पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी वनपरिक्षेत्र विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमताने तालुक्यातील एकनाथवाडी येथील वनविभागाच्या हद्दीतील मुरूम विकल्याचा आरोप एकनाथवाडीच्या सरपंच नंदा बळीराम डोंगरे यांच्यासह ग्रामस्थांनी केला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा खनिजकर्म अधिकारी, जिल्हा उपवनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एकनाथवाडी गावाच्या हद्दीत मोठे वनक्षेत्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी संगनमताने वनविभागाच्या हद्दीतील मुरूम राजरोसपणे खोदून विकत आहेत.
तालुक्यातील वन विभागातील बंधार्याची कामे काही स्थानिक कर्मचारी मित्राच्या व नातेवाईकांच्या नावावर जेसीबी मशीन घेऊन करत आहेत. याच मशीनचा वापर मुरूम खोदाईसाठी केला जात आहे. आतापर्यंत हजारो ब्रास मुरूम विक्री केला आहे. त्यामुळे वनविभागाच्या हद्दीत मोठमोठे खड्डे झाले आहेत. मुरूम खोदलेल्या खड्ड्यांचे लोकेशन, फोटो निवेदनासोबत जिल्हाधिकार्यांना पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे . निवेदनावर सरपंच नंदा डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ विठ्ठल आश्रू डोंगरे व गोरक्ष रामभाऊ खेडकर आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
एकनाथवाडी येथील वनविभागाच्या क्षेत्रातील मुरूम पाथर्डी वन परिक्षेत्र विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विकल्याचा आरोप खोटा आहे. बुधवारी (दि.2) एकनाथवाडी येथे पाहणी केली असून वनविभागाच्या हद्दीत काही ठिकाणी मुरूम खोदला आहे. काही खड्डे बर्याच दिवसांचे आहेत तर काही ताजे आहेत. नुकत्याच खोदलेल्या खड्ड्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी खोदकाम केलेले क्षेत्र वनविभागाच्या हद्दीतील नाही.
– अरुण साबळे ( वनपरिक्षेत्राधिकारी, पाथर्डी)