Friday, May 3, 2024
Homeनगरदैत्यनांदूर गोळीबारप्रकरणी तिघांना अटक; गावात तणाव

दैत्यनांदूर गोळीबारप्रकरणी तिघांना अटक; गावात तणाव

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणातील जखमी सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे ठार झाल्याने दैत्यनांदूर परिसरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असून, मुख्य आरोपीसह उर्वरित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तेथे पोलिसांचा बंदोबस्त आहे.

या प्रकरणात ज्ञानेश्वर अशोक दहिफळे हे देखील गंभीर जखमी आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील व व उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याबाबत गणेश रमेश दहिफळे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

मंगळवारी दि. 17 डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास मयत संजय दहिफळे व जखमी ज्ञानेश्वर दहिफळे दैत्यनांदूर गावामधील मुंडे चौकात उभे होते. माजी सैनिक असलेला घटनेतील संशयित आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे त्याठिकाणी आला. सरपंच संजय दहिफळे यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी सरपंच दहिफळे यांनी शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली. भांडणाचा आवाज ऐकून त्याठिकाणी शहादेव दहिफळे यांचे नातेवाईक आले.

यावेळी ज्ञानेश्वर अशोक दहिफळे यांना काठ्या कुर्‍हाडीने मारहाण करण्यात आली व सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्यावर चाकूने हल्ला करून शहादेव दहिफळे याने सरपंच दहिफळे यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये सरपंच दहिफळे यांच्या छातीत गोळी शिरल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचे त्यात निधन झाले. या घटनेतील ज्ञानेश्वर अशोक दहिफळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत गणेश रमेश दहिफळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शहादेव पंढरीनाथ दहिफळे, विष्णू पंढरीनाथ दहीफळे, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, द्वारका भागवत नागरगोजे, भागवत नागरगोजे, अनिकेत नागरगोजे, विष्णू पंढरीनाथ दहिफळे यांची पत्नी, शहादेव दहिफळे यांची पत्नी, वडील व दोन मुले, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे यांची पत्नी (पूर्ण नाव नाही) यांच्याविरोधात भा.द.वि. 302, 307 व आर्म अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी करत आहेत.

यातील ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, राहुल शहादेव दहिफळे, भागवत हरिभाऊ नागरगोजे यांना अटक करण्यात आली. घटनेनंतर दैत्यनांदूर परिसरात तणावाचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेतील मुख्य संशयित आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याच्यासह विष्णू पंढरीनाथ दहिफळे व द्वारका भागवत नागरगोजे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या आरोपींवर पोलीस पहारा ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या