पारनेर । तालुका प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सुपा ते वाळवणे रस्त्यावर असलेल्या रूईफाटा येथे आज, मंगळवार (१८ नोव्हेंबर) १० वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळासाहेब मारुती भिंगारदिवे (वय ६०, हल्ली रा. वाळवणे, ता. पारनेर, मूळ रा. घोसपुरी, ता. जि. अहिल्यानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुपा ते वाळवणे या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने भिंगारदिवे यांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रूईछत्रपती फाटा येथे चालू रस्त्यापेक्षा बाजूचा रस्ता खाली असल्याने खोल दरीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. डंपर भरधाव वेगात रस्त्यावरील खोदलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अडचणीतून जात असताना, डंपरची धडक बसून भिंगारदिवे रस्त्याच्या कडेला असताना मागच्या चाकाखाली आले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत आणि मोठ्या प्रमाणात खोल खड्डे खोदले गेले, यामुळेच हा अपघात घडल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी या घटनेनंतर रस्त्यावरील कामाच्या वेळी ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आणि धोकादायक खड्ड्यांमुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याचे काम वेगाने सुरू असले तरी, ठेकेदाराने रूईछत्रपती फाटा येथे वळताना धोकादायक खोल दरी ठेवली, जी या अपघातास कारणीभूत ठरली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृताची ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले असून, सुपा पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातासाठी नेमके कोण जबाबदार आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.





