पाथर्डी/शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Pathardi | Shevgav
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील महापूराच्या पार्श्वभूमीवर सातबाराप्रमाणे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी तातडीची मदत द्यावी, असे निर्देश दिले आहेत. पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी नाले, ओढे व नद्यांवरील अतिक्रमणांचा मागोवा घेऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविणार आहोत. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना होणार असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे व आपत्ती पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे विशेष मदतीची मागणी करणार आहोत, अशी माहिती पालकमंत्री मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव व कासार पिंपळगाव या गावासह परिसरातील नुकसानीची पाहणी करून विखे पाटील यांनी शेतकरी व नागरीकांना दिलासा दिला. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौर्यात जिल्हाधिकारी पंकज आशिया, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाटबंधारे विभागाच्या सायली पाटील, स्वप्नील काळे, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, तहसिलदार उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते.
यावेळी ना. विखे पाटील म्हणाले, पूरपरिस्थितीत प्रशासनाबरोबर स्थानिक तरुणांनी व नागरिकांनी मोठे सहकार्य करून जीवित हानी टाळली. तरीदेखील सर्वत्र प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात अजूनही पाणी असल्याने पंचनाम्यात अडचणी येत आहेत, म्हणून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचेही आदेश दिले आहेत. शेतकरी व नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने कोणतीही कसूर करू नये, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तालुक्यात 49 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असून तब्बल 69 हजार शेतकर्यांवर याचा परिणाम झाला आहे. यामध्ये 34 गायी, 250 कोंबड्या, 50 शेळ्या व करडी, तसेच 26 घरांची पडझड झाली आहे. मानवी जीवितहानीची नोंद देताना त्यांनी सांगितले की, राजू शिवाजी सोळंके (39, देवळाली नदीत) आणि गणपत हरीभाऊ बर्डे (65, टाकळी मानूर तलावात) हे दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. या दुर्दैवी घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.
पालकमंत्र्यांना मदतीचे आ.राजळे यांचे साकडे
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे (अतिवृष्टी) प्रचंड हानी झाली असून शेती, घरे, पाळीव जनावरे, वाहने यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटून आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांना मदतीसाठी धाव घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सर्व गावांचे तात्काळ व सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी पालकमंत्री ना. विखे पाटील यांच्याकडे आ. राजळे यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी राहुल राजळे, अभय आव्हाड, मोनाली राजळे, विष्णुपंत आकोलकर, संदीप पठाडे, सुरेश पवार, काकासाहेब शिंदे, अजय रक्ताटे, नारायण पालवे, सचिन वायकर, बाबा राजगुरू उपस्थित होते.




