Monday, November 25, 2024
Homeब्लॉगपलना...

पलना…

शक्षकाच्या नजरेला मुलांच्या भावभावना टिपता यायला हव्यात. एक माणूस म्हणून सभोवतालच्या मुलांच्या वागण्यातील बदल समजून घ्यावेत. मुलांविषयी सजग राहिले की ते मनात आणि मनातून थेट कागदावर टिपता येते. अशाच यादगार भेटी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे नवे कोरे सदर.

दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू होते. शाळा सुरू होण्याआधी पहिलीत यंदा कोणते विद्यार्थी दाखलपात्र आहेत, याची माहिती घेण्यासाठी एप्रिलमध्ये आजूबाजूच्या वाड्यांमध्ये आणि पाड्यांमध्ये सर्वेक्षण करावे लागते. वय वर्षे सहा पूर्ण असतील अशा बालकांची नावे घ्यावी लागतात.

अशाच एका सर्वेक्षणासाठी मी शाळेपासून पाच-सहा किलोमीटर दूर असणार्‍या एका वाडीत गेले होते. वेळ साधारण दुपारी 12.30 वाजेची असावी. एप्रिलचे ऊन लक्षात घेता यावेळी शेतावर कामासाठी गेलेले लोक घरी जेवण आणि आरामासाठी परत येतात. त्यामुळे त्यांची भेट होते. मी गेले तेव्हा पाच लहान मुले बाहेर खेळत होती. त्यात दोन मुले आणि तीन मुली. मातीमध्ये काहीतरी खेळ त्यांचा सुरू होता.

- Advertisement -

सगळ्यांचेच कपडे मातीने भरलेले होते. मुलींच्या केसात कसलीशी फुले होती. विशेष म्हणजे मुलगा-मुलगी भेद नव्हता. सगळ्यांचेच सरसकट ढगळे शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेले होते. मी थोडा वेळ त्यांचा खेळ बघत उभी राहिले. त्यांच्या खेळाचा विषय होता- मोर. त्या खेळात चिखलाने बनवलेले मोर होते. अर्थात, अगदीच मोर नव्हते ते. मला तरी थोडे बैल वाटत होते ते. पण त्यांना ती लेकरे मोर म्हणत होती.

अचानक मी तिथे असल्याची चाहूल त्यांना लागली. सगळी लेकरे सावध झाली.

मी : काय रे, तो बैल दिसतोय मला.

मुलगी 1 : न्हाय, त्यो मोर हाये..

तितक्यात एका घराच्या दारातून आवाज आला. चिंधे, बास की आता. चले, गपकन घरात ये. नंतर मंग कापड धुवून जायाचं आहे तिकडं शेतावं (शेतावर)

तितक्यात चिंधी उठली. सर्व मुलांमध्ये तीच मोठी दिसत होती. चिंधी तिच्या घरात गेली आणि तिच्यामागे मी पण गेले. घरात गेल्यावर त्या बाईने मी कोण, कुठली आहे, ही चौकशी केली. माझा परिचय दिल्यावर त्यांनी सांगितले की, चिंधी त्यांची भाची आहे. चिंधीची आई तिसर्‍या बाळंतपणानंतर चिंधीला इकडेच ठेवून तिच्या लहान बहिणीला आणि बाळाला घेऊन माहेरी गेली आहे.

मी : ही किती वर्षाची आहे?

आत्या : आसंन सा-सात वर्षाची?

मी : इकडे अंगणवाडीमध्ये जात होती का?

आत्या : न्हाई. तिला साळं मधी जायाला न्हाई पसंद. पन नाव आहे वाटतं तिकडं. ते महिन्याला काहीबाही धान्ये मिळते. त्येच्या मायला बी मिळायचं पोटात बाळ व्हतं तेवा.

मी : बर, पण आता तर तिला शाळेत टाकावे लागेल ना. सहा वर्षांची झाली. पहिलीत टाकावे लागेल तिला.

आत्या : व्हयजी. त्येचा बाप येईन पुढल्या आठवड्यात. तवा सांगते आश्रमला (आश्रमशाळेत ) भेटायला.

मी : तिचे नाव सांगा आणि जन्मतारीख पण. आणि तिच्या वडिलांचा फोन नंबर असेल तर सांगा. मी लिहून घेते माहिती.

आत्या : तेचं नाव चिंधी. जन्मसालचा कागद हाये हास्पिटलचा. पन धुंधावा लागील. (माझ्यापुढे कॅलेंडर करत) ह्यावर बगा. भाऊचा नंबर असीन. घ्ये लिवून.

