Thursday, May 23, 2024
Homeनगररुग्ण पाठवा 40 टक्के मिळवा; डॉक्टरांचा यशस्वी फार्म्युला

रुग्ण पाठवा 40 टक्के मिळवा; डॉक्टरांचा यशस्वी फार्म्युला

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

संगमनेरच्या वैद्यकीय व्यवसायात सध्या कट प्रॅक्टिस ही संकल्पना जोमाने राबविण्यात येत आहे. रुग्ण पाठवा आणि एकूण बिलाच्या 40 टक्के रक्कम मिळवा असा फॉर्म्युला शहरातील बड्या हॉस्पिटलद्वारे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील छोट्या डॉक्टरांना ही संकल्पना चांगलीच मानवली असून त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णाला ते थेट शहरातील बड्या हॉस्पिटलचा रस्ता दाखवत आहेत. कट प्रॅक्टिसचा हा फॉर्म्युला यशस्वी होत असल्याने सगळेच डॉक्टर मालामाल होत आहेत. यात रुग्णांची मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

संगमनेरात गेल्या 15 वर्षांत अनेक मोठ मोठी रुग्णालये सुरू झाली आहेत. कोट्यवधी रुपयांच्या इमारती बांधून संबंधितांनी सुसज्ज रुग्णालये उभारले आहे. डॉक्टरांची ही झपाट्याने होणारी प्रगती चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णालय मोठे असून उपयोग नाही. त्यासाठी रुग्णांची गरज असते. डॉक्टरांनी याचा अभ्यास केला.

नंतर कट प्रॅक्टिस ही संकल्पना उदयास आली. ग्रामीण भागात अनेक दवाखाने अस्तित्वात आहेत. किरकोळ आजारावर या दवाखान्यात उपचार केले जातात. मोठ्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा व तेेेवढा अभ्यास नसल्याने ते पुढील उपचारासाठी रुग्णाला संगमनेरातील बड्या हॉस्पिटलमध्ये पाठवितात. डॉक्टरांनी नेमकी ही बाब हेरून ग्रामीण रुग्ण आपल्याच दवाखान्यात येतील. यासाठी खेडेगावातील डॉक्टरांना हाताशी धरून त्यांना आर्थिक अमिष दाखवले.

ग्रामीण भागातील डॉक्टरांनाही आयतीच संधी चालून आल्याने ते रुग्णांना शहरातील हॉस्पिटलमध्ये पाठवित आहेत. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्याकडून आकारल्या जाणार्‍या बिलाच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम ही रुग्ण पाठविलेल्या डॉक्टरला दिली जाते. कोणत्याही आजाराचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला किमान चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात येते.

आजाराच्या स्वरूपानुसार रुग्णालयातील दिवस वाढूही शकतात. तेवढ्या प्रमाणात दवाखान्याचे बिल वाढविण्यात येते. एका रुग्णाचे किमान 10 हजार बील आकारण्यात येते. 10 हजाराच्या पुढे कितीही बिल आकारण्यात येते. एकूण बिलाच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम जो डॉक्टर रुग्ण पाठवितो. त्याच्या नावाने बाजूला ठेवण्यात येते. एका रुग्णामागे किमान 4 ते 5 हजार रुपयांची रक्कम पाठविणार्‍या डॉक्टरला घरबसल्या मिळते. या डॉक्टरची 40 टक्के व स्वतःची रक्कम वसूल करण्यासाठी रुग्णाला लुटले जाते.

संगमनेर शहरातील हॉस्पिटलची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात दाखल होणार्‍या रुग्णांची संख्याही मोठी आहे. बहुतेक रुग्ण हे कट प्रॅक्टिसच्या माध्यमातूनच दाखल होतात. त्यामुळे कोणत्या डॉक्टराने रुग्ण पाठविला व त्याला किती रक्कम द्यायची हे पाहण्यासाठी मोठ्या डॉक्टरांकडे वेळ नसतो. याला पर्याय म्हणून हे काम करण्यासाठी काही डॉक्टरांनी स्वतंत्र अकाउंटंटची नेमणूक केली आहे. हा अकाउंटंट सगळा हिशोब ठेवतो. दर दहा दिवसाला संबंधित डॉक्टरांची रक्कम रोख देऊन टाकण्यात येते. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशा वातावरणात कट प्रॅक्टिस संगमनेरात जोरात सुरू आहे.

जास्तीत जास्त रुग्ण आपल्याच दवाखान्यात यावेत यासाठी शहरातील काही मोठे हॉस्पिटल चालक नवनवीन प्रयोग करत आहेत. अपघातग्रस्त व इतर आजाराचा रुग्ण रिक्षाचालक आणतात. या रिक्षाचालकांनी असे रुग्ण आपल्याच हॉस्पिटलमध्ये आणावेत यासाठी बड्या डॉक्टरांनी थेट अनेक रिक्षाचालकांना हाती धरले आहे. एका रुग्णामागे ठराविक रक्कम या रिक्षाचालकांना दिली जाते. पैशाच्या लोभापायी रिक्षाचालक रुग्णांना अशाच रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जातात. यामुळे रिक्षाचालक व हॉस्पिटलचालक दोघांचाही फायदा होत आहे. व्यवसाय वाढीसाठी डॉक्टर वापरत असलेल्या या फंड्याची जोरदार चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या