नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शेजारच्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप खराब आहे. लोकांकडे खायला पैसे नाहीयत. सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. पण आता पाकिस्तान सरकारसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांनी हैदोस घातला आहे. पाकिस्तानी संसद उंदरांमुळे त्रस्त आहे. या समस्येच्या निवारणासाठी सरकारने एक पाऊल उचले असून संसदेतील उंदरांचा निपटारा करण्यासाठी मांजरांची नियुक्ती करणार आहे.
पाकिस्तान संसद या उंदरांमुळे मेटाकुटीस आले आहे. या उंदरांनी संसदेतील शेकडो फाईल्स कुरतडल्या आहे, तसेच कॉम्युटर्सच्या वायरींचे देखील नुकसान केले आहे. पाकिस्तान सरकार तेथील संसदेतील उंदरांमुळे मोठ्या प्रमाणात हैराण झालेले आहे त्यामुळे संसदेत फक्त मांजरी तैनात करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्च करणार असल्याचे समजते आहे.
पाकिस्तानच्या कॅपिटल डेव्लपमेंड अथॉरिटीने मांजरांना सांभाळण्यासाठी हे बजेट तयार केले असून या योजनेनुसार विशेष प्रशिक्षित मांजरांना संसद परिसरात ठेवण्यात येईल. उंदीर पकडून त्यांना मारणे हेच त्यांचे एकमेव काम असेल.
पाकिस्तानची सिनेट, नॅशनल अॅसेंब्ली, सचिवालय या परिसरात पेस्ट कंट्रोल केले जाणार आहे. खासगी संस्थांना हे काम सोपवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार संसदेच्या छताला किड लागल्याने उंदरांची संख्या वाढली आहे. पाकिस्तानच्या संसदेमधील अस्वच्छता हा अनेक वर्षांपासूनचा एक मोठा मुद्दा आहे.
मांजराच्या तैनातीमुळे फक्त उंदरांच्या समस्येपासूनच सुटका होणार नाही, तर ही एक नैसर्गिक आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धत आहे. मांजरांना यासाठी स्पेशल ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्यांना संसद परिसरात ठेवले जाईल. ही योजना अनेकांना गमतीशीर वाटत असली तरी पण एका गंभीर समस्येवर हा उपाय आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा