Saturday, January 24, 2026
HomeनगरAhilyanagar : शेतीसह अन्य बाधितांचे पंचनामे अंतिम टप्प्यात

Ahilyanagar : शेतीसह अन्य बाधितांचे पंचनामे अंतिम टप्प्यात

12 व्यक्ती मृत, कोंबड्यासह हजारो जनावरे मृत्यूमुखी || शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत आणि नगर तालुक्यातील शेतजमिनच गेली वाहून

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सप्टेंबर महिन्यांत नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 1 हजार 311 गावातील शेतकर्‍यांना अतिवृष्टी, पूराचा जबर फटका बसला आहे. या पावसात 5 लाख 76 हजार 879 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी व महसूल विभागाकडून बाधितांचे पंचनामे सुरु असून मंगळवार (दि. 7) अखेर जिल्ह्यातील शेती पिकांचे पंचनाम्याची टक्केवारी ही 90 टक्क्यांच्या पुढे झालेली आहे. या पावसात 12 व्यक्ती मृत पावल्या असून पशूधन (कोंबड्यासह हजारो जनावरांचे), नागरिकांच्या घरांचे, शेत जमिनी, रस्ते, जलसंधारणाची कामे, विहीरी यासह अन्य बाबींचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून आज किंवा उद्या जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात अकोले आणि कर्जत तालुक्यातील शेती पिकांचे शंभर टक्के पंचनामे झालेले आहेत. उर्वरित तालुक्यातील पिकांच्या पंचनाम्याचा आकडा हा 90 ते 95 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभर पावसाने उघडीप दिल्याने पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतीसह अन्य नुकसानीचे आकडे व प्रमाण अधिक असल्याने त्यांचे संकलन करतांना वेळ लागत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. सप्टेंबरच्या पावसात झालेल्या नुकसानीत शेतकर्‍यांसह विविध शासकीय यंत्रणेच्यावतीने करण्यात आलेली जलसंधारणाची कामे, रस्ते, पूल, बंधारे, पाझर तलाव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

YouTube video player

यासह पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड आणि नगरसह अन्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत. 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसात अनेक ठिकाणी नागरिकांची घरे, जनावरांचे गोठे वाहून गेलेली आहेत. या माहितीचे महसूल विभागाकडून संकलन सुरू आहे. गावोगावी महसूल विभागाचे कर्मचारी व कृषी विभाग पंचनाम्याच्या कामात गुंतलेले असले तरी जिल्ह्यातील एकूण नुकसानीची आकडेवारी जमा करण्यात वेळ लागत आहे. शासनाकडून वेगवेगळ्या पध्दतीने नुकसान, पूर, अतिवृष्टीची माहिती मागवण्यात येत असल्याने गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी बेजार झालेला आहे.

झेडपीचे नुकसान
जिल्ह्यात 180 प्राथमिक शाळा, 75 अंगणवाडी, 55 ग्रामपंचायत कार्यालय, 19 प्राथमिक आरोग्य केंद्र, 3 पशूवैद्यकीय दवाखाने, 12 समाज मंदिर, 100 स्मशानभूमी, 142 गावातील गाव रस्ते, 157 पाण्याची व्यवस्था अथवा योजना, 326 ठिकाणी अन्य रस्ते, 414 ठिकाणी झेडपीने बांधलेले पूल, असे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

2 हजारांहून अधिक विहीरीच वाहून गेल्या
नगर जिल्ह्यात सप्टेेंबर महिन्यांत झालेल्या पावसात जिल्ह्यातील 2 हजार 68 शेतकर्‍यांच्या विहीरी वाहून गेल्या अथवा त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. विशेष करून पाथर्डी तालुक्यातील 1 हजार 34, कर्जत 340, जामखेड 276, संगमनेर 125, नगर 120, राहाता 31 ठिकाणी शेतकर्‍यांच्या विहीरींचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...