Wednesday, February 4, 2026
HomeनगरCrime News : मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक; ९ चोरीच्या मोटारसायकली जप्त

Crime News : मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक; ९ चोरीच्या मोटारसायकली जप्त

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

पाथर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने यशस्वी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघा चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल नऊ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकत्रित किंमत सुमारे ₹४ लाख ३० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

१२ ऑक्टोबर २०२५ रोजी हंडाळवाडी (ता. पाथर्डी) येथील महेश भगवान खोर्दे यांच्या टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकलची चोरी झाली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष केंद्रित केले.

YouTube video player

तपासादरम्यान पोलिसांनी अस्पाक इसाक पठान (३०) आणि गणेश राजेंद्र साळुंके (२५) दोघेही रा. पाडळी, ता. पाथर्डी यांना संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेली मोटारसायकल कुठे ठेवली आहे हे सांगितले. त्यांच्या कबुलीजबाबावरून फिर्यादीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

सखोल चौकशीत दोघांनी आणखी आठ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी या मोटारसायकली मच्छिंद्र भानुदास शिंदे (३१, रा. चितळी, ता. पाथर्डी) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिंदे यालाही अटक करून त्याच्याकडून चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या. जप्त वाहनांमध्ये टीव्हीएस स्टार सिटी, हिरो स्प्लेंडर आणि होंडा शाईन या कंपन्यांच्या विविध मॉडेल्सचा समावेश आहे. बहुतांश मोटारसायकली काळ्या रंगाच्या असून काहींच्या नंबर प्लेट्सही नव्हत्या, असे तपासात उघड झाले आहे.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद, सागर बुधवंत, संजू जाधव आणि धनराज चाळक यांनी परिश्रम घेतले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पो.हे.कॉ. बाबासाहेब बडे करीत आहेत. या कारवाईमुळे पाथर्डी परिसरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर पोलिसांनी प्रभावी लगाम लावला असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम...