दिल्ली । Delhi
देशातील विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती दूर करून त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC) या उपक्रमाची ९ वी आवृत्ती उत्साहात संपन्न झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहण्याचे आणि केवळ गुणांमागे न धावता ज्ञानार्जनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
यावर्षीच्या उपक्रमाने लोकसहभागाचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, तब्बल ६.७६ कोटी नागरिक या प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. या विशेष उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदींनी देशातील पाच प्रमुख राज्यांतील केंद्रांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये दिल्ली, कोईम्बतूर (तमिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), देव मोगरा (गुजरात) आणि गुवाहाटी (आसाम) या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. २७ जानेवारी रोजी या संवादाचा अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून, यामध्ये पंतप्रधान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अत्यंत सहजतेने उत्तरे देताना दिसले.
पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भावना व्यक्त करताना म्हटले की, “यावर्षीची ‘परीक्षा पे चर्चा’ नक्की पहावी अशी आहे. यामध्ये तणावमुक्ती आणि शिक्षणाप्रती ओढ निर्माण करण्यासारखे अत्यंत रंजक विषय हाताळण्यात आले आहेत. देशातील तरुण आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने, हा कार्यक्रम माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा असतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाद्वारे ‘विकसित भारत’ ही संकल्पना तरुणाईसमोर मांडली. त्यांनी स्वावलंबी भारताचा पाया रचण्यासाठी ‘स्वदेशी’ जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले, “जर आपले कंगवे आणि टूथब्रश यांसारख्या दैनिंदिन वापरातील वस्तूही परदेशी असतील, तर विकसित भारताचे स्वप्न कसे पूर्ण होणार?” स्वावलंबी भारतासाठी पुढील एका वर्षात शक्य तितक्या परदेशी वस्तूंना स्वदेशी पर्याय शोधून त्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
सादरीकरण (Presentation) करताना वाटणाऱ्या भीतीवर उपाय सांगताना पंतप्रधानांनी एक व्यावहारिक उदाहरण दिले. ते म्हणाले की, रस्त्यावरील एखादी सामान्य महिला देखील जेव्हा टीव्ही कॅमेऱ्यासमोर बोलते, तेव्हा ती पूर्ण आत्मविश्वासाने बोलते. तिने कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसते, तरीही तिचा आवाज डगमगत नाही; कारण तिच्या बोलण्यात सत्य असते. जेव्हा तुमचा तुमच्या कामावर आणि विषयावर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा भीती आपोआप नाहीशी होते. आत्मविश्वासाचे मूळ हे सत्यात आणि विषयाच्या सखोल ज्ञानात असते.
गेमिंगमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी एक कल्पक दृष्टिकोन मांडला. केवळ विदेशी खेळांच्या मागे न लागता, आपण पंचतंत्रातील कथा किंवा महाभारतातील ‘अभिमन्यूच्या चक्रव्यूहाच्या’ कथेवर आधारित नाविन्यपूर्ण खेळ (Games) विकसित केले पाहिजेत, असे त्यांनी सुचवले. स्वतःची वेबसाईट तयार करून असे खेळ जागतिक स्तरावर लाँच करा, ज्यामुळे भारतीय कलेची आणि संस्कृतीची जगाला ओळख होईल, असेही त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांच्या वेडावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, “आपल्याला गेल्या काही वर्षांतील ‘टॉपर’ विद्यार्थ्यांची नावेही आता आठवत नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की, परीक्षेतील गुण हे तात्पुरते यश आहे.” शिक्षणाचा उद्देश केवळ गुण मिळवणे नसून, त्या अभ्यासाचा आपल्या जीवनावर काय सकारात्मक परिणाम होतो, यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी पालकांनाही आपल्या पाल्यांवर अवाजवी अपेक्षांचे ओझे न टाकण्याची विनंती केली.
या वर्षीच्या ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाने लोकप्रियतेचे सर्व मापदंड ओलांडले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार ४.५ कोटींहून अधिक सहभागींनी या आवृत्तीसाठी आगाऊ नोंदणी केली होती. अन्य उपक्रमांच्या माध्यमातून २.२६ कोटी नागरिक या प्रक्रियेशी जोडले गेले. अशा प्रकारे, या वर्षी एकूण सहभागाचा आकडा ६.७६ कोटींच्या पार गेला आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी हा मार्गदर्शक कार्यक्रम केवळ दूरदर्शनवरच नव्हे, तर सोनी लिव (Sony LIV), प्राइम व्हिडिओ (Prime Video) आणि झी ५ (ZEE5) यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.





