मुंबई | Mumbai
पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार जमीन घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वादग्रस्त जमीन व्यवहारात पार्थ पवार यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केलाय. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एकत्र पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे.
२०२१ मध्ये शितल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अॅटॉर्नी व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आता समोर आली आहेत. विशेष म्हणजे, या पॉवर ऑफ अॅटॉर्नीवर दोन्ही पक्षांच्या सह्या असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित कागदपत्रे स्वतः दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांचे वकील असलेल्या वकील तृप्ता ठाकुर यांनीच बाहेर काढली आहेत.
ही पॉवर ऑफ अॅटर्नी आहे, यात मुंढव्याची जागा असून यात प्रत्येक पेजवर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा फोटो देखील आहे. 2021 मध्ये याच जमिनींची पॉवर ऑफ अॅटर्नी आहे. ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी हे पाठवले आहे. तसेच दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी ही पाठवले आहे. EOW चे अधिकारी आहेत वाघमारे त्यांचा देखील नंबर यात पाठवला आहे. हे सर्व पोलिसांसमोर देखील गेले आहे. तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही. जर आज अजित पवार यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही उद्या पुण्याला जाऊन त्यांचे नाव घाला असा इशारा देणार आहोत. असा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यावेळी घेतला.
पार्थ पवारांचे नाव येत असूनही कारवाई नाही
या प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव वारंवार समोर येत असतानाही त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई होत नसल्याची भावना संबंधित वकिलांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांनाच सातत्याने चौकशी व त्रासाला सामोरे जावे लागत असून, पार्थ पवार मात्र गोत्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
व्हॉट्स ॲप चॅट
या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले असून, अजित पवारांचे पीए संतोष हिंगणे, राम चौबे आणि अॅडवोकेट तृप्ता ठाकूर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहेत. या चॅटमध्ये पार्थ पवारांच्या बंगल्याचे लोकेशन शेअर केल्याचा उल्लेख असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. विशेष म्हणजे, अजित पवारांचे तीन ओएसडी या संवादात सहभागी असल्याचा दावाही करण्यात येत आहे.




