नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तावर कठोर निर्बंध लागू केले. भारताने पाकिस्तानसोबतचा अनेक करार स्थगित केला. पहलगामवरील हल्ल्याला आता बरेच महिने झाले आहेत. भारताच्या या कठोर निर्णयांनंतर पाकिस्ताननेही भारताविरोधात काही निर्णय घेतले होते. या निर्णयांतर्गत पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली. भारताच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांना त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.
भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने पाकिस्तानला दोन महिन्यांत १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. २३ एप्रिल रोजी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.
पाकिस्तानने भारतविरोधी घेतलेल्या या निर्णयांचा नेमका काय परिणाम झाला? याची माहिती पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत दिली. या माहितीनुसार पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केल्यामुळे रोज १०० पेक्षा जास्त विमानोड्डाण प्रभावित झाले. त्याचाच परिणाम म्हणून २४ एप्रिल ते ३० जून या काळात 4.10 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (साधारण १२७ कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे.
पाकिस्तानने अनेक वेळा आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्येही पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. त्या काळात पाकिस्तानला ५४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर खूप तणाव होता. याच कारणामुळे पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले.
दरम्यान, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्राची बंदी २४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही बंदी आता २४ ऑगस्ट रोजी पहाटे ४.५९ पर्यंत कायम राहिल. पीपीएने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले की, भारतीय नोंदणीकृत विमाने, भारतीय विमान कंपन्यांनी चालविलेले आणि तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र उपलब्ध नसेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




