शिदे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या