परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट तयार होतात. मोकळ्या जागा-वापरात नसलेली सभागृहे आणि उद्याने यांचा गैरवापर होतो. नद्यांचे हळूहळू नाले बनतात. लोकही सातत्याने अशा अनेक तक्रारी करतात. तथापि या समस्या निर्माण होण्याला कळत-नकळत समाजाचा दृष्टिकोनही सहाय्य्यभुत ठरत असावा का? अन्यथा रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे कसे साठतात? मोकळ्या जागा मद्यपींचे अड्डे कसे बनतात? उध्वस्त उद्यानांमध्ये पत्त्यांचे डाव कसे रंगतात? नद्या आणि त्यांच्या उपनद्यांची पात्रे गटारगंगा होण्याची अनेक कारणे सांगितली जातात. पण लोकही नद्यांना गृहीत धरत नाहीत का? माणसांनी टाकल्याशिवाय नदीपात्रात प्लास्टिकचा कचरा तरंगतो का? सरकारने या समस्या सोडवाव्यात अशी लोकांची अपेक्षा असते. ती गैर म्हणता येणार नाही.
तथापि लोकसहभागातून या समस्यांवर उत्तरे शोधली जाऊ शकतात. पश्चिम बंगालच्या अलीपूरदा जिल्ह्याच्या एका गावातील लोकांनी आणि जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्याच्या एका गावातील नागरिकांनी अशाच काही समस्यांवर त्यांच्यापरीने मार्ग शोधले आहेत. त्याचे परिणाम त्यांचा उत्साह वाढवणारे ठरत आहेत. माध्यमांनी त्यांच्या पुढाकाराची दखल घेतली आहे. अलीपूरदाच्या गावातील शाळेजवळ एक मोठे झाड आहे. ते मद्यपी आणि जुगाऱ्यांचा अड्डा बनले होते. तेथून जाणाऱ्या एका तरुणाला ते दृश्य रोजच खटकायचे. त्याच्याच प्रयत्नांनी ते झाड आता कलाकारांच्या ‘मीटअप’ ची जागा झाले आहे. तिथे वाचनालय आहे. कला सादर करता येते. युवा तेथे जमून पुस्तकांचे अभिवाचन करतात. गाणी गातात. वाद्ये वाजवतात. अनंतनागमधील गावाची कथा यापेक्षा थोडीशी वेगळी असली तरी लोकसहभागाचीच जास्त आहे. त्या गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले होते. सरपंच आणि त्यांच्या पत्नीने जे लोक जास्तीत जास्त कचरा गोळा करतील त्यांना सोन्याचे नाणे भेट द्यायला सुरुवात केली. सुरुवातील सोन्याच्या नाण्याच्या आमिषाने लोक त्यात सहभागी होत होते. पण कालांतराने अनेक जण सामाजिक कर्तव्य म्हणून सहभागी व्हायला लागले. कचरा मन मानेल तिथे टाकला नाही तर तो उचलावा देखील लागत नाही याची जाणीव यानिमित्ताने लोकांना होईल अशी सरपंच दाम्पत्याची अपेक्षा आहे. त्या गावांमध्ये हे कसे शक्य झाले? ‘मी एकटा काय करू? कशाला करू? मला काय त्याचे? ते सरकारचे काम आहे’ या दृष्टिकोनाचा स्थानिक ग्रामस्थांनी त्याग केला. सर्वच सामान्य माणसांमध्ये प्रवाहाविरुद्ध पोहायची क्षमता नसते. धाडस नसते. तसे केले तर विपरीत परिणामांना कदाचित सामोरे जावे लागू शकेल का याची भीती सामान्य माणसांच्या मनात असते. त्यांच्याच भाषेत सामान्य माणसांची कोणाशीस पंगा घेण्याची त्यांची तयारी नसते. शिवाय सामान्य माणसांची पोटापाण्याची लढाई सुरु असते. त्यातून वेळ काढणे कदाचित सर्वांनाच शक्य होणारे नसते. तथापि तसे बदल सुरु झालेच तर त्याला साथ द्यायला लोक हळूहळू तयार होतात. त्यासाठी चांगल्या बदलाची सुरुवात कोणीतरी एकाने करण्याची आवश्यकता असते. उपरोक्त दोन गावांमध्ये तशी ती झाली आहे. ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर..लोग साथ आते गये और कारवाँ बनत गया’ याचा अनुभव बदलाचे धाडस करणाऱ्यांना आला आहे. समाज त्यांच्यामागे ताकद उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून इतरेजन प्रेरणा घेतील आणि स्थानिक छोट्यामोठ्या समस्यांवर उत्तरे