Wednesday, May 29, 2024
Homeनगरदैत्यनांदूर हत्या प्रकरण; आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

दैत्यनांदूर हत्या प्रकरण; आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय दहीफळे यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना पाथर्डीच्या न्यायालयाने 23 डिसेंबर 2019 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश अस्मिता वानखडे यांनी हा आदेश दिला.

या बाबत अधिक माहिती अशी की गेल्या मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी दैत्यनांदूर येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दैत्यनांदूर गावाचे सरपंच संजय बाबासाहेब दहीफळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपीना बुधवारी दि. 18 रोजी ताब्यात घेतले. यातील ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे वय-28 व राहुल शहदेव दहीफळे वय-22 या दोघांना काल (19) गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

- Advertisement -

सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. शिवाजी दराडे व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करताना म्हणाले की या गुन्ह्यातील अजून आरोपींना अटक करणे, आरोपींनी वापरलेली बंदूक आणि हत्यारे जप्त करून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सविस्तर तपास करून फरार आरोपींचा शोध घेण्याकामी पोलीस कोठडीची मागणी केली.

तर आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. रा. ना. खेडकर व अ‍ॅड. व्ही. आर. बाणवे म्हणाले की संपूर्ण कुटुंबीयांची नावे या गुन्ह्यात गुंतविण्यात आली आहेत. सदरची व्यक्ती शिक्षण घेत आहे. घटनस्थाळावरून सर्व वस्तू मिळाल्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यांनतर न्यायाधीश वानखडे यांनी 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान दैत्यनांदूर गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सरपंच संजय दहीफळे यांच्यावर दैत्यनांदूर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने तालुक्यातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सरपंच संजय दहीफळे यांचे मित्र उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या