अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. सोमवार (दि.20) रोजी राहुरी, पारनेर तालुक्यांत अतिवृष्टी झाली. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे 98 मिमी, तर राहुरीसह, टाकळीमियाँ मंडळात प्रत्येकी 70 मिमी, वांबोरीत 41 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नगर, पारनेरसह दक्षिणेतील काही तालुक्यांत कडधान्य पिकांचे नुकसान करण्यास सुरू केली आहे. अनेक ठिकाणी मूग पिकांच्या शेंगा तोडणीच्या अवस्थेत असतांना संततधार पावसामुळे शेतकर्यांची तारांबळ उडाली आहे. काल मंगळवारीही राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी संततधार सुरू होती.
दरम्यान, मंगळवारी दुपारी नगर शहरासह तालुक्याच्या काही भागात पुन्हा एक तासाहून अधिक पावसाच्या धारा बरसल्या. या पावसामुळे खरीप हंगामील सोयाबीन, कपाशी, तूर, चारा पिकांना फायदा तर कडधान्य पिकांचे नुकसान होणार आहे. जिल्ह्यात उत्तर भागात अकोले (धरण कॅचमेंट वगळून), संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. याठिकाणी आतापर्यंतच्या पावसाळ्यात झालेल्या पावसाची टक्केवारी देखील कमी आहे. या उलट यंदा जिल्ह्याच्या दक्षिण भागात आतापर्यंत सरारसरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.
पारनेर तालुक्यात सोमवार (दि.19) रोजी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान झालेल्या मुसळधार वादळी वार्यासह पावसाने खरीप हंगामातील पिके भुईसपाट केली आहेत. यामुळे शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील काही भागात ढगफुटीसदृश पाऊस दोन दिवसात झालेला आहे. राहुरी तालुक्यात टाकळीमिया आणि राहुरी शहरात सोमवारी 70 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीत नगर तालुक्यातील नालेगाव 30.5, सावेडी कापूरवाडी 20, भिंगार 21, नागापूर 41, जेऊर 31.8. चास 37, रुईछत्तीशी 30, पारनेर तालुक्यातील भाळवणी 23, सुपा 36, वाडेगव्हाण 37, वडझिरे 98, शेवगाव 35, भातकूडगाव 29, ढोरजळगाव 20, पाथर्डी 56, माणिकदौंडी 48, मिरी 32, वांबोरी 41, राहुरी 70, टाकळीमिया 70 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे.