मुंबई | Mumbai
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केली आहे. काल (शनिवारी) वरळी येथील राहत्या घरी गळफास घेत गौरी यांनी आयुष्य संपवलं. फेब्रुवारी २०२५ मध्ये अनंत आणि गौरी यांचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यातच गौरी यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. या घटनेनंतर गौरीच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर अनंत गर्जे यांनी प्रतिक्रिया दिली आहे .
अनंत गर्जे म्हणाले की, “ज्यावेळी घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी परतलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. आवाज दिला तरी आतमधून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी धाडस करून ३१ व्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून खाली उतरत ३० व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. यावेळी घरात शिरलो तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्याक्षणी मी पूर्णतः हादरलो. यानंतर गौरीला खाली उतरवून मी तातडीने रुग्णालयात (Hospital) नेले”, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून (Police) तपास सुरू करण्यात आला असून, घटनास्थळाचा पंचनामा केला गेला आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, कुटुंबीयांचे (Family) जबाब नोंदवून, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड व इतर तांत्रिक पुरावा तपासात घेतले जात आहेत. या तपासातूनच गौरी गर्जे यांच्या आत्महत्येमागील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
गौरीच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
अनंत गर्जे आणि आमच्या मुलीमध्ये मागील काही दिवसांपासून सतत भांडणे सुरु होती. अनंत यांचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून गौरी अस्वस्थ होती. एकदा गौरीने अनंत यांना त्या महिलेशी चॅटिंग करताना बघितले होते. त्यावेळी तिने त्याला सोडून दिले आणि परत या गोष्टी करू नको म्हणून सांगितले. यावेळी तिने वडिलांकडे काही स्क्रीनशॉर्टही टाकले होते. ज्यादिवशी मुलीने आत्महत्या केली, त्यादिवशी दोघांमध्ये खूप जास्त भांडणे झाली. तिने वडिलांना फोन देखील केला होता. ज्यावेळी मुलगी स्वत:ला संपवत होती, त्यावेळी अनंत गर्जे हा घरातच होता, असेही तिच्या कुटुंबीयांनी म्हटले.




