अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीगोंदा तालुक्यातील पनीर भेसळीचा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करणारे आमदार विक्रम पाचपुते दूध भेसळीच्या मुद्द्यावर गप्प का आहेत, त्यांच्या घराजवळ चालणार्या दूध भेसळीबद्दल ते का बोलत नाहीत, असा प्रश्न श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरूनही आ. पाचपुते यांच्यावर जोरदार टीका केली.
रविवारी नगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. श्रीगोंदा तालुक्यातील भेसळयुक्त पनीरचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला हे आमदार पाचपुते यांनी चांगले काम केले आहे, असा उल्लेख करून माजी आमदार जगताप म्हणाले, त्यांनी पनीरचा मुद्दा उपस्थित केला परंतु, त्यांच्याच घरापासून अर्धा किमीवर अंतरावर सुरू असलेल्या बाळासाहेब पाचपुते या व्यक्तीने तीन जिल्ह्याला भेसळयुक्त पावडरचा पुरवठा केला, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याचे पुढे काय झाले. आमदार पाचपुते यांनी भेसळयुक्त पनीरचा मुद्दा घेतला, मग त्यांनी भेसळयुक्त दुधाचा मुद्दा का नाही घेतला. बाळासाहेब पाचपुते हा कोणाचा कार्यकर्ता आहे? तो आजपर्यंत कोणाचं काम करत होता? याचीही सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
गुटख्याचा विषय आ. पाचपुते यांनी उपस्थित केला. मुद्दा योग्य आहे, परंतु श्रीगोंदा तालुक्यात जर फिरून चौकशी केली तर श्रीगोंदामध्ये आजपर्यंत गुटखा सुरू होता, त्याचे हप्ते कुणी घेतले? त्यामध्ये काही मागे पुढे झाले का? यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला? इतकी वर्ष झाले त्यांचे वडील बबनराव पाचपुते आमदार होते, त्यांच्याकडे सत्ता होती, इतके वर्ष त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही. पोलीस प्रशासन काम करीत नव्हते का? पोलीस काम करत नसतील तर त्यांनी वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही निवेदन दिले का? हा विषय घेतल्यानंतर यामागे काही शिजणार आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे. आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कानावर हा विषय घालणार आहोत. त्यांच्या घरापासून अर्धा किमी अंतरावर जर दूध भेसळ चालत असेल तर दूध भेसळीच्या मुद्द्यावर विद्यमान आमदार गप्प आहेत, हेही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे, असे माजी आमदार जगताप म्हणाले.
श्रीगोंदा तालुक्यातील सिस्पे कंपनीचे काम चांगले आहे. या कंपनीचा मुख्य सुत्रधार औताडे याच्या व्यासपिठावर कोणी जावून भाषण केले. श्रीगोंद्यातील लोकांना कोणी कंपनीत पैसे गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. याबाबतच्या व्हिडीओ क्लिप माझ्याकडे असल्याचा गौप्यस्फोट माजी जगताप यांनी केला. आता लोक तुमच्यामुळे आम्ही सिस्पे कंपनीत पैसे गुंतवले, याबाबत जाब विचारल्यानंतर ते पोलिसांना तपासाचे निवेदन देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
आमदार पाचपुते हे भाजपचे आहेत, तर माजी आमदार जगताप हे अजित पवार गटाचे आहेत. जगताप यांच्या आरोपामुळे आता महायुतीच्या दोन पक्षातील वाद समोर आले आहेत. जगताप यांच्या आरोपामुळे श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकी आधीच आरोप- प्रत्यारोपांची राळ उडण्यास सुरूवात झाली आहे.




