नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अणुचाचणी करण्याच्या दाव्यानंतर जगात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तान, चीन आणि रशिया, उत्तर कोरिया अण्वस्त्रांच्या चाचण्या गुप्तपणे करत असल्याचे त्यांनी म्हटले. हेच नाही तर त्यांनी देखील अण्वस्त्रांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले. संपूर्ण जग हे करत आहे, मग आपण कशाला मागे राहायचे असे त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर अनेक देशांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली असून एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला उत्तर दिले आहे. ‘आम्ही अणुचाचण्या पुन्हा सुरू करणारे पहिले देश राहणार नाही’, असे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिले आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचा देश नियमांविरुद्ध कोणत्याही चाचण्या करणार नाही. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांनी चाचणी बंदी करार (CTBT) वर सही केलेली नाहीये. CTBT वर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका देखील समाविष्ट आहे. मात्र, पाकिस्तानने म्हटले की, आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन कोणतीही चाचणी करत नाही. मग प्रश्न पडतो की, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा आहे का?
दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर ही प्रतिक्रिया दिली असली तरी अद्याप पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ किंवा त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे शाहबाज शरीफ यावर नेमके काय बोलणार? हे देखील महत्वाचे असणार आहे.
पाकिस्तानने स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानने 1998 मध्ये अणुचाचणी केली, असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, पाकिस्तानचे एक क्षेत्र असे आहे की, तिथे नेहमीच भूकंप येत राहतो आणि त्याच भागात पाकिस्तान वारंवार अणुचाचण्या करत असल्याचे सांगितले जाते. भारतासाठी खरोखरच ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा असून भारत यावर काय मार्ग काढतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय आहे?
“रशिया आणि चीन अण्वस्त्रचाचण्या करीत आहेत. पण, ते त्याविषयी काही बोलत नाहीत. आम्ही वेगळे आहोत. आम्ही त्याविषयी बोलतो… आम्ही चाचण्या नक्कीच करू. कारण ते आणि इतर चाचण्या करीत आहेत. उत्तर कोरिया आणि पाकिस्तानही चाचण्या करीत आहेत.’ आपण अण्वस्त्रे तयार केल्यावर त्याची चाचणीच केली नाही, तर कसे चालेल? अण्वस्त्रे काम करत आहेत, की नाही, हे कसे समजेल?”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




