Monday, May 27, 2024
Homeनगरपारनेर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी सभासद आक्रमक

पारनेर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी सभासद आक्रमक

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीचा निकाल नुकताच सभासदांच्या बाजूने लागलेला असून, शेतकरी, सभासद कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

कारखान्याचा ताबा घेण्यासाठी जनजागृती मोहीम कारखाना बचाव समितीने हाती घेतलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात गावोगावी बचाव समिती बैठकांचे आयोजन करून जनजागृती करत आहे. पारनेर तालुक्यातील उत्तरेकडील बागायती पट्टा असलेला मांडवे खुर्द परिसर येथे कारखाना बचाव व पुनर्जिवन समितीच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला मांडवे, देसवडे, तास, वनकुटे परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी, सभासद हजर होते. पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाचा वापर करून पुणे येथील क्रांती शुगर या खाजगी कंपनीने कसा बळकावला आहे, याची सविस्तरपणे माहिती यावेळी सभासदांना देण्यात आली. कारखानाविक्री मागे कोणाचा हात होता, तो का विकण्यात आला व त्यामुळे पारनेरकरांवर कसा अन्याय करण्यात आला याची सविस्तर माहिती बचाव समितीचे रामदास घावटे यांनी दिली. कारखाना विषयीचे विविध खटले सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असून ते निकालाच्या अंतिम टप्प्यात आहेत. याचीही सविस्तर माहिती घावटे यांनी सभासदांना दिली.

पारनेर साखर कारखान्याचे आता पुनर्जिवन होत असून, कारखान्याचे सुमारे वीस हजार सभासद आहेत, त्यांचे सभासदत्व आता जिवंत होणार असल्याची माहिती बबनराव सालके यांनी दिली. पारनेर साखर कारखान्याच्या अंतिम टप्प्यातील लढाईत आमचा मांडवे खुर्द परिसर सदैव बचाव समितीच्या पाठीशी राहून साथ देईल, असे आश्वासन येथील ऊस बागायतदार जगदीश गागरे यांनी दिले.

पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत समितीचा विजय झालेला आहे. आता या पुढील लढाईत बचाव समितीला पूर्ण साथ द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर यांनी यावेळी केले. निकालानंतर आता ताबा घेतला जाईल त्यावेळी कुणी हरकत, अडथळा निर्माण केला तर जशाच तसे उत्तर देऊ अशी संतप्त भावना मांडवेतील ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केली. यावेळी मांडवे खुर्द परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी, सभासद उपस्थित होते.

ना. विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

सभासदांना न्याय मिळवून दिल्याबद्दल या बैठकीत पारनेर कारखाना बचाव समिती व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या