पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
नगर लोकसभा मतदारसंघात सर्वाचे लक्ष लागलेल्या आणि राष्ट्रवादीचे उमेदवार असणार्या नीलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. यामुळे या तालुक्यातून कोणाला किती मते मिळणार, कोणाला मताधिक्य मिळणार याबाबत तालुक्यासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान सायंकाळी पाचपर्यंत पारनेर तालुक्यात मतदारसंघातील सर्वात कमी म्हणजे अवघे 46.60 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी अंतिम आकडेवारीत 52 ते 53 टक्क्यांच्या जवळपास पोहचण्याचा अंदाज आहे.
नगर लोकसभेसाठी सोमवारी पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघात 365 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. पारनेर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 40 हजार 997 मतदार असून यात 1 लाख 64 हजार 200 स्त्री मतदार तर पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 76 हजार 772 आहे. याठिकाणी काल सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाल्यावर इतर तालुक्यांच्या तुलनेत मतदानाचा वेग कमी जाणवत होता. मात्र, सायंकाळी अनेक ठिकाणी उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यातील बड्या गावातून कोणाला मतदान झाले. कोणाला मताधिक्य मिळणार याबाबत मतदान संपल्यानंतर चर्चा सुरू होती.
दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकाळीच राळेगणसिद्धी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर राष्ट्रवादीचे उमेदवार लंके यांनी सकाळीच हंगा येथे मतदान केंद्रावर मतदान केले. भाळवणी (ता. पारनेर) येथील मतदान केंद्र क्रमांक 92 वर मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे सायंकाळी सहानंतर 300 मतदार रांगेत उभे राहून ताटकळत होते. या केंद्रावर मतदान अत्यंत धीम्या गतीने सुरू होते.
मतदान पार पडण्याच्या आधी रविवारी मध्यरात्री पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. याप्रकरणी दोन्ही गटाच्यावतीने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आला असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार मतदानाच्या आधीच्या रात्री पैस वाटपावरून दोन गटांत वाद झाल्याचे सांगण्यात आले. तसेच भर रस्त्यावर पैशाने भरलेली बॅग, रस्त्यावर नोटांचे बंडल पडलेले असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे पैसे मतदारांना वाटपासाठी आणल्याचा आरोप लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर काही महिलांनी माझ्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप राहुल शिंदे यांनी केला. पारनेर तालुक्यातील वडझिरे या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष शिंदे आणि विजय औटी यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिंदे यांच्या तक्रारीवरून लंके समर्थक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.