पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची आणि गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीसह महायुतीमधील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीसाठी कोण कोणाच्या जाळ्यात अडकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात वरवर काका-पुतण्याच्या राष्ट्रवादीतच लढत होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे शरद पवार यांचे उमेदवार जिथे आहेत, तिथेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उतरविण्याची महायुतीची रणनिती असल्यामुळे याठिकाणी अजित पवार गट विरोधात शरद पवार गटात थेट लढत होणार का? आणि भाजप अजित पवार गटासाठी हा मतदारसंघ सोडणार? असा प्रश्न निर्माण आहे. तसेच असे झालेच तर भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता व्यक्त केली आत आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांचा विजय झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील विधानसभेची गणिते बदलली आहेत. नीलेश लंके यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षाच्या वतीने त्यांच्या राणीताई लंके या सर्वाधिक दावेदार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात सध्या कार्यक्रमांमधून व सोशल मीडियावरही भावी आमदार, उपाधी राणीताई यांच्या नावापुढे जोडली जात आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने राणीताई लंके विधानसभेच्या दावेदार आहेत. या मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून बाजार समितीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सुजित झावरे, काशिनाथ दाते हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तालुक्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपकडे आहे.
यात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात यांचा समावेश आहेत. मात्र, डॉ. सुजय विखे यांचा लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर पारनेर मतदारसंघातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. डॉ. विखे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तालुक्याचे चित्र असे असले तरी आगामी काळात कोणत्या पक्षाची कोणासोबत आघाडी होणार किंवा युती होणार, यावर राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्याचबरोबर आयत्यावेळी पारनेर तालुक्यातील नवीन चेहरा ही अचानक समोर येऊ शकतो, अशी चर्चा देखील तालुक्यात होतांना दिसत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यावेळी विखे यांना 1 लाख 17 हजार 81, तर जगताप यांना 80 हजार 372 मते पारनेर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. त्यावेळी विखे यांना 36 हजार मतांची आघाडी मिळाली होती, तर यावेळी 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विखे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली. यावेळी पारनेर तालुक्यात लंके यांना 1 लाख 30 हजार 440 तर विखे यांना 92 हजार 340 मते मिळाली. यात तालुक्यातील उमेदवार या कारणामुळे मतदारांनी लंके यांना पारनेर तालुक्यातून 38 हजार 200 मतांची आघाडी दिली होती.