नवीन नाशिक | वार्ताहर
नाशिक जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढत असतानाच नाशिक परिसरातही कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने संख्या वाढत आहे. मुंबई महामार्गावर पाथर्डी चौफुली भागात असलेल्या पाथर्डी परिसरात मालपाणी सॅफ्रॉन वीगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पाथर्डी परिसर सील करण्यात आला आहे. ही सोसायटी सील करण्यात आली असून परिसरात लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई करण्यात येणार आहे.
या परिसरात आढळून आलेली व्यक्त पाथर्डी परिसरात स्वाध्याय केंद्र शेजारी फार्मासिटिकल एजन्सी चालवते. त्याच ठिकाणी लहान मुलांचे क्लिनिक व मेडिकल दुकान आहे. सदरील व्यक्तीस झालेला संसर्ग बघता त्याच इमारतीमध्ये असलेल्या लहान मुलांच्या क्लिनिक मधूनही संसर्ग झाला आहे का? याची पडताळणी आरोग्य व पोलिसांना करावी लागणार आहे.
याच दुकानातून अनेक रुग्णांना औषधे इंयात आली आहेत. अशा ग्राहकांचाही शोध सुरु आहे. रुग्ण बाधित आढळल्याचे दिसून येताच ठीकठिकाणी रहिवाशांनी व नागरिकांनी आपापल्या कॉलनी भागातील रस्ते बंद केले आहेत.
याआधीही विदेशातून आलेली एक व्यक्ती याच परिसरात फिरल्यामुळे सुरुवातीलाच नाशिक मधून पाथर्डी फाटा चर्चेत आला होता. आता रुग्ण सापडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील हा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून व पोलिस यंत्रणेकडून कुठली कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.