Thursday, September 19, 2024
Homeनगरपाथर्डीत मोफत गणवेश योजनेचा बोजवारा

पाथर्डीत मोफत गणवेश योजनेचा बोजवारा

अनेकांना गणवेश मिळालेच नाही || अशक्त मुलांना मोठा तर सशक्त मुलांना घालताच येईना

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेश वाटपाचा गोंधळ झाल्याने शिक्षकांना व पालकांना मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जेवढा पट तेवढे गणवेश आले नाही. जेवढे गणवेश आले तेही विद्यार्थ्यांच्या मापाचे नसल्याने व बदलून सुद्धा मिळत नसल्याने पुढे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद संचालित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना सुरू केली. पूर्वी गणवेशा संदर्भातील अधिकार हे शालेय व्यवस्थापन समितीला होते. हे अधिकार समितीकडे असताना गोंधळ उडत नव्हता.

मात्र, शासनाने धोरण बदलत समितीचे अधिकार काढून घेतल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात तालुक्यातील प्रत्यके शाळेतील पटाचे आकडे व विद्यार्थ्यांचे मोजमाप शिक्षण विभागाने राज्य शासनाला दिले. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात गणवेशाचे वाटप केले. ते करताना एप्रिल ते जून महिन्यात शाळेची वाढलेली पटसंख्या गृहीत न धरता दिल्याने एप्रिलनंतर ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे. तसेच ज्या बचत गटांना ड्रेस बनवण्याचा ठेका दिला आहे, त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मोजमाप न घेता गणवेश बनवले व ते बनवताना एकाच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापाच्या ड्रेसचा पुरवठा केला.

परिणामी जो विद्यार्थी अशक्त आहे, त्याला ड्रेस मोठा येऊ लागला आहे, तर जो विद्यार्थी सशक्त आहे, त्याला ड्रेस घालताच येत नसल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे. पूर्वी शालेय व्यवस्थापन समितीला सर्व अधिकार असताना ही समिती गणवेश देणार्‍या कापड दुकानदाराला शाळेत बोलावून घेत कापड पसंद करून प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे मोजमाप घेत तो शिवून शाळेत देत असत. सध्या मात्र एकाच वर्गातील सर्वच मुलांची देहबोली ही एकसारखी आहे असे गृहीत धरून ड्रेसचे वाटप करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या जो ड्रेस दिला आहे, त्याच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या वाढीव मुलांनी सध्या शाळेत प्रवेश घेतला त्यांना ड्रेस कधी मिळणार व ज्यांना ड्रेस येतच नाही त्यांना ते बदलून कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

माझ्या मुलाला जो गणवेश दिला आहे, तो त्याला येत नसून दुसरा बदलून सुद्धा दिला जात नाही. गणवेश बदलून मिळावा म्हणून मी शाळेत चकरा मारतो. मात्र अजूनही गणवेश मिळालेला नाही.
– उत्तम देखणे, पालक, पाथर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या