अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने दोन तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. यामुळे सोमवारी पाथर्डी तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला असून पाथर्डी शहराला बेटाचे स्वरूप आले. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा होता. यामुळे या दोनही तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे शेतीपिकांसह नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर दुपारनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस झाला. पाथर्डी, शेवगावसह नगर आणि जामखेड तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सोमवार (दि.22) पासून शारदीय नवरोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे. दरम्यान, रविवारी रात्रीपासून सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नगर दक्षिणेतील विविध तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून पाथर्डी, शेवगाव, नगर आणि जामखेड तालुक्यातील 24 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यातील बहुतांशी ठिकाणी यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या भागात पुन्हा तुफानी पाऊस झाला असून यामुळे नदी, नाले, ओढे यांना पूर आला असून अनेक ठिकाणी नुकसानीचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे झालेल्या शेतीसह अन्य नुकसानीचे पंचनामे कसे करावेत, असा प्रश्न महसूल आणि कृषी विभागाला पडला आहे.
या तुफानी पावसानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पाथर्डी, शेवगाव व जामखेड येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना पुन्हा प्रदान केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना आहेत. जिल्ह्यातील 24 महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी, शेवगाव व जामखेड तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर 22 व 23 सप्टेंबर या कालावधीत आवश्यकता असल्यास शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीने घ्यावा. सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाज करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यात सततच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील अनेक गावात मोठे नुकसान झालेले असून तालुक्यात पावसात वाहून गेलेल्या व्यक्ती आणि जनावरांचा आकडा वाढतांना दिसत आहे.
शेवगाव तालुक्यात देखील मोठे नुकसान झाले असून सर्वत्र पूरपरिस्थिती होती. आखेगाव, भूगर, अमरापूर, ढोरजळगाव, वडुले, बोधेगाव यासह पाथर्डी तालुक्यातील कारेगाव- मोहटा रस्ता वाहून गेला आहे. नवरात्री उत्सवामुळे मोठ्या संख्याने भाविक रेणूकामाता देवीच्या दर्शनासाठी येत असून त्यांचे मोठे हाल होतांना यावेळी दिसून आले. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेवगाव- पाथर्डीत ओला दुष्काळाची परिस्थितीत निर्माण झाली आहे.
पाथर्डी तालुक्यातील 9 पैकी 8 मंडलामध्ये अतिवृष्टी
रविवारी रात्रभर आणि सोमवारी सकाळपर्यंत दक्षिणेतील सर्व तालुके अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. पाथर्डी, नगर, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा व कर्जत या तालुक्यातील 24 मंडलामध्ये अतिवृष्टी झाली. त्यात पाथर्डी तालुक्यातील 9 पैकी 8 मंडलामध्ये अतिवृष्टी झाली असून टाकळी व खरवंडी या दोन मंडलामध्ये 155 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 448.1 मिलीमीटर म्हणजे 98 टक्के पाऊस झाला असून सहा तालुक्यात शंभर टक्क्यांपुढे पावसाची नोंद झाली आहे.
अशी आहे आकडेवारी
पाथर्डी 124.8 मिमी, माणिकदौंडी 124.8 मिमी, टाकळीमानूर 155.8 मिमी, कोरडगाव 124.8 मिमी, खरवंडी 155.8 मिमी, अकोला 124.8 मिमी, करंजी 69.5 मिमी, तिसगाव 69.5 मिमी. बोधेगाव 81.8 मिमी, चापडगाव 81.8 मिमी, मुंगी 81.8 मिमी. जामखेड 69.5 मिमी, खर्डो 74.8 मिमी, नान्नज 69 मिमी, नायगाव 79.3 मिमी, साकत 79.3 मिमी. मिरजगाव 78.8 मिमी, मांडवगण 70.8 मिमी, कोळगाव 73.8 मिमी. कापूरवाडी 71.5, केडगाव 74 मिमी, भिंगार 72.3 मिमी, चिचोंडी पाटील 72 मिमी, चास 74 मिमी. तसेच तालुकानिहाय रविवारी झालेल्या व आज तारखेपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी (कंसात रविवारीचा पाऊस).नगर 98.5 टक्के (58.5मिमी), पारनेर 101 टक्के (22.3 मिली), श्रीगोंदा 112.7 टक्के (46.7 मिमी), कर्जत 119.8 टक्के (45.6 मिमी), जामखेड 97.1 टक्के (66.1 मिमी), शेवगाव 119.3 टक्के (56.9 मिमी), पाथर्डी 151.3 टक्के (110.5 मिमी), नेवासा 118.2 टक्के (25 मिमी), राहुरी 75.3 टक्के (5.7 मिमी), संगमनेर 73.8 टक्के (0.4 मिमी), अकोले 79.5 टक्के (0.4 मिमी), कोपरगाव 62.1 टक्के (0.1 मिमी), श्रीरामपूर 77 टक्के (4.8मिमी), राहाता 73.1 टक्के (6 मिमी).
दुपारनंतर पुन्हा गडगडाटासह पाऊस
सोमवारी सकाळी 11 वाजपेर्यंत जिल्ह्यात अनेक भागात राहून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी 12 पर्यंत अनेक ठिकाणी पाऊस थांबला होता. त्यानंतर काही काळा आकाश स्वच्छ होवून सुर्यदर्शनही झाले. मात्र, दुपारी चारनंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली. आकाशात ढगांची दाटी झाली आणि दमदार पावसाला सुरूवात झाली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस म्हणजेच 24 सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अर्लट दिलेला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. बचाव कार्याची ठळक माहिती
सोमवारी अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड-पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील 70 जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. तसेच पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील 3 जण, पिंपळगव्हाण 1, खरमाटवाडी 25, कोरडगाव 45 व कोळसांगवी 12 व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. जामखेड तालुक्यातील धनेगाव 4 व्यक्ती, वंजारवाडी 30, शेवगाव तालुक्यातील खरडगाव 12 व आखेगाव 25 नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले. मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगाव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुरग्रस्त गावात सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
24 मंडलमध्ये अतिवृष्टी
यंदा पावसाळ्यात नगर दक्षिणेतील सर्व तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यात यावेळी 488.5 मिलीमीटर म्हणजे 79 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात जास्त पाऊस पाथर्डी तालुक्यात 473.1 मिलीमीटर म्हणजे 151.3 टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी कोपरगाव तालुक्यात 404.3 मिलीमीटर म्हणजे 62.1 टक्का पाऊस झाला आहे. रविवारी रात्रभर व सोमवारी सकाळीपर्यंत पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर, शेवगाव, श्रीगोंदा व कर्जत या सहा तालुक्यात पावसाचे रुद्र स्वरूप पाहण्यास मिळाले. गेल्या 14 सप्टेंबरपासून पावसाचा जोर सुरू असूर तो अजूनही काही कमी झालेला नाही. त्यामुळे पाऊस हवा हवा म्हणणारे आता पाऊस नको रे बाबा अशीच म्हणण्याची वेळ या तालुक्यावर आली आहे. या सहा तालुक्यांतील 24 मंडलमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टी झाली आहे.
पावसात नवरात्र
उत्सव सुरू नगर जिल्हा हा परतीच्या पावसाचा जिल्हा असून या ठिकाणी गणपती आणि नवरात्रोत्सवात हमखास पाऊस होत असल्याचा आजपर्यंत अनुभव आहे. त्यानुसार यंदा देखील गणेशत्सवापासून जिल्ह्यात विशेष करून दक्षिण भागात पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील धरणांसह मध्यम प्रकल्प, गाव पातळीवरील ओढे, नाले, गाव तलाव ओसांडून वाहत आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांची चिंता जवळपास मिटली आहे.