मी : बरं. पण तुझ्या दादाला सांग की, शाळेत येऊन भेटा नक्की.

मी तिथून निघाले. आमचे सगळे बोलणे जेवता जेवता चिंधीने ऐकले असावे. ती हात धुवून माझ्या गाडीपाशी येऊन उभी राहिली.

मी : मग चिंधी, यायचे ना शाळेत? तुझ्या वाडीतले खूप जण आहेत. येशील ना ?

चिंधी : बगू.

मी : बरं. पण तुझे पप्पा आले की ये हं शाळेत.

मी तिथून निघाले.

साधारण जूनमध्ये चिंधी तिच्या वडिलांसोबत शाळेत आली. रडून रडून डोळे सुजले होते. कदाचित तिला शाळेत यायचे नव्हते. मला बघताच ती तिच्या वडिलांच्या मागे लपली. आज स्वच्छ होती. केस छान विंचरलेले होते. काठापदराच्या साडीचा शिवलेला फ्रॉक तिने घातला होता.

मी : का रडतेस गं? यायचे नाही का शाळेत?

चिंधीचे वडील : न्हाई म्हणतीया ती. नुस्ता खोपटा डोक्यावं घेतलाय कालपास्न. हा घ्या हिचा जल्मदाकला.

मी तिचा जन्म दाखला हातात घेतला. त्यात तिचे नाव लिहिले नव्हते. दवाखाना, आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख असे सगळे लिहिले होते.

मी : अहो दादा, हिचे नाव काय? यात तर नाव नाही काहीच. जवळच्या अंगणवाडीत नाव होते न तिचे. तिची आत्या मला असे म्हणाली होती तेव्हा.

चिंधीचे वडील : व्हय. पण तेवा हाच कागुद देला व्हता. पर ही प्वार गेलीच न्हाय साळेत. चिंधी असं नाव लिवून घे म्याडम.

तेवढ्यात चिंधी पुढे आली आणि तिने मोठ्याने भोकाड पसरले.

चिंधी : (मोठ्याने रडतच) व्हय. मंग मला समदी बोलतात. चिंधे, चिंधडे, चिंधू. म्हून मला साळा नको म्हंजी नको. (वडिलांना उद्देशून) तुमी गेलं हिथनं की म्या त्ये राम्याच्या मळ्यात भागून (पळून) जाणारे.

मी : अरे बापरे, असे आहे तर. मी बघते बरं आता तुला इथे कोण चिंधी म्हणते? आपण तुझे एक छान नाव ठेवू. चालेल का? (मी तिच्या वडिलांना खुणावत विचारले. तसा त्यांचा मानेने होकार आला.)

तुला काय आवडत सांग बरं?

चिंधी : (डोळे पुसत) मला लाल शेव (गुडीशेव) अन् भत्ता आवडतु. त्ये पण त्या रोकडोबाच्या मंदिराच्या खात्या हाताला बस्तू त्या बाईकडला.

मी : आपण आणू हं एकदा. गावचा बाजार असला की मी आणीन. आपण दोघीजणी खाऊ. पण मला सांग. एखादी वस्तू असेल ना, जी तुला आवडते. ते सांग मला.

चिंधी : जामून (जांभूळ)च्या पत्त्याचा वास आवडतु मला.

मी : अच्छा म्हणजे जांभळाचे पान? म्हणजे तुला पान आवडते.

चिंधी : व्हय.

मी : मग आपण तुझे नाव पर्णा ठेवूयात. पर्णा. बघ कसे छान आहे ना नाव?

पर्णा : (एक हलकेसे हास्य देत) पलना…. (पर्णा) पप्पा माझं नाव पलना..

म्हंजी जामून (जांभूळ) च्या पत्ता.

मी : नाही नाही. फक्त पान म्हणजे पर्णा. आवडले का नाव?

पर्णा : (वडिलांना उद्देशून) जा तू. मला सालं सीकायची हाये. आन तू बी मला पलना (पर्णा) म्हणायचं. माय ला पन सांग, आनी वाडीत बी सांगून देय.

(एका हातात माझा हात धरत आणि दुसर्‍या हातात पदर धरत)

चल, म्याडम, कंचा वरग (वर्ग) हाये आपला?

आणि आम्ही दोघी वर्गात गेलो.

त्यानंतर साधारण महिनाभर पर्णा दिवसभर शाळेत माझा पदर धरून फिरायची. चिंधी हे नाव आवडत नाही म्हणून शाळा शिकायची नाही हे एवढच कारण होते. कदाचित या कारणाचा विचारही कधी पुढे केला गेला नसता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या