पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी तालुक्यात बुधवारी (दि.14) मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. धामणगाव येथील प्रसिद्ध जगदंबा देवी मंदिर, दुलेचांदगावातील एका शेतकर्याचे घर आणि पाथर्डी शहरातील मेडिकल दुकान अशा तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. धामणगाव येथील देवी मंदिरातून चोरट्यांनी लोखंडी दानपेटी फोडून 15 तोळे सोनं, 1 किलो चांदी व रोख रक्कम असा अंदाजे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंदिराच्या पुजारी रामदास बाप्पूराव शिंदे यांच्या फिर्यादीनुसार, ही चोरी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीनंतर दानपेटी मंदिरासमोर 200 मीटरवर असलेल्या शेतात टाकण्यात आली होती.
दुसर्या घटनेत दुलेचांदगावातील शेतकरी ज्ञानदेव शेळके यांच्या घरी पहाटे तीन चोरट्यांनी घुसून जबरी चोरी केली. आवाज केल्याने चोरट्यांनी ज्ञानदेव यांना चाकूने आणि त्यांच्या पत्नी शोभा यांना लोखंडी गजाने मारहाण केली. अंगावरील दागिने व घरातील 10 हजारांची रोकड असा ऐवज हिसकावून ते पसार झाले. चोरट्यांनी दोघांना खोलीत बंद करून पलायन केले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिसर्या घटनेत शहरात मेडिकल दुकान फोडले असून चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. शहरातील शेवगाव रोडवरील जगदंबा मेडिकलचे शटर कटरने तोडून चोरट्यांनी दुकानातून 2 हजार रुपये रोख व सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. केवळ सात मिनिटांत चोरट्यांनी हात साफ केला. सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पाथर्डी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक आणि ठसे तज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून, नागरिकांतून कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे व निवृत्ती आगरकर करीत आहेत.